आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:बाते करो मुझसे..

विश्राम ढोले18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. मायक्रोसॉफ्टला नुकतेच त्यासंबंधीचे एक पेटंटही मिळाले आहे. या पेटंटमध्ये अशा एका चॅटबॉटचा म्हणजे संवादी यंत्रमानवाचा आराखडा आहे की जो मृत व्यक्तीच्या नुसत्या आवाजातच नव्हे तर तिचे आकलन आणि शैलीनुसार संवाद साधू शकतो. एका अर्थाने एखाद्या व्यक्तीचे अशारिर संवादरूपच या चॅटबॉटच्या माध्यमातून अस्तित्वात आणता येते. आशारिर- अपार्थिव पण संवादरुपी अस्तित्व. म्हणूनच मृत व्यक्तीच्या बाबतीत या तंत्रज्ञानाची उपयोगिता अधिकच प्रकर्षाने जाणवते.

कल्पना करा. एखाद्याचे श्राद्ध सुरू आहे. पिंड तयार आहे. श्राद्ध घालणारा मृत व्यक्तीची इच्छा काय असेल याचा त्याच्या परीने अंदाज बांधतोय. पण कावळा शिवायला तयार नाही. मग उपस्थितांपैकी कोणीतरी फोनवर एक अँप सुरू करतो... आणि आश्चर्य.. अँपमधून मृत व्यक्तीच्या आवाजातच तिची अतृप्त इच्छा ऐकू येते. कावळा शिवो न शिवो. श्राद्ध घालणाऱ्याचा संकल्पाचा प्रश्न तरी सुटतो. आता श्राद्धावर वगैरे तुमचा विश्वास नसेल पण नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज तुम्ही भक्तीभावाने पहात असाल तर मग "ब्लॅक मिरर'च्या दुसऱ्या पर्वातील "बी राईट बॅक' हा एपिसोड आठवा. त्यातील मार्थाचा प्रियकर अँश अपघातात गेलाय. तिला त्याला काही ‘पोटातलं’ सांगायचं होतं. पण ते आता कायमचं राहून गेलं असतं. मग कोणीतरी तिला एका कंपनीने पुरविलेल्या डिजिटल सुविधेविषयी सुचविते. मार्था मग त्या डिजिटल सुविधेसमोर बसून म्हणते, “मी इथे आली ते फक्त हे सांगायला की, मी गरोदर आहे.” आणि आश्चर्य, त्या सुविधेतून अँश बोलू लागतो, “वॉव.. मी बाप बनणार..खरतर आत्ता मी तुझ्यासोबत असायला हवं होतं.“

सध्या जरी हे दोन्ही प्रसंग कल्पनेचे खेळ असले तरी ते प्रत्यक्षात येऊ शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मायक्रोसॉफ्टला नुकतेच त्यासंबंधीचे एक पेटंटही मिळाले आहे. या पेटंटमध्ये अशा एका चॅटबॉटचा म्हणजे संवादी यंत्रमानवाचा आराखडा आहे की जो मृत व्यक्तीच्या नुसत्या आवाजातच नव्हे तर तिचे आकलन आणि शैलीनुसार संवाद साधू शकतो. या पेटंटपासून व्यापारी तत्वावर सेवा देण्याचा मायक्रोसॉफ्टचा सध्या जरी विचार नसला व्यक्तीची डिजिटलप्रत काढण्याच्या प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा या पेटंटमुळे गाठला गेला आहे. सध्या हे पेटंट चॅटबॉटच्या स्वरुपात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या परिभाषेत बॉट किंवा रोबॉट म्हणजे एखादे विशिष्ट काम करू शकणारी स्वयंचलित आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर. त्यानुसार स्वयंचलित पद्धतीने संवाद साधण्याचे काम करू शकणाऱ्या बॉटला चॅटबॉट किंवा तंत्रसंवादक म्हणतात. अँपलमधील सिरी किंवा अमेझॉनची अलेक्सा या अशाच तंत्रसंवादक सेवेची काही प्रगत उदाहरणे. अर्थात अशा चॅटबॉट सेवा बऱ्याच आहेत. ज्या संवादांमध्ये बऱ्यापैकी ठराविक साच्याचे प्रश्न विचारले जातात किंवा माहितीचे आदानप्रदान केले जाते तिथे चॅटबॉट प्रभावीपणे काम करू शकते. कारण या ठराविक किंवा पठडीबाज संवादाची विदा, त्याचा अनुक्रम, त्यातील वाटावळणे वगैरे आज्ञावलीत आधीच भरुन ठेवणे तुलनेने सोपे असते. अशा आज्ञावली गुगलबाईसारख्या एकाच आवाजात, एकाच लयीत आणि ठराविक पद्धतीचा, मुख्यत्वे प्रश्नोत्तर स्वरुपाचा संवाद साधू शकतात. पण प्रत्यक्षातील संवाद ठराविक प्रश्नोत्तरे किंवा हवापाण्याच्या औपचारिक गप्पा यापेक्षा गतिमान, गुंतागुंतीचा आणि प्रवाही असतो. म्हणूनच अशा प्रकारचा तंत्रसंवाद घडवून आणायचा असेल तर अधिकाधिक विदा, त्याचे गतिमान विश्लेषण करणारी आज्ञावली तसेच व्यक्तिनुसार बदलती संवादशैली व भाषिक गुंतागुंत ‘आत्मसात’ करु शकणारी कृत्रिम प्रज्ञा यांची गरज असते.

मायक्रोसॉफ्टच्या पेंटंटचे प्रमुख वैशिष्ट्य नेमके इथेच आहे. मायक्रोसॉफ्टची कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारीत तंत्रसंवादक प्रणाली व्यक्तीनुसार संवाद व्यवहार बदलू शकते. हा बदल फक्त व्यक्तीच्या आवाजाचा पोत, त्याची उच्चारणशैली एवढ्यापुरताच मर्यादित राहणार नाही तर बोलणाऱ्याच्या एकुणच व्यक्तित्वाचे बऱ्यापैकी प्रतिबिंब त्यात पडेल असा कंपनीचा दावा आहे. एका अर्थाने एखाद्या व्यक्तीचे अशारिर संवादरूपच या चॅटबॉटच्या माध्यमातून अस्तित्वात आणता येते. आशारिर- अपार्थिव पण संवादरुपी अस्तित्व. म्हणूनच मृत व्यक्तीच्या बाबतीत या तंत्रज्ञानाची उपयोगिता अधिकच प्रकर्षाने जाणवते.

पण प्रत्यक्षात हे कसे घडते कशाच्या आधारावर? तंत्रसंवादक आज्ञावलीला इतके व्यक्तीसापेक्ष रुप कसे देता येते? ते घडते आपणच सोडलेल्या डिजिटल सुगाव्यांच्या आणि विदेच्या आधारे. म्हणजे असे की आपण सोशल मिडियावर आपले अनेक फोटो, व्हिडिओ टाकत असतो. अनेक विषयांवर व्यक्त होत असतो. मत आणि प्रतिक्रिया देत फिरत असतो. शिवाय अनेक ठिकाणी आपला आवाज डिजिटल रुपात साठविलेला असतो. या सगळ्यांची योग्य व पुरेशी विदा मिळत गेली तर आपल्या व्यक्तिमत्वासंबंधी, आपल्या संभाव्य प्रतिसाद-प्रतिक्रियांविषयी काही ढोबळ आडाखे बांधता येतात. इतकेच नव्हे तर आपला आवाज आणि उच्चारण शैली याचीही नक्कल करता येते. या सगळ्या गुंतागुंतीच्या आज्ञावलीला जिवंत डेटाची, भाषिक आणि व्याकरणासंबंधी नियम व अपवादांची जोड दिली तर जिवंत-प्रवाही संवाद करू शकेल असे तंत्रसंवादक तयार करता येतात. सध्या या तंत्रसंवादकांच्या संवादाला काही मर्यादा असल्या तर ही स्थिती फार काळ टिकणार नाही. कारण व्यक्तीसापेक्ष विदा, कृत्रिम बुद्धीमत्तेचे तंत्रज्ञान आणि नैसर्गिक आवाजामध्ये बोलू शकणाऱ्या आज्ञावली वेगानेच विकसित होत राहणार आहेत. तुमच्याविषयी जितकी डिजिटल विदा जास्त तितका तुमच्या शारिर आणि संवादी व्यक्तिमत्वाशी अधिक मेळ खाणारा तंत्रसंवादक तयार होऊ शकेल असा हा तर्क आहे. मायक्रोसॉफ्टचे पेटंट सध्या फक्त ध्वनिरुपातील तंत्रसंवादकापुरते मर्यादित आहे. पण त्याला द्विमिती किंवा त्रिमिती प्रतिमेची जोड देणे विशेष अवघड नाही. त्यामुळे ज्याची भरपूर डिजिटल विदा उपलब्ध आहे अशा व्यक्तीचे आभासी पण जिवंत-संवाद साधू शकणारे प्रतिरुप येत्या काही वर्षांमध्ये पहायला- अनुभवायला मिळू शकते. "ब्लॅक मिरर'मधील अँशच्या मृत्यूनंतरचे आभासी वास्तव अनेकाच्या बाबतीत लागू होऊ शकते.

अर्थात हे जसे मृताच्या बाबतील लागू आहे तसेच ते जिवंत व्यक्तीच्या बाबतीतही लागू आहे. असे संवादी प्रतिरुप तयार करण्यासाठी स्वर्गीय होण्याचीच वाट पाहिली पाहिजे असे काही नाही. जिवंत असतानाच आपली अधिकाधिक विदा देऊन, आपल्या शैलीचे अधिकाधिक प्रशिक्षण देऊन तंत्रसंवादकाला अधिक नेमकेपणे, हुबेहुबपणे प्रशिक्षित करता येऊ शकते. असे झाले तर मरावे परि किर्तीरुपे उरावे असा जुना विचार बाळगण्याचीही गरज नाही. दुसऱ्याच्या मनात किर्तीरुपाने उरण्याऐवजी आपल्या प्रतिरुपाने संवादी रुपात उरण्याचीही सोय हे तंत्रज्ञान करून देते. अर्थात शारिर अस्तित्व, मृत्यू, संवाद या सारख्या खोलवरच्या गोष्टींना स्पर्श करण्याची ताकद असलेल्या या तंत्रज्ञानामुळे काही नैतिक प्रश्न निर्माण होणार हे उघड आहे. विदेच्या वापरातून होणारा खासगीपणाचा संकोच, आज्ञावलीतून होणाऱ्या संवादामुळे होणाऱ्या उत्तरांच्या गफलती, तंत्रसंवादकाच्या माध्यमातून होऊ शकणारी फसवणूक, त्याची नैतिक जबाबदारी, या सगळ्यातून शारिर अस्तित्वाला- त्याच्या वैशिष्ट्यांना मिळणारे एक खोलवरचे आव्हान असे अनेक नैतिक पेचाचे प्रश्न या साऱ्या तंत्रज्ञानातून निर्माण होतात. सध्या त्याची नेमकी उत्तरे देणे अवघड आहे. पण उत्तरांच्या प्रतिक्षेत थांबून राहील असे तंत्रज्ञानाच्या बाबतीत सहसा घडत नाही. आणि उत्तरांसाठी थांबून राहयचे हा व्यापारी तर्काने चालणाऱ्या भांडवली व्यवस्थेचा स्वभाव नाही. त्यामुळे अशा कुठल्या पेचाचा विचार न करता हे तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवा विकसित होत जाणार हे बऱ्यापैकी स्पष्ट आहे.

पण या सगळ्यांच्या मुळाशी संवादाची एक अस्सल मानवी असोशी आहे. एरवीच्या आयुष्यात संवाद कमी होत असला तरी आभासी जगातला संवादव्यवहार वेगाने वाढत आहे. आता त्यात या तंत्रज्ञामुळे त्यात मृत व्यक्तीशी आभासी संवाद साधण्याची सोय होऊ घातली आहे. आपल्या प्रिय पण मृत व्यक्तीशी तसाही माणून कल्पनेच्या पातळीवर अनेकदा संवाद साधतही असतो. त्या व्यक्तीच्या कपड्यातून, वस्तूंमधून, फोटोतून तिच्या अस्तित्वाचा प्रतिकात्मक अनुभव घेत असतो. त्याला अशी आभासी का होईना पण जिवंत संवादाची जोड मिळाली तर तो खरच उत्कट अनुभव होऊ शकतो. आपल्या कोवळ्या मुलीच्या अकाली मृत्यूचे दुःख सहन करणाऱ्या एका कोरियन आईने आभासी वास्तव निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साह्याने २०१६ साली आपल्या मृत मुलीशी असा एक हृद्य संवाद साधला होता. डोक्याला लावलेल्या कृत्रिम चष्म्यातून, कानाला लावलेल्या हेडफोन्समधून आणि हाताला लावलेल्या कृत्रिम स्पर्शसंवेदकातून तिने आपल्या मुलीच्या आभासी प्रतिमेशी खरच संवाद साधला, तिला स्पर्श केला. त्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहिली तर नकळत आपल्याही डोळ्यात पाणी तरळते.

हृषिकेश मुखर्जीच्या "आनंद' या भावस्पर्शी चित्रपटातील शेवटचा प्रसंग असाच उत्कट आहे. एरवी सतत बडबड करून बाबू मोशायला (अमिताभ बच्चन) भंडाऊन सोडणारा आनंद (राजेश खन्ना) निष्प्राण होऊन पडलाय. आणि त्याच्या छातीवर डोके टेकून बाबू मोशाय रडत रडत म्हणतोय, “चूप क्यो हो.. बाते करो मुझसे. बाते करो मुझसे”आणि इकडे योगायोगाने सुरू राहिलेल्या आनंदच्याच आवाजातील टेप मधून अचानक आवाज येतो, “बाबू मोशाय.. जिंदगी और मौत उपरवाले के हात है जहाँपनाह.. उसे तो न आप बदल सकते है न मै”.. सत्तरीच्या दशकातील आनंदमध्ये मृत मित्राचा असा संवाद केवळ यांत्रिक योगायोगाने घडतो. एकविसाव्या शतकातही जिंदगी आणि मौत जरी उपरवाल्याच्याच हातात असली तरी मृताशी संवादासाठी मात्र योगायोगवर विसंबून राहण्याची गरज नाही. त्या आनंदासाठी हे तंत्रज्ञान पुरेसे आहे..

vishramdhole@gmail.com

(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)