आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:शेतकरी आत्महत्या रोखण्याचे पिरॅमिड…!

एका वर्षापूर्वीलेखक: विनायक हेगाणा
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पिसाळलेल्या हत्तीसारखा आहे. एखादा हत्ती मारायचा असला, तर त्याला नुसत्या गोळ्या घालून भागत नाही किंवा मारता येत नाही. त्यासाठी त्याचे एकेक अंग निकामी करावे लागते. सोंड, पाय, शेपटू आणि शेवटी मध्यभाग. या प्रश्नातही प्रत्येकानं एकेका अंगातही काम केलं, तर शेतकरी आत्महत्येचा हा हत्ती गतप्राण झालाच म्हणून समजा.’ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘शिवार संसद युवा चळवळी’च्या माध्यमातून राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरून काम करणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते विनायक हेगाणा यांच्याशी साधलेला संवाद

प्रश्न : शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या कामाकडे कसे वळालात?
विनायक हेगाणा -
माझं बीएस्सी अॅग्री सुरू होतं. सोबतीला स्पर्धा परीक्षेची तयारी. साल २०१४-१५. कॉलेजची भन्नाट दुनियादारी. सारं मजेत सुरू होतं. आम्ही मित्रांनी ‘अवकाळ’ लघुपट तयार करायला घेतलेला. हा लघुपट पूर्णतः शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित होता. त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना बोलणं, शेती विषयी जाणून घेणं सुरू होतं. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला. तेव्हा त्यांचे अनुभव ऐकणं, घरातली उपाशीपोटी राहणारी तोंड पाहणं सगळं अस्वस्थ करणारं. आपण कुठल्या जगात राहतो आहोत. कॉलेजचं जग आणि हे वास्तवातलं जग खाडकन जमिनीवर आणणारं. सगळं भिन्न. आपण एका भीषणाच्या दारात जाऊन उभे आहोत, असं वाटायचं. याच दरम्यान डॉ. सुनीलकुमार लवटे सरांची भेट घेतली. तिथून सगळंच पालटून गेलं. आपल्याला काय करायचं, कुठं काम करायचंय हे सगळं स्पष्ट होतं गेलं. आपसुकच आतल्या ओढीचं रूपांतर निर्णयात झालं. त्यासाठी सात वेळा विदर्भ, मराठवाडा पिंजून काढला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी, त्यांच्या मुलांशी संवाद साधला. राज्यभर तीनेक हजार कार्यकर्त्यांचं जाळं विणलं. उस्मानाबाद जिल्ह्यात ३०० तरुण कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेले आहेत. यातूनच शिवार संसद युवा चळवळीचं बस्तान बसलं.

प्र. - शेतकरी आत्महत्येची कारणे आपल्याला काय वाटतात?
वि. हे. -
माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं अर्जुनवाड. मी ठरवलं, आपण सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचे वार झेलणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात काम करायचं. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. हो इथंच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. मग या शेतकरी आत्महत्या का होतात, असा प्रश्न पडला. त्याची उत्तरं शोधायचा प्रवास सुरू केला. अभ्यास वाढवत नेला. तेव्हा कळालं की, देशभरात दीड लाखांपेक्षा जास्त संशोधन निबंध शेतकरी आत्महत्येवर लिहिले गेलेत. त्यातून असंही कळलं की, शेतकरी आत्महत्येची दोन प्रमुख कारणं आहेत. त्यात पहिले प्रत्यक्ष कारणे आणि दुसरे अप्रत्यक्ष कारणे. त्यातही प्रत्यक्ष कारणांमध्ये दोन कारणे आहेत. त्यातले एक कर्जबाजीरपणा, दुसरे पाणीप्रश्न. मग हा कर्जबाजारीपणा कशामुळे, पाणीप्रश्न कशामुळे यावरचा उपाय काय...अशी अनेक फोड करता येईल. दुसऱ्या अप्रत्यक्ष कारणांमध्ये जवळपास १७ वेगवेगळ्या समस्येमुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्यात घरात लग्नाला पैसा नसतो, शिक्षणाचा प्रश्न, उपचारावर होणारा खर्च, सामाजिक, राजकीय, मानसिक. थोडक्यात सर्वसामान्य माणूस ज्या काही कारणांमुळे आत्महत्या करतो, ती कारणं.

प्र. -शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मराठवाड्यात त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यातच जास्त का?
वि. हे. -
आम्ही मराठवाडा, विदर्भ, खान्देश अशा सगळ्या भागातील प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, लोकसंख्या, क्षेत्र असं विश्लेषण केलं. राज्यात तशा सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणजे यवतमाळ. मात्र, या विश्लेषणानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्येचं प्रमाण असल्याचं आम्हाला जाणवलं. त्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातूनच आपण काम सुरू करायचं, असं ठरवलं. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त असण्याचे कारण म्हणजे इथे कसले नवे उद्योग नाहीत. नवीन शोध नाहीत. दळवळणाच्या म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. सामाजिक, राजकीय पातळीवरही प्रचंड उदासीनता, अनास्था इथं दिसली. केंद्राच्या नीती आयोगानंही मागास जिल्ह्याच्या थर्ड रँकमध्ये उस्मानाबादचा समावेश केलाय.

प्र. -शेतकरी आत्महत्या रोखण्याचे उपाय काय?
वि. हे. -
शेतकरी आत्महत्येची कारणं आम्हाला मिळाली होती. आता उपाय शोधणं सुरू केलं. त्यासाठी २०१६ मध्ये आम्ही शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय नावाची पुस्तिका काढली. हा एक प्रयत्न होता. या पुस्तिकेचं सर्वत्र वाटप केलं. राज्य सरकारपर्यंत ती पोहचती केली. सरकारला या पुस्तिकेचं महत्त्व पटलं. त्यांनी राज्यतल्या सर्व विद्यापीठांना राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) ही मार्गदर्शन पुस्तिका जनजागरणाच्या हेतूनं बंधनकारण केली. आम्ही फक्त ५८ उपाय सरकारला सुचवले आहेत. खरं तर देशभरातून हजारो उपाय आजवर सुचवले गेलेत. मात्र, त्यांची अंमलबजावणीच होत नाही. ते कागदावर राहतात. शेतकरी उठला की लगेच आत्महत्या करत नाही. त्यापूर्वी तो दहा ठिकाणी वणवण भटकून येतो. कुणाला कर्ज हवं असतं, कुणाच्या मुलाच्या शिक्षणाची फी तुंबलेली असते, कुणाचे पीक हातचं गेलेलं असतं. या दहा ठिकाणी त्याला मदत मिळत नाही. साधा मानसिक आधारही नाही. अनेक जण म्हणतात की, दारूच्या व्यसनामुळे आत्महत्या होतात.

मात्र, संपूर्ण देशभरात दारूमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ४.९ टक्क्यांच्याही खाली आहे. भारतात ३३ लाख संस्था आहेत. महाराष्ट्रात ५ लाख संस्था आहेत. शेतकऱ्यांसाठी तब्बल २३९ योजना आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक कारणासाठी मदत मिळू शकते. आत्महत्येचा फास सहज सैल होऊ शकतो, पण लक्षात घेतो कोण? ही मदत आपल्याला मिळू शकते हे शेतकऱ्यांना माहित नसतं आणि खुर्चीवर असणारा गंभीर नसतो. हे पाहता आम्ही शिवार हेल्पलाइन सुरू केली. त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतो. त्यांचे समुपदेशन करतो. त्यांची एक यादी करतो. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो. अनेकांचा प्रश्न असतो एक, तो सांगतो दुसराच. मग त्या प्रश्नावर आम्ही दहा उपाय शोधतो. दोन उपाय करण्यात आम्ही स्वतः पुढाकार घेतो आणि इतर आठ उपाय करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर उभे राहतो. आतापर्यंत आम्ही दिलेल्या आधारामुळं आत्महत्येच्या उंबरठ्यावरील १६४ शेतकऱ्यांचे प्राण आम्ही वाचविले. आत्महत्या करण्यापासून त्यांना परावृत्त केले. शेतकऱ्यांना फक्त दिशा आणि मानसिक आधार दिला. त्यांना असलेल्या योजना सहज आणि लवकर उपलब्ध करून दिल्या, तर खूप काही मोठं काम करता येतं.

प्र. - कोरोनानंतर शेतीकडे तुम्ही संधी म्हणून कसे पाहता?
वि. हे. -
येणाऱ्या काळात शेतीचे भवितव्य चांगलं आहे. कारण आता नवीन तंत्रज्ञान घेऊन अनेक तरुण शेतीत उतरत आहेत. जवळपास ४५०० स्टार्टअप शेतीमध्ये सुरू झालेत, हे सांगताना मला आनंद होत आहे. या तरुणांना शेती वेगळ्या पद्धतीनं करायचीय. येणाऱ्या काळात सेंद्रीय शेतीला महत्त्व आहेच. त्याची मागणी वाढल्याचंही आपण पाहिलंचय. शहरात सेंद्रीय असा शब्द म्हटला की खरेदीला गर्दी होते. कंपनी शेती येऊ घातलीय. अनेक उद्योजकही शेतीमध्ये उतरतायत. सध्या शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की, कायदे कितीही येऊ द्यात. त्याची गावपातळीवर अंमलबजावणी होताना दिसत नाही. किमान आधारभूत किमतीबाबत आपण बोलतो. ज्या पिकाला ही किंमत लागू आहे, त्यांना तरी मिळते का? उत्तर नाही आहे. मात्र, येणारा काळ असा असेल की, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मागायची गरजही राहणार नाही. सध्या सोयाबीनच्या किमती वाढल्या आहेत, तशा इतर पिकांच्या किमतीही वाढलेल्या दिसतील. त्याला कारण हे शेतीत उतरलेले नवे तरुण आणि त्यांनी शेतीत केलेले बदल हेच ठरेल.

शेळीच्या दुधापासून साबण
विनायक म्हणाले, आजही अनेक लोक राज्यातल्या १९७२ च्या दुष्काळाची आठवण काढतात. या दुष्काळात उस्मानाबादी शेळीनं मोलाची भूमिका बजावली म्हणतात. ही शेळी त्या काळातही टिकली. तिने एकेका शेतकरी कुटुंबाला उपजीविकेसाठी मोठा आधार दिला. आता भारतात तब्बल १४ राज्यात उस्मानाबादी शेळी आहे. या शेळीचा आजही शेतकऱ्यांना मोठा आधार होऊ शकतो. हेच ध्यानात घेऊन आम्ही उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून शिवार साबणाची निर्मिती केली. या प्रकल्पाचं उद्घाटन क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये केलं. आम्हाला अभिमानानं सांगावे वाटते की, आमच्या या साबणाला ऑनलाइन प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरातील मॉलमध्ये त्याची भरभरून विक्री होते. असाच प्रयोग ज्या राज्यात उस्मानाबादी शेळी आहे, तिथे केला तर खूप मोठा आधार शेतकऱ्यांना होऊ शकतो. आमच्या प्रकल्पातून २५० शेतकरी कुटुंब स्वावलंबी झाली आहेत.

शेतकऱ्यांना फिक्स पगार मिळू शकतो!
विनायक म्हणाले, आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्याचे पिरॅमिड मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलवर काम झाले, तर शेतकऱ्यांना महिन्याकाठी नोकरदाराला जसा पगार मिळतो, तसे उत्पन्न मिळू शकते. या पिरमॅड मॉडेलमध्ये आम्ही एकूण सात टप्पे पाडले आहेत. १. एक गुंठा शेती असलेल्यांसाठी. २. पाच गुंठा शेती. ३. दहा गुंठा शेती. ४. वीस गुंठा शेती. ५. चाळीस गुंठा शेती. ६. अडीच एकर शेती. ७. पाच एकर शेती. हे मॉडेल भारतीय केंद्रीय कृषी संशोधन संस्थेला ही (आयसीएआर) आवडले आहे. शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना अधिक उत्पन्न कसे घ्यायचे हे सांगू. सोबतच त्यांच्या निघालेल्या उत्पन्नाला बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहचविण्याचे काम करू अथवा त्यांना तिथपर्यंत कसे जायचे हे सुद्धा सांगू.

खरं तर आम्हाला आमच्या मॉडेलचा प्रयोग करण्यासाठी २० एकर शेती आणि सहा कोटींच्या निधीची गरज आहे. यातला बहुतांश निधी विविध सरकारी योजनांमधून मिळेल. उर्वरित निधी गोळा करण्यासाठी समाजसेवी संस्था, राजकीय नेते, सीएसआर फंड किंवा शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून गोळा करता येईल. फक्त जमिनीची खरी समस्या असेल. ती मिळाली काम अजून नेटानं सुरू करता येईल. अक्षय कुमारने मागे दीड कोटींची मदत दिली, पण शेतकऱ्यांवर किती काम झालं माहिती नाही, अशी खंत व्यक्त केली होती. अनेकदा नितीनजी गडकरी साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर आपण शेतीकडे वळणार असल्याची इच्छा व्यक्त करतात. अशा व्यक्ती पाठिशी उभ्या राहिल्या की, या कामालाही बळ मिळेल.

मुलाखतकार - मनोज कुलकर्णी
swamann@gmail.com

बातम्या आणखी आहेत...