आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:शेवटच्या घटका मोजणारं सोयाबीन...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन ॲक्शन म्हणाला, तेव्हा मी आभाळाकडं पाहून शेतात राबणारे माझे वडील दादा, चुलते अण्णा अन् आबांचा चेहरा क्षणभर आठवला नि जोरात किंचाळलो... तेव्हा डोळ्यांत एवढं पाणी आलं, की तिथं लावलेला झंडू बाम पार धुवून गेला...

ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासह काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. पोटच्या लेकरासारखी वाढवलेली पिके मातीमोल झाली. या विदारक प्रसंगातूनच ‘बुचाड’च्या कथेचा जन्म झाला. कथा सुचल्यानंतर अवघ्या दोन तासांत मी ती लिहून काढली. आजवर शेतकऱ्यांवर खूप सारे चित्रपट आणि लघुपट निर्माण झाले. पण, याआधी कधीच न पाहिलेले दुःख ‘बुचाड’मध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला.

मी कुणी प्रशिक्षित दिग्दर्शक नव्हतो. माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता. कॅमेऱ्याला ट्रायपॉड नव्हता. ध्वनिमुद्रणासाठी बूम माइक नव्हता. प्रशिक्षित कलाकार नव्हते. बस्स, होते ते फक्त माझ्या लिखाणावर विश्वास ठेवून मदत करणारे मित्र आणि शेतात शेवटच्या घटका मोजत असलेलं सोयाबीन! काहीही होवो पण ‘बुचाड’चे स्वप्न पूर्ण करायचेच, असा निश्चय मी केला. सचिन नलावडे आणि अमोल लोहार या मित्रांना स्क्रिप्ट वाचून दाखवल्यावर त्यांनीही लगेच हा प्रोजेक्ट करण्यासाठी होकार दिला आणि इंगित प्रॉडक्शनच्या बॅनरखाली आम्ही काम सुरू केले.

मग सुरू झाला कथेतील मुख्य पात्रासाठी अभिनेता अन् अभिनेत्रीचा शोध. आमच्या गावातील वैष्णवी जानराव या तरुणीने सुमनचे पात्र करण्यास होकार दिला. लहान मुलगी कारीच्या पात्रासाठी वैष्णवी काळे आणि लहान मुलाच्या पात्रासाठी माझी सात महिन्यांची मुलगी कादंबरी गरड हिची निवड केली. इतर भूमिकांसाठी पांगरी गावातील मित्रमंडळींचे सहकार्य लाभले. मात्र, भीमा या मुख्य पात्रासाठी अभिनेता सापडेना. मिळाला तरी त्याला पूर्ण भूमिका समजावून सांगण्यात वेळ जाईल म्हणून नाईलाजाने लेखन आणि दिग्दर्शनासोबत अभिनयाची जबाबदारीही स्वतःकडे घेऊन मी ‘बुचाड’च्या निर्मितीची अर्धी लढाई जिंकली. सचिन नलावडेने त्याचे कॅमेरे घेऊन छायामुद्रण केले. अमोल लोहारने सॉफ्टवेअरवर संकलन केले. सचिन, अमोल आणि वैष्णवी यांच्या उपलब्ध वेळेनुसार मी चित्रीकरणाचे शेड्यूल बनवले होते. सर्व लोकेशन्स आठवडाभर आधीच फिरून ठरवले. पांगरीमधील डॉ. नारकरांचा वाडा, सत्यवान गरड यांचे घर, प्रा. खंडोबा भराडे यांचे सोयाबीनचे शेत आणि अनिल गरड यांच्या शेतातील सोयाबीनचे बुचाड यासह चिंचोली आणि ढेंबरेवाडी शिवारातील लोकेशनवर लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले.

...अन् डोळ्यांत आपोआप पाणी आलं!
‘बुचाड’चा नायक भीमा प्रचंड दुःख झाल्याने मोठमोठ्याने रडत असतो आणि गावातील काही लोक त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात, हा सीन शूट करायचा होता. रडण्याच्या सीनमध्ये डोळ्यांत पाणी असावे म्हणून मी घरून झंडू बामची डबी खिशात घेऊन गेलो होतो. फर्स्ट टेकच्या आधी थोडा झंडू बाम मी डोळ्याखाली लावला आणि टेक दिला. पण, डोळ्यात थोडेही पाणी आले नव्हते. सेकंड टेकच्या वेळी सचिन अॅक्शन म्हणाला तेव्हा मी आभाळाकडं पाहून शेतात राबणारे माझे वडील म्हणजे आमचे दादा, चुलते अण्णा अन् आबा यांचा चेहरा क्षणभर आठवला नि जोरात किंचाळलो... तेव्हा डोळ्यांत एवढं पाणी आलं, की तिथं लावलेला झंडू बाम पार धुवून गेला... यातून मी एक गोष्ट शिकलो, की अभिनय जिवंत करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा जिवंत असावे लागतात. तसं झालं तर तुमची कलाकृतीही जिवंत होते.

‘सिनेग्लोब’साठी निवड...
शॉर्टफिल्मचे संकलन झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ती पाहिली तेव्हा डोळ्यातून आपसूकच दोन थेंब बाहेर पडले. तेव्हाच ठरवले, की ही फिल्म वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलला पाठवायची. याआधी एक प्रयत्न म्हणून मी लॉकडाऊन या विषयावर आधारित असलेली ‘दैना' ही शॉर्टफिल्म बनवली होती. आपल्यातील गुणवत्ता जगासमोर आणण्याचा तो पहिला प्रयत्न होता. पण, ती कुठल्याही फिल्म फेस्टिव्हलला न पाठवता थेट यू ट्यूबवर रिलीज केली होती. तिलाही भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘बुचाड’ ही फेस्टिव्हलला पाठवलेली माझी पहिली शॉर्टफिल्म आहे. तिला तेलंगणातील राष्ट्रीय कम्युनिटी मीडिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. ‘दिव्य मराठी’च्या “रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट लघुपट म्हणून निवड झाली. मध्य प्रदेशातील उज्जैनी फेस्टिव्हलमध्ये हजारो लघुपटांतून स्क्रीनिंगसाठी निवड झाली आणि नुकतीच स्वित्झर्लंडमधील सिनेग्लोब फिल्म फेस्टिव्हलसाठीही ‘बुचाड’ची निवड झाली आहे.

विशाल गरड
संपर्क - ७०२०९४१२४४

बातम्या आणखी आहेत...