आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:संयमी आक्रमकतेचा विजय

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘संयम गमावणं हे लढाई हरण्यासारखं असतं,’ या महात्मा गांधींच्या शब्दांचं मोल तमाम भारतीयांना मंगळवारी पुन्हा एकदा कळलं. ‘बी’ टीम म्हणून हिणवले गेलेले नव्या दमाचे वीर ब्रिस्बेनच्या ‘गॅबा’वर विजयाचा तिरंगा फडकावत निघाले, तेव्हा गेल्या काही दिवसांत भारताच्या क्रिकेट संघाने दिलेल्या मनोशारीरिक झुंजीची दृश्येही स्मृतिपटलावरून पुढे सरकत होती. शत्रू आपल्याला चूक करण्यासाठी उद्युक्त करत असताना त्यात न अडकता संयमाने, पण तितक्याच ठामपणे ध्येय साध्य करण्याच्या कलेला ‘कंट्रोल्ड् अॅग्रेशन’ अर्थात नियंत्रित किंवा संयमी आक्रमकता म्हटले जाते. भारताने याच कलेचे दर्शन घडवत कांगारुंना त्यांच्याच भूमीत धूळ चारली. ही कसोटी मालिका भारतासाठी कमालीची आव्हानात्मक होती. कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती आणि भरवशाचे अनेक खेळाडू जायबंदी झालेले, अशा स्थितीत संघ खेळत होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली तो आत्मविश्वासाने मैदानात उतरायचा, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रेक्षक भारतीय संघाचे खच्चीकरण करण्यात कसर सोडत नव्हते. असभ्य, वर्णद्वेषी शेरेबाजीच्या जोडीला चेंडू अंगावर टाकून जायबंदी करण्याचे प्रकार सुरू होते. अशा स्थितीत भारताचे खेळाडू संयमाने त्याचा सामना करीत राहिले. दोन्ही संघांनी एकेक कसोटी जिंकली आणि तिसरी बरोबरीत सुटल्यानंतर चौथी कसोटी जिंकण्यासाठी तुल्यबळ संघर्ष होणार, हे उघड होते. बुमराह जखमी झाल्याने या कसोटीत भारतीय संघ आणखी कमकुवत झाला होता. त्यातच कांगारुंचा रडीचा डाव या सामन्यातही सुरूच होता. मात्र, त्याला धैर्याने तोंड देत नवख्या खेळाडूंनी अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. वर्णद्वेषी शेरे ऐकूनही मनोबल ढळू न दिलेल्या शिराजने पहिल्या डावात पाच बळी घेत कांगारूंची बोलती बंद केली. शिराज, शार्दूल असोत की शुभमान गिल, वॉशिंग्टन सुंदर; या प्रत्येकाने लहान वयात कमालीची परिपक्वता दाखवली. अनुभवी, ज्येष्ठांनाही कदाचित जमणार नाही अशी संतुलित, पण निश्चयी अशी खेळी केली. भारताचे हे यश अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. जगात सगळीकडे द्वेषाला अतिद्वेषाने आणि हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर दिले जात असताना भारतीय संघाने संयम दाखवत मिळवलेला ऐतिहासिक विजय केवळ क्रिकेटसाठी नव्हे, तर देशासाठीही अधिक आश्वासक आहे.

बातम्या आणखी आहेत...