आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Understanding The Buddha In The Unhealthy Present ... | Article By Milind Kasbe

रसिक स्पेशल:अस्वस्थ वर्तमानात बुद्ध समजून घेताना...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्र : राजेश सावंत, नाशिक - Divya Marathi
चित्र : राजेश सावंत, नाशिक

बुद्धांचा देश म्हणून भारताची प्राचीन ओळख आहे. माणसाला नेहमीच निसर्गाची, शांतीची आणि आनंदाची गरज लागली आहे. तो त्याचा मूळ स्वभाव आहे. परंतु, अमर्याद आर्थिक लाभाने, सत्तेच्या वर्चस्ववादी आमिषाने आणि सुखाच्या अवाजवी कल्पनेने त्याला पुरते बाद केले आहे. समाजाचे लक्ष आत्मिक उन्नतीऐवजी भौतिक गोष्टींकडे कसे जाईल, याची योजना समाजातील सत्ताधारी वर्ग नेहमीच करीत असतो. धर्माचा आणि जातीचा आधार घेऊन माणसांच्या मेंदूचे सपाटीकरण करण्यात त्यांना अधिक रस असतो. आता लोकशाहीच्या नावाखाली प्रत्येक जण आपापल्या धर्माचे भोंगे घेऊन रस्त्यावर येत आहे. अशा भोंगेबाजीचा तमाशा माणसांमाणसात द्वेष पसरवेल, माणसाच्या मनात शिल्लक राहिलेले माणुसकीचे उरलेसुरले कणही नष्ट करेल. त्याचं प्रेमानं भरलेलं आतलं जग गढूळ करून त्याला रस्त्यावर लढाया करायला लावेल. म्हणूनच आज शांतिदूत बुद्धांना पुन्हा पुन्हा समजून घेण्याची गरज आहे.

भगवान गौतम बुद्ध हे माणसाने सदैव आचरणात अाणावं असं महत्तम तत्त्वज्ञान आहे. बुद्ध समजले की जगातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे काळजात उगवतात. माणूस माणसाशी सदाचारानं, प्रेमानं वागतो. परंतु, कित्येक वर्षांपासून बुद्ध समजूच नयेत, अशी योजना भारतातल्या धर्मरक्षकांनी मोठ्या चलाखीनं केली. बुद्धांना पुनर्जन्माच्या कल्पनेला जोडले. त्यांना अवतार संकल्पनेत डांबले. आयुष्यभर बुद्धांनी जे कर्मकांड नाकारले, त्याच कर्मकांडांचा विळखा बुद्धांच्या विचारांभोवती घट्ट करण्यात इतर धर्म प्रयत्नशील राहिले.

जगाची पुनर्रचना करणारे बुद्ध : भारतात बुद्ध धम्माचा ऱ्हास होण्याची अनेक कारणे आहेत. भारतीय समाजातील ‘क्रांती व प्रतिक्रांती’ या निबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भारतीय समाजाचा इतिहास म्हणजे ब्राह्मणी परंपरा आणि बौद्ध धम्म यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे’, असे जे म्हटले आहे, त्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. बुद्ध धम्म ज्या ज्या देशात पोहोचला त्या त्या देशात त्याने तिथल्या पर्यावरणाशी आणि संस्कृतीशी मैत्रीभाव केला. परंतु, भारतात मात्र धर्माच्या आणि जातींच्या पुंजक्यांमुळे बौद्ध धम्माच्या प्रसारणाला मोठ्या अडचणी आल्या. तथापि, बौद्ध धम्म हा वैदिक धर्माची प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर बदलत्या जगातील मानवी अडचणींवरील सर्वव्यापी उपाय म्हणून उदयास आला होता, हे समजून घेतले नाही, तर बौद्ध धम्माचे वर्तमान महत्त्व लक्षात येणार नाही. प्राचीन बौद्ध धम्म आणि डॉ. आंबेडकरांनी मांडलेला बुद्धांचा धम्म यातला फरक लक्षात घेतला नाही, तर अनेक गडबडीही होऊ शकतात. पारंपरिक बौद्ध धर्म बोधिप्राप्ती करणे हे ध्येय मानत होता. डॉ. आंबेडकरांचा बुद्ध हे जग बदलण्याची, ते अधिक चांगले करण्याची भाषा करीत आहे. त्यांचा बौद्ध धम्म जगाची पुनर्रचना करणारा आहे. म्हणून धम्म आणि धर्म यात हाच फरक आहे. आंबेडकरी जनतेने हा फरक लक्षात घेऊन बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या नवबुद्धांना आपल्या लढायांशी जोडायला हवे. बुद्धांची सामाजिक प्रतिमा दलितेतर समाजात रुजवण्यासाठी आंबेडकरी लेखक- कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न करायला हवेत. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला दलितेतर स्पृश्य आणि अस्पृश्य समाजाने आपल्या जगण्याशी जोडायला हवे, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता, सम्यक समाधी हे बुद्ध विचारांचा सार आहेत. या पृथ्वीतलावर सदाचाराचे राज्य यावे, दुःख आणि दैन्याचे उच्चाटन व्हावे. मानवी समाजात सत्य, शांती, करुणा, प्रज्ञा आणि मैत्रीचा विचार रुजावा. सर्व मानवजात सुखी आणि विवेकी व्हावी, अशी बुद्ध धम्माची मूळ शिकवण आहे. ती केवळ दलितांसाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सम्यक हिंदूंसाठी सम्यक पर्याय : आज केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला बुद्धाची गरज आहे, याची प्रचिती सर्वांनाच येते आहे. भांडवलशाहीच्या विळख्यात सापडलेला माणूस चंगळवादी बनून सैरभर झाला आहे. धर्मांधतेच्या विळख्यात त्याचा श्वास कोंडला आहे. जागतिकीकरणात जाती नष्ट होतील, अशी आशा होती. परंतु, सध्याचे राजकारण त्या अधिक घट्ट करत आहे. धर्मांधता, भांडवलशाही आणि राजसत्ता यांची दिवसेंदिवस वाढणारी मिलीभगत भारताच्या मूळ सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडे देत आहे. अशा सांस्कृतिक संघर्षाच्या काळात आपण उभे आहोत. रोज नवनवे नागरी लढे अनुभवत आहोत. मूल्य ढासळलेल्या माध्यमांतून हिंसा, अत्याचार, धर्मांधता, भ्रष्टाचार, देशद्रोह अशा गोष्टी ऐकत आहोत. एकूणच काय, तर माणूस आतून आणि बाहेरून दोन्हीकडून उसवला जातो आहे. तो सत्य, शांती आणि सदाचारापासून दूर लोटला जातो आहे. अशा सांस्कृतिक संघर्षाच्या काळात माणसाला खरी गरज युद्धाची नव्हे, तर बुद्धाची आहे.

भारतीय समाजात अध्यात्म आणि धार्मिकता यात नेहमीच गल्लत झाली आहे. अध्यात्म ही माणसाच्या आतल्या जगाला समृद्ध करणारी गोष्ट आहे, तर धर्म ही त्याच्या बाह्य जगाशी जोडलेली गोष्ट आहे. श्रद्धाभाव ही माणसाच्या मनातली नैसर्गिक भावना असल्याने श्रद्धेचा संबंध अध्यात्माशी आहे. निसर्गपूजक असणं, आत्मिक उन्नतीसाठी ध्यान करणं ही आध्यात्मिक गोष्ट आहे. परंतु, या नैसर्गिक भावनेत यातुविद्येचा समावेश करून वैदिक धर्मरक्षकांनी धर्माचा प्रसार आणि आपल्या सोयीसाठी अध्यात्मालाच धार्मिकता म्हटले. बहुजन समाजाला, विशेषत: शेतकरी समाजाला बुद्धांपासून दूर नेण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरली. बुद्ध, कबीर, तुकाराम, म. फुले, हे महापुरुष आध्यात्मिक होते हे खरे आहे, परंतु ते धार्मिक नव्हते, हेही समजून घेतले पाहिजे. बहुजन समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीचा आध्यात्मिक मार्ग वैदिक हिंदू परंपरेने आपल्या धर्माच्या रक्षणाकडे वळवल्याने बहुजन स्पृश्य-अस्पृश्य हिंदूंना पर्यायी अध्यात्म उभे करता आले नाही. खरे तर बुद्ध हा पर्यायी आध्यात्मिक लोकशाही उभी करण्याचा सक्षम पर्याय होता. पण, बुद्धांना समजून घेण्यात आपण कमी पडलो. त्यांना जाती-धर्मात बंदिस्त करून त्यांचाच देव करण्यात रमलो. बुद्ध ही प्रत्येक माणसाला स्वयंप्रकाशित करणारी ऊर्जावान संवेदना आहे. ‘अत्त दीप भव’ असा संदेश देणारे बुद्ध प्रत्येक माणसाच्या आतल्या जगाला प्रज्ञावान करतात, समृद्ध करतात आणि प्रेममय करतात. म्हणूनच प्रत्येकासाठी बुद्ध आहे आणि प्रत्येकात बुद्ध आहे.

हिंदू आणि हिंदुत्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचे चरित्र लिहून आणि बुद्धांना अनुसरून एक नवा मार्ग भारतीय जनतेला दाखवला. भारतात वैदिक परंपरा मानणारा ब्राह्मणांचा हिंदू धर्म आणि अठरापगड जातीत विभागलेल्या स्पृश्य-अस्पृश्य बहुजनांचा हिंदू धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे बाबासाहेबांनी साउथबरो कमिटीला सूचित केले होते. याचा अर्थ भारतात हिंदू धर्म एक नसून दोन आहेत, असे बाबासाहेबांना म्हणायचे होते. आजही हिंदू धर्मातील या दोन प्रवाहात सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यामुळे भारतात पूर्वीच्या हिंदू विरुद्ध मुस्लिम या संघर्षाची जागा आता हिंदुत्व विरुद्ध जिहाद याने घेतली आहे. हिंदुत्व आणि हिंदू याही गोष्टीत फरक करायला हवा. भारतातील सर्वच हिंदू, मुस्लिमांच्या द्वेषात अडकले आहेत, असे म्हणता येत नाही. अलीकडे अजान आणि हनुमान चालिसा या नव्याने उभ्या राहिलेल्या राजकीय संघर्षात सर्वसामान्य मुस्लिम आणि बहुजन हिंदू एकमेकांच्या आध्यात्मिक आचरणात अडथळा म्हणून विरोधात उभे ठाकले नाहीत. राजकारणाने मूल्ये गमावली तरी वेगवेगळ्या जाती-धर्मांत विसावलेल्या माणसांनी मात्र आपली आध्यात्मिक नैतिकता गमावली नाही. सध्याच्या भारतातील राजकारणाचा कल पाहता वैदिक हिंदुत्व आणि बहुजनांचे हिंदुत्व यात यापुढे अनेक टकराव होणार आहेत. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पूर्वी एक असलेल्या आणि आता विभक्त झालेल्या दोन्ही हिंदुत्ववादी राजकीय पक्षांची वाटचाल पाहता आता राजकारणातही वैदिकांचे हिंदुत्व आणि अनार्य बहुजनांचे हिंदुत्व अशी सरळ विभागणी दिसू लागली आहे.

समकालीन इतिहासाचा विसर : आपला समकालीन भूतकाळ विसरण्याचे अनेक तोटे आपण आज अनुभवतो आहोत. भारतात बहुतांश हिंदू राहतात हे खरे आहे. परंतु, ते अठरापगड जातीत विसावलेले कष्टकरी बहुजन हिंदू आहेत, हेही विसरता कामा नये. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध आणि इतर धर्मीयांनी हा भारत घडवण्यासाठी जे योगदान दिले आहे, तो समकालीन भूतकाळ विसरता येणार नाही. सध्या देशात जे द्वेषमूलक राजकारण फैलावले आहे ते सर्वांसाठीच घातक आहे. ताजमहाल, कुतुबमिनार किंवा विष्णुस्तंभ अशा इतिहासाच्या वर्चस्वावरून लढाया लढण्यात अर्थ नाही. आता आपले प्रश्न केवळ अस्मितांचे किंवा इतिहासाचे राहिले नाहीत, तर ते वर्गीय बनले आहेत. समतेच्या, न्यायाच्या प्रश्नांना आर्थिक परिप्रेक्ष्यात समजून घेतले नाही आणि आपण सध्याच्या भांडवलशाहीच्या युगात आपल्या लढायांचे स्वरूप वर्गीय केले नाही, तर आपणही एक दंतकथा बनून राहू. केवळ मुस्लिम धर्मीयांना लक्ष्य करून राजकारण करता येईलही, पण त्यातून भारतीय समाजाला अच्छे दिन येतील, असे स्वप्न पाहण्यात अर्थ नाही.

भारतातील बहुजन, दीन-दुबळा, वंचित वर्ग कर्मकांड, पुनर्जन्म, पिंडदान, नवस यांसारख्या अनेक मंत्र - तंत्रावर आधारित कल्पनांतून बाहेर येऊन जगाकडे विज्ञानाचे डोळे घेऊन पाहील, तेव्हा त्याला समता आणि बंधुतेचे दर्शन घडवणारे पहिले हात तथागत गौतम बुद्धांचे असतील. आपल्या जगाचे सम्यक दर्शन घेण्यासाठी बुद्धांचा धम्मच स्वीकारण्याची गरज नाही. ते दर्शन कोणत्याही जातीतील, धर्मातील विवेकी माणसाला घडू शकते. भारतातील कष्टकरी, श्रमिक, दलित, उपेक्षित, भटके, आदिवासी, शेतकरी या सर्वांसाठीच बुद्धमार्ग हा त्यांचे ‘आतले’ जगणे समृद्ध करणारा महामार्ग आहे.

प्रा. डॉ. मिलिंद कसबे pustakmarket2020 @gmail.com { संपर्क : ९७६६९८४७७० (लेखक प्राध्यापक आणि समीक्षक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...