आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धे आकाश:शिक्षणातील लिंगभाव समजून घेताना...

डॉ. मंजुश्री लांडगे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शि क्षणाचे आधुनिक विज्ञान सांगते की, प्रत्येक मूल हे वेगवेगळे असते. त्यामुळे शिकण्याच्या या प्रक्रियेत मुले बऱ्याचदा त्यांच्या अनुभव, निरीक्षणावर स्वतःचे ज्ञान निर्माण करत असतात. बालशिक्षणातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचे टप्पे मुलांच्या जडणघडणीला महत्त्वाचे आयाम प्रदान करतात. या पुढचा टप्पा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा आहे. त्यामधून एखादा विषय किंवा त्या विषयातला आशय समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ही चर्चा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर भाष्य करणारी आहे. मात्र, एकीकडे भारतामध्ये शिक्षणबाह्य मुलांचे प्रमाण जास्त आहे. गरिबीमुळे बालकामगार, स्थलांतरामुळे होणारी कुटुंबाची होरपळ, मुलींकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनातून होणारे बालविवाह यांसारख्या अनेक कारणांमुळे शिक्षणातून त्यांची गळती होते. समाजातील जात वास्तव आणि अर्थस्तरीय रचनेमुळे फुटपाथ, पालावर जगणाऱ्या कुटुंंबांतील मुले बहुतांश दलित, आदिवासी भटक्या समूहातील आहेत. शालेय शिक्षण व्यवस्थेपासून त्यांचा संबंध कोसोदूर राहिलेला आहे. १९ व्या शतकामध्ये क्रांतिकारी फुले दाम्पत्याने प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक आणि सक्तीचे करण्याची मागणी केली होती. ती आजही तितकीच महत्त्वाची ठरते. भारत सरकारने २०१० ला शिक्षण हक्क कायदा केला. त्यानुसार, देशातील एक कोटी शाळाबाह्य मुलांना या शिक्षण व्यवस्थेत आणण्याचे लक्ष ठेवले गेले. मात्र, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी शाळाबाह्य मुलांचा टक्का घटला नाही, हे देखील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे एक वास्तव आहे. शिक्षण व्यवस्था आणि त्यातून तयार होणारे सृजनशील विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असतेे. मात्र, त्या दृष्टिकोनातून न बघितल्यामुळे शिक्षणव्यवस्था अनेक स्तरांवर अपयशी ठरलेली दिसते. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अभ्यासक आणि बालहक्क कार्यकर्त्या प्रा. शांता सिन्हा यांच्या मते, शालेय अभ्यासक्रमाची गोडी निर्माण न झाल्यामुळे शिक्षणाच्या विविध टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा मुलांची गळती होते. प्रस्थापित धारणेतून, दारिद्र्य व गरिबीमुळे गरीब मुले शिक्षणातून बाहेर पडतात, या गृहीतकाला शांता सिन्हा छेद देतात. त्या म्हणतात की, “ज्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे, ज्यांना विषय समजलेला आहे, ते बऱ्याचदा प्रतिकूल परिस्थितीत त्यांचं योगदान हे उच्च शिक्षण आणि चांगल्या ठिकाणच्या नोकरीपर्यंत देताना दिसतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहतात, हे देखील सत्य आहे.’ गळतीच्या प्रमाणातील मुलींची टक्केवारी आपण बघितली, तर ती मुलांच्या तुलनेत जास्त आहे. याला कारण जन्मापासूनच मुलगी म्हणून तिची होणारी जडणघडण, कमी वयात तिच्यावर होणारे घरकामाचे संस्कार, भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी, घरातील मोठ्यांच्या कामांमध्ये पूरक असणारा तिचा सहभाग यामुळे मुलींची शिक्षणातील गोडी आणि सहभागाचा प्रमाणाचा टक्का आणखी कमी होताना दिसतो. किंबहुना, शिक्षणातील तिचा टिकून राहण्याचा संघर्षही अधिक तीव्र होत जातो. एका सर्वेक्षणानुसार, विद्यार्थ्यांचे किमान लेखन, वाचन कौशल्य प्रमाण ५४ टक्के एवढे आहे, तर व्यवस्थितपणे गुणाकार आणि भागाकार करणाऱ्या विद्यार्थ्यांंचे प्रमाण ७६ टक्के आहे. शिक्षण व्यवस्थेतील सर्वंकष मूल्यमापनाच्या धोरणाचा हा परिपाक आहे. विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात ढकलण्यामुळे दहावी-बारावीच्या पातळीवरील मुला-मुलींचा सहभाग वाढत असला, तरी त्यांच्यामधील व्यावहारिक गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटलेली दिसते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि दर्जायुक्त शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण होणे ही वर्तमानकाळातील महत्त्वाची निकड आहे. आजच्या शिक्षण पद्धतीतून प्रायोगिक पद्धतीने विषयाच्या आशयामध्ये आणि ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये गोडी निर्माण करणारी शिक्षण यंत्रणा विकसित करणे, हे महत्त्वाचे ध्येय आणि उद्दिष्ट असले पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील उच्च शिक्षणातील सहभागाचे प्रमाण केवळ २६.२% एवढे आहे. या तुलनेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांसारख्या प्रगत देशांचे सहभागाचे प्रमाण ७०% च्या पुढे आहे. भविष्यातील नागरिक घडणीच्या प्रक्रियेत शिक्षण व्यवस्था शिक्षणाची गोडी व त्यातला विषय, आशय समतेच्या पातळीवर आणत नाही, तोवर विद्यार्थी हे एक सुजाण नागरिक म्हणून नावारूपाला येऊ शकणार नाहीत. ‘सुजाण नागरिक’ शिक्षणातून निर्माण होत असतो. त्यामुळे शिक्षणातील आशय, विषय आणि अध्यापन प्रक्रिया निर्दोष असणे, हे शिक्षणाच्या समतादायी वाटचालीतील महत्त्वाचे घटक ठरू शकतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून निश्चितपणे चांगले-वाईट काय आहे, हे ओळखता येते. शिक्षणातील चुकीचा आशय किंवा अभ्यासक्रमातील चुकीच्या नोंदींमुळे शिक्षणातील दर्जा ढळताना दिसतो. उदा. पाठांमधील लिंगभावी आशय, जो मुलगा व मुलगी यांच्या श्रम विभाजनावर चित्रांच्या वा संवादांच्या माध्यमातून लिंगभाव जडणघडणीतील “त्व”चे नैसर्गिकरण करतो. अभ्यासक्रमातील लिंगभावी आशय आणि चुकीच्या नोंदीमुळे अध्ययनाच्या पातळीवर ही व्यवस्था निर्दोष आणि निर्धोक राहत नाही, उलट ती सदोष होत जाते. यातून निर्माण होणारे विद्यार्थी देशाची संपत्ती असतात, पण ते संवेदनशील बनण्याच्या प्रक्रियेत अडकून पडतात. विद्यार्थ्यांचा पाया मनुष्य पातळीवर भक्कम करायचा असेल, तर अभ्यासक्रमातून लिंगभाव, संवेदनशील शिक्षण, आशय पद्धतीचा विचार-व्यवहार आणि कठोर अंमलबजावणी करणे हे उपाय महत्त्वाचे ठरू शकतील. तसे झाल्यास भारत आधुनिक शिक्षणातून समग्र विकासाचा पल्ला गाठेल, यात शंका नाही. {संपर्क : manjiri.landge@gmail.com