आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:बिनपगारी फुल अधिकारी...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकूची तब्येत बरी नसल्यामुळे परवा तिला भेटायला गेले. काय चाललंय काय नाही असं दोघींचं बोलणं झालं. मी जवळपास दहा ते पंधरा मिनिटं; मी, माझं घर, ऑफिस यासंदर्भात बोलले. काकूने मात्र तिचं काय चाललंय हे एकाच ओळीत सांगितलं. ती म्हणाली, ‘काही नाही घरचंच आपलं..! नेहमीचंच काम’. नेहमीचं काम म्हणत असताना तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. मी काकूला म्हणाले, अग घरचं काम काय कमी असतं का?, दिवसभर जरी केलं तरी कमीच पडतं. काकू म्हणाली, तुमचं बरं बाई, तुम्हाला पगार मिळतो. हे काम काय दिसत नाही. जाऊदे आता सवय झाली, म्हणत लगेच उठून स्वयंपाकाच्या तयारीला लागली. मीसुद्धा तिच्या मदतीला गेले. तिकडे हॉलमध्ये अगदी नेहमीप्रमाणे काका आणि तो गप्पा मारत बसलेला होता! काकांना किंवा त्यालाही स्वयंपाक किंवा अजून काही दुसरी जबाबदारी नव्हती. त्यांचे ऑफिसचे काम ते करून आलेले होते. काकूची मात्र बिनपगारी फुल अधिकारी अशी गत झाली होती. तशी तर मीसुद्धा दुहेरी कामाचा बोजा उचलतच होते. एक काम ज्याला दृश्यमानता होती तर दुसरे काम दिसत असूनही अदृश्य स्वरूपात होतं. ऑफिसात केल्या जाणाऱ्या कामाला पगार मिळत असल्यामुळे ते काम सहजगत्या दिसणार होते. पण घरकाम हे आर्थिक मोजमापाच्या परिघात येत नसल्यामुळे दिसत असले तरी अदृश्यच होतं. पण मग या घरकामाला काहीच महत्त्व नाही का, हा प्रश्न मात्र डोक्यात घोंगावत राहिला.

घरी परत आल्यावर बारकाईने या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्या वेळी कमला भसीन यांच्या ‘अंडरस्टँडिंग जेंडर’ तसेच मेरी ओ’ ब्रायन यांचं ‘द पॉलिटिक्स ऑफ रिप्रॉडक्शन’, मारिया मिस यांचं ‘लेस मेकर्स ऑफ नरसापूर’ या पुस्तकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्रातल्या अर्थव्यवस्थेचे मूलभूत सिद्धांत, राष्ट्रीय उत्पन्न, कर रचना, मौद्रिक व राजकोषीय धोरण या संकल्पना मला क्लिअर होत्याच. त्यामुळे दिसून आलेली आकडेवारी व स्त्रियांचे प्रत्यक्षात असणारे काम यात बरीचशी तफावत जाणवली. त्यामुळे लिंगभाव, पितृसत्ता तसेच अर्थशास्त्राची सैद्धांतिक रचना अशाही संकल्पना स्त्रियांच्या घरकामाचे अदृश्यीकरण करणाऱ्या दिसून येतात. सर्वसाधारणपणे समाजातील कामे उत्पादक किंवा पुनरुत्पादक स्वरूपाची असतात. पैशात मोबदला मिळवून देणारी सर्व कामे ही उत्पादक समजली जातात. तर पुनरुत्पादक काम हे जैविक आणि सामाजिक स्वरूपाचे असते. जैविक पुनरुत्पादन याचा संदर्भ मुलांना जन्म देण्याशी असतो. सामाजिक पुनरुत्पादनाचा संबंध मनुष्याच्या अस्तित्वासाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पालनपोषण आणि सेवाशुश्रूषेच्या सर्व क्रियांशी असतो. मानवी जगण्यासाठी जरी ही कामे महत्त्वाची असली तरी यांची गणना ना काम म्हणून केली जाते ना त्यांना आर्थिक क्रिया म्हटले जाते. त्यामुळे या सर्व क्रिया अदृश्य मान्यताविरहित आणि विनामोबदला असतात. लिंगभावाधारित श्रमविभागणीमुळे स्त्रियांनी काय करावे व पुरुषांनी काय करावे हे ठरवले गेले आहे. सामाजिक परिप्रेक्ष्यात त्याचे वर्गीकरण बायकी कामे व पुरुषी कामे असे आपण करून टाकले आहे. खरे तर पुरुषी आणि बायकी अशी कामाची नैसर्गिक विभागणी नाहीच. पुरुष उत्तम स्वयंपाकी असतात. स्त्रियादेखील अवजड कामे करतात. खरे तर घरकामाच्या प्रत्येक कृती अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक असतात. जेव्हा घरातून एखादा कामगार कामावर जातो तेव्हा तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होऊन कामासाठी जातो व अर्थव्यवस्थेत आपले योगदान देतो. म्हणजेच एका कामगाराला अर्थव्यवस्थेतील कामासाठी सर्व प्रकारची साहाय्यभूत कामे आधी प्रत्येक कुटुंबात केली जातात. त्यामुळे केले जाणारे घरकाम हेदेखील अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे काम असते असा विचारही कधी केला जात नाही. घरात काम करणाऱ्या अनेक स्त्रिया दैनंदिन कामकाजासोबतच वेगवेगळ्या प्रकारची व्यावसायिक कामेदेखील करत असतात. काही स्त्रिया त्यांच्या घरात चालत आलेला पारंपरिक व्यवसाय सांभाळतात, तर काही स्त्रिया शेती करतात, काही स्त्रिया असंघटित क्षेत्रात अनेक स्वरूपाची कामे करतात. परंतु तरीदेखील त्यांचा समावेश कामकाजी स्त्रिया या दृष्टिकोनातून केलेला दिसत नाही.

स्त्रियांचे जैविक पुनरुत्पादन अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे श्रम आहे. कारण जन्माला येणारे बाळ हे अर्थव्यवस्थेसाठी श्रमाचा पुरवठा करणारे असते. अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांनी केलेले घरकाम, पुनरुत्पादक कामांना दृश्यता नसली तरीदेखील बळकट अर्थव्यवस्था उभी राहण्यासाठी स्त्रियांचे हे काम अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु या कामांना केवळ सैद्धांतिक विवेचनापुरते विश्लेषित न करता या सर्व कामांना दृश्यता देणे हे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेतील स्त्रियांच्या योगदानाविषयी खरी आकडेवारी आपल्यासमोर येईल. अर्थशास्त्रात दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्या म्हणजे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. पैशाच्या आधारे केले जाणारे सर्व व्यवहार विनिमय मूल्याचा भाग आहे. परंतु उपयोगिता मूल्य अर्थशास्त्रात केवळ मागणीच्या नियमापुरतेच विचारात घेतले गेलेले दिसते. उपयोगिता मूल्य जे मानवी जीवनाशी प्रत्यक्ष संबंध जोडणारे असते. जीवन असेल तर कमावल्या जाणाऱ्या पैशांना महत्त्व आहे, अन्यथा नाही. आणि प्रत्येक घरात हे उपयोगिता मूल्य निर्माण करण्याचे काम प्रत्येक घरातील स्त्री करत असते. त्यामुळेच घरातील ही सर्वच कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेत आज प्रत्यक्षात स्त्रियांचा श्रम सहभागिता दर हा केवळ २० टक्के एवढा आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत स्त्रिया केवळ २० टक्केच काम करतात असा सरळ अर्थ निघतो. परंतु घराघरात सकाळी लवकर उठून दिवसभर राबणाऱ्या स्त्रियांना बघून वरील आकडेवारीवर विश्वास ठेवायला मन सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळेच बिनपगारी फुल अधिकारी अशीच काहीशी गत स्त्रियांच्या घरकामाच्या बाबतीत दिसून येते. त्यामुळे या सर्व कामांना दृश्यता मिळणे, त्यांचे आर्थिक मूल्य मान्य करणे, घरकामाला आर्थिक विश्लेषणाचा भाग म्हणून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. सविता बहिरट संपर्क : savitabahirat.e@gmail.com

बातम्या आणखी आहेत...