आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान घेऊन कारच्या दिशेने वळण्याआधी प्रवेशद्वारापाशीच असलेल्या एका स्वतंत्र दालनाकडं माझं लक्ष गेलं आणि मी जागच्या जागी थिजलो. गेली अनेक वर्षे या प्रदर्शनाला मी येत असलो, तरी अशा प्रकारचं दालन पहिल्यांदाच पाहत होतो. तिथं लिहिलेलं वाचल्यावर मला त्या क्षणी काय वाटलं, हे शब्दांत सांगणं खूप अवघड आहे. तिथं ठळकपणे लिहिलं होतं - ‘शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री’. पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचं वेड असलं, तरी मला त्या दालनाकडं जावं असं वाटेना. दोन्ही हातांत वस्तूंनी भरलेल्या पिशव्या घेऊन मी तिथंच सुन्नपणे उभा होतो...
श हरात नुकत्याच सुरू झालेल्या विविध गृहोपयोगी, हस्तकलेच्या वस्तू, बचत गटांच्या कलाकृती आणि उत्पादनांच्या प्रदर्शनाला गेलो होतो. दरवर्षी दोनदा महिनाभराच्या कालावधीसाठी भरणाऱ्या या प्रदर्शनाला मी पत्नीसह आवर्जून जातो. त्याचं कारण, एक तर आम्हा दोघांनाही शॉपिंग करणं आवडतं आणि दुसरं म्हणजे, नित्योपयोगी अशा अनेक वस्तू - अगदी कपडेसुद्धा - तिथं स्वस्त दरात मिळतात. परवा या प्रदर्शनाला गेलो आणि अंग अगदी आनंदानं मोहरून गेलं. साधारण पाचशे चौरस मीटर क्षेत्रावर भरलेल्या या प्रदर्शनाला लोक अगदी उत्साहानं आले होते आणि ते पाहून आनंद होण्याचं कारणही तसं वेगळंच होतं. जवळपास दोन-अडीच वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन भरलं होतं आणि इतक्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच लोक तोंडाला मास्क लावून की होईना, पण मोठ्या संख्येनं जमले होते. कोरोनाच्या साथीमुळं गेले अनेक महिने अशा प्रकारे कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येणं शक्य झालं नव्हतं. पण आता हे संकट नियंत्रणात आलं असल्याचंच लोकांच्या या गर्दीवरून स्पष्ट होत होतं.
माझ्या मनात घोळत असलेल्या या भावना तिथं जमलेल्या इतर लोकांच्याही मनात असण्याची शक्यता होती. एक-दीड तासाच्या भ्रमंतीनंतर प्रदर्शनास्थळाच्या एका कोपऱ्यात, बाणाच्या चिन्हाने दर्शवलेल्या ‘एक्झिट’च्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. सामान घेऊन कारच्या दिशेने वळण्याआधी प्रवेशद्वारापाशीच असलेल्या एका स्वतंत्र दालनाकडं माझं लक्ष गेलं आणि मी जागच्या जागी थिजलो. गेली अनेक वर्षे या प्रदर्शनाला मी येत असलो, तरी अशा प्रकारचं स्वतंत्र भव्य दालन पहिल्यांदाच पाहत होतो. तिथं लिहिलेलं वाचल्यावर मला त्या क्षणी काय वाटलं, हे शब्दांत सांगणं खूप अवघड आहे. त्या दालनाच्या प्रवेशदारी ठळकपणे लिहिलं होतं... ‘शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री’.
विविध विषयांवरची पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचं वेड लहानपणापासून लागलेलं असलं, तरी मला त्या दालनाकडं जावं असं वाटेना. दोन्ही हातांत हरतऱ्हेच्या वस्तूंनी भरलेल्या पिशव्या घेऊन मी त्याच जागेवर सुन्नपणे उभा होतो. वाचण्यायोग्य पुस्तकांची किलोच्या मापाने विक्री होणं ही कल्पनाच मला खिन्न करून गेली होती. गोव्यात आणि कोकणात अनेक ठिकाणी बांगडा, तारली वगैरे मासळी वाट्याने विकतात. इतरत्र ती किलोच्या मापाने विकली जाते. काही ठिकाणी केळी डझनावर, तर काही ठिकाणी किलोनं विकली जातात. एक वर्षापूर्वी दमण इथं मेथीची भाजी किलोने विकली जाते, हे पाहून मी असाच गार झालो होतो. तरीसुद्धा एकवेळ हे सारे ठीक. पण, पुस्तकांची किलोने विक्री..? पुस्तकांचं मूल्य कसं मोजलं जावं, याविषयी काही ठोकताळे असू शकत नाहीत. अभ्यासासाठी नोट्स काढलेल्या जुन्या वह्या रद्दीत द्याव्या लागतात, तेव्हा त्या वह्यांचे खरेखुरे मोल त्या नोट्स परिश्रमपूर्वक तयार करणाराच जाणतो. तीच बाब वर्षानुवर्षं गोळा केलेल्या पुस्तकांचीही असते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर असलेले एक स्नेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आणि आपल्या सरकारी निवासस्थानाचा ताबा देण्याआधी त्यांनी आपल्याकडं असलेल्या तांत्रिक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संच हुबळी येथील इंजिनिअरिंग असोसिएशनकडे सुपूर्द केला. देशात विविध ठिकाणी, त्याचप्रमाणं परदेशांत कामानिमित्त गेल्यावर ही पुस्तकं त्यांनी जमा केली होती. काही वर्षांनी परदेशातील एक इंजिनिअरने या ग्रंथालयाला भेट दिली तेव्हा या संग्रहाकडं त्याचं लक्ष गेलं आणि इतकी अमूल्य पुस्तकं कुठून मिळवली आणि या पुस्तकांच्या फोटोकॉपीज मिळू शकतील का, अशी विचारणा त्याने तिथल्या पदाधिकाऱ्यांकडं केली. त्या वेळी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांना त्या पुस्तकांचं खरंखुरं मूल्य समजलं!
ब्रिटिश जेसुईट धर्मगुरू असलेल्या फादर थॉमस स्टीफन्स यांनी गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘ख्रिस्तपुराण’ या मराठी महाकाव्याची रचना केली. देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित झाली नसल्यानं हे पुस्तक पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात रोमन लिपीत छापण्यात आले. त्या दृष्टीने मराठीतील हे पहिले छापील पुस्तक. या ‘ख्रिस्तपुराणा’ची देवनागरी लिपीतील एक प्रत जस्टीन एडवर्ड ॲबट यांना लंडनमधील ‘स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ या ग्रंथालयात आढळली. त्याविषयीचं एक पत्र त्यांनी मुंबईतल्या एक इंग्रजी दैनिकात १९२५ मध्ये लिहिलं. पुण्यात पेपल सेमिनरीत प्राध्यापक असणारे फादर हान्स स्टाफनर यांनी देवनागरी लिपीतील या ख्रिस्तपुराणाची मायक्रोफिल्म मिळवली आणि त्यातून देवनागरी ख्रिस्तपुराणाच्या दोन प्रती केल्या. त्यापैकी एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर वाचनालयात ठेवण्यात आली आहे.
काही पुस्तकांचे मूल्य ठरवणेसुद्धा शक्य नसते, हे या उदाहरणावरून दिसून येतं. माझ्या शहरातल्या एका वाचनालयात गेली अनेक वर्षे मी जातो आहे. काही वर्षांपूर्वी या वाचनालयात पुस्तके निवडण्यासाठी, बदलण्यासाठी येणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा आणि इतरांचा चांगला राबता असायचा. गेली काही वर्षे मात्र तिकडं कुणी फिरकतही नाही. पुस्तकं शोधण्यासाठी ओळीनं लावलेल्या कपाटांकडे मी जातो, तेव्हा उडणाऱ्या धुळीपासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल लावावा लागतो. तिथं शेल्फवर रांगेत रचून ठेवलेल्या पुस्तकांना खूप काळ कुणी हातही लावलेला नाही, हे लगेच कळतं. पण, पुस्तकांचं नाव आणि विषय पाहून यापैकी कुठलं पुस्तक आधी वाचायला घ्यावं, असा गोंधळ उडावा इतकी ती अमूल्य आणि दुर्मिळ आहेत. अशाच स्वरूपाची मौल्यवान ग्रंथसंपदा खासगी, निमसरकारी किंवा सरकारी वाचनालयांत धूळ खात असेल. क्वचितच एखादा रत्नपारखी येतो आणि त्यातून आपल्याला हवी असलेली रत्नं निवडून, गोळा करून जातो.
रस्त्यांवर, फुटपाथवर विक्रीला असलेल्या जुन्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांमधून खूपदा दुर्मिळ असलेली पुस्तके मिळतात, याचा अनुभवही अनेकांना आलेला असतो. त्या दिवशी प्रदर्शनात किलोच्या मापात पुस्तकं विकली जाताना पाहून पुस्तकांविषयीच्या अशा साऱ्या भावनांचा मनात कल्लोळ झाला. छापून तयार झालेली, नवी कोरी अशी ती शेकडो पुस्तकं स्वस्त आणि किलोच्या दरात विकून टाकून निदान काही वाचकांना तरी वाचनसंस्कृतीचा लाभ मिळवून देण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता. न जाणो, त्या पुस्तकांतून काही जणांना ज्याचं मोलही करता येणार नाही, असा आनंद आणि लाभ मिळू शकेल. प्रदर्शन स्थळावरची इतर दालनं गर्दीनं ओसंडत होती, पण पुस्तक विक्रीच्या या प्रशस्त दालनात मात्र काही मोजकेच लोक दिसत होते. इतर भरगच्च दालनांत विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू आणि या दालनात विक्रीला असलेल्या पुस्तकांना तराजूच्या एकाच तागडीत कदापिही मोजता येणार नव्हतं, हे खरंच. पण, वजनात ‘तोलण्या’पलीकडचं त्यांचं ‘मोल’ जाणणारी पारखी दृष्टी मात्र आपल्याकडं असायला हवी!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.