आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:मावळत्या दिवसांशी उगवतीच्या पैजा...

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रानशिवाराच्या, शेतीमातीच्या कविता लिहिणारे एक कवी आपल्या कवितेत कोरडवाहू आणि ओलिताची शेती करणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांच्या परिस्थितीविषयी भाष्य करताना म्हणतात, ज्यांच्या घरी जमीन-जुमला, दुध-दुभती जनावरं, घर, घरगडी, नोकरचाकर आहेत, अशा संपन्न शेतकरी कुटुंबातली स्त्री ही भूमिहीन, मजूरदार, गरीब शेतकरी कुटुंबातल्या स्त्रीपेक्षा तुलनेने अधिक सुखी असते. हा समज प्रत्यक्ष शेतकरी कुटुंबातल्या स्त्री-पुरुषांचाही झालेला असतो, परंतु दुय्यम सामाजिक स्थान असलेल्या वेगवेगळ्या वर्गातल्या सर्वच स्त्रियांची अवस्था एकमेकींपेक्षा फार वेगळी नसते. उलट, गरीब शेतकरी कुटुंबातली स्त्री ही बऱ्याच बाबतीत सधन शेतकरी कुटुंबातल्या स्त्रीपेक्षा सापेक्षत: अधिक जास्त स्वतंत्र असू शकते. हे गरिबीचं गौरवीकरण नाही; पण ग्रामीण स्त्रियांच्या जीवनाविषयीची ही बऱ्याच ग्रामीण पुरुष कवींची सरधोपट जाणीव आहे. ती मात्र बदलली पाहिजे. मराठीत काही मोजके कवी बदलत्या ग्रामीण आणि कृषिजीवनाचा वेध घेत आहेत. परंतु, साधारणतः पुरुष कवींकडून लिहिली गेलेली कृषिविषयक कविता ही पुरुषप्रधान समजुतीच्या निकषांवरच आधारलेली होती. शेतीत राबणारा शेतकरी, विविध शेतकरी योजना, न परवडणारी शेती, शेतमालाला न मिळणारा भाव यात भरडला जाणारा जगाचा पोशिंदा शेतकरी कवितेतून येतो, परंतु शेतकरी स्त्री, तिचे स्वतंत्र अस्तित्व असलेली स्त्री मात्र कवितेत कुठेही चितारली गेली नाही. ‘चांदवडची शिदोरी : स्त्री-प्रश्न’ या पुस्तिकेत शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी म्हणतात, “पहाटे कोंबडा आरवल्यापासून ते रात्री उशिरा अंथरुणाला पाठ लागेपर्यंत शेतकऱ्याघरची लक्ष्मी दररोज पंधरा-सोळा तास कष्टत असते; भाकरतुकडा झाल्यावर ती शेतावर जाते आणि सांजी झाल्यावर वाटेने काटक्याकुटक्या गोळा करीत परत येते. घरी आल्यावर पुन्हा एका मागोमाग एक कामे. यातील घरची कामे सोडून दिली आणि फक्त शेतातील कामे मोजली तर बायांच्या घामाचे जे थेंब मातीत जिरतात, त्यांची संख्या मातीत पडलेल्या, पुरुषांच्या घामाच्या थेंबांपेक्षा दुपटीने अधिक असते. हे केवळ काव्य नाही, याला अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शास्त्रीय आकडेवारीचा पुरावा आहे. शेतकऱ्यांना घामाचे दाम हवे तर त्यांना मिळणाऱ्या दामाच्या दुपटीने दाम लक्ष्मीला मिळायला हवे, पण तिला तर काहीच मिळत नाही. जमिनीवरच्या एखाद्या तुकड्यावरचा मालकी हक्क तर सोडाच, पण रोजाने येणाऱ्या मजुराइतकीही कमाई शेतकऱ्याच्या कारभारणीला म्हणजे शेतमालकिणीला मिळत नाही. शेतीच्या प्रश्नाकरिता शेतकरी संघटना उभी राहिली, शेतकऱ्याच्या लक्ष्मीकरिता कोण उभे राहणार? ही शेतकरी स्त्रीची वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकरी स्त्रीचे प्रश्न आणि दुःख दुरुन पाहणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या, शेती-मातीच्या, निसर्गाच्या कविता, गाणी लिहिणाऱ्या कवींना कशी कळणार? मात्र, स्त्रीवादी चळवळीच्या उदयानंतर वा स्त्रीवाद समजलेली कविता शेतकरी स्त्रीप्रश्नाचाही वेध घेते. ८० च्या दशकापासून शेतकरी व स्त्रीवादी चळवळीच्या आणि ग्रामीण चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण-शेतकरी स्त्रीजीवन बदलले; पण ग्रामीण जीवन मात्र पारंपरिकच राहिले. त्यामुळे ग्रामीण शेतकरी कविताही बदलली नाही. कल्पना दुधाळ मात्र याला अपवाद आहेत. ग्रामीण शेतकरी कविता विपुल नसली; तरी स्वतः शेतकरी असलेल्या कल्पना दुधाळांच्या कवितेने कवितेच्या क्षेत्रात खळबळ माजवली. ग्रामीण समाजातील पुरुषप्रधानतेची योग्य जाण असल्यामुळे कवयित्री ‘गावाकडे चला’ अशी आत्ममग्न भाषा बोलत नाहीत आणि गावाचे गौरवीकरणही करत नाहीत; तर त्यातले ताणेबाणे, बारकावे आणि शेतकरी स्त्रीची दुरवस्था त्या चित्रित करतात, “डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना । रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना । उभारलेलं बुजगावणं । चुना लावून मडक्याला । त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला।।” किंवा “लेक चालली ग पुढं मागं वाट शितडली । मन मोकळं करत लेक वावरात गेली । बोरीवर लपलेल्या का ग घाबऱ्या भोरड्या? वळ लेकीचं दिसलं पाठीवरचं उघड्या । लिंबावरच्या लिंबोळ्या कशा चिंबरून ओल्या । रडताना लेकीनं गं लाल डोळ्यांनी पाहिल्या । मायलेकीच्या गं ओव्या नाही रचलेल्या कुणी । आपोआप उफाळतं जसं झऱ्याचं गं पाणी ।।” (“धग असतेच आसपास”) खरं तर, बायकांची स्वत:ची मतं, प्रश्न, दुःख सांगण्याची शक्ती पार खुंटून गेलीय. कित्येक वर्षांच्या कोंडमाऱ्यानंतर, चांदवडच्या शिदोरीच्या निमित्ताने शेतकरी संघटनेच्या बैठकांत महिला बोलू लागल्या. तशा या कवयित्रीच्या रुपात शेतकरी बाया बोलू लागल्यात. हे बोलणे महत्त्वाचे आहे. कवी, समीक्षक देवानंद सोनटक्के त्यांच्या ‘सिझर कर म्हणतेय माती’मधल्या ‘बाय आणि गाय’ कवितेविषयी म्हणतात, “गाय, बाय अन् पृथ्वीमाय ही एकरूपता आहे. तिघींचेही प्रयोजन पुरुषप्रधान आणि अपत्यसापेक्षच आहे. ज्या दिवशी तिघीही नापीक होतील, त्या दिवशी या पुरुषी, सर्जनापेक्षा उत्पादनाला महत्त्व देऊन सृष्टीला ओरबाडणाऱ्या संस्कृतीत त्यांचे प्रयोजनच संपेल. याचीच चीड, खंत, वेदना दुधाळ यांच्या कवितेत दिसते. “डोक्यावर गठुडी घेऊन झपाझपा चालताना । मावळत्या दिवसांशी उगवतीच्या पैजा लावतात बाया । हिमतीवर पैजा जिंकतात बाया । या शेतीप्रधान देशाच्या नुसत्या नागरिक नव्हे । जिवंत पुरावेच जगतात बाया।।” असा आशावाद ही कविता व्यक्त करते. पूर्वी शेतकरी कवितेत येणाऱ्या जाणिवेत एक कृतकता होती. पुरुषीपणाचा आत्मगौरव होता, पण आताच्या ग्रामीण शेतकरी स्त्रियांच्या कवितेवर स्त्रीवादाचा प्रभाव आहे. शेतकरी स्त्रीची व्यथा, प्रश्न आहेत. स्त्री असो दलित असो वा तृतीयपंथी, त्यांचा आवाज हा त्या समूहाचा स्वतःचा सच्चा आवाज असतो. त्यांच्या वतीने लिहिलं जाणारं साहित्य हे तितक्या प्रांजळपणे, सच्चेपणाने लिहिलं जाईलच, असं नाही. म्हणून, शेतकरी / ग्रामीण स्त्रियांविषयी इतरांच्या लेखनापेक्षा कल्पना दुधाळ यांच्यासारख्या जाणीव जागृत कवयित्रीची कविता अधिक कालसुसंगत वाटते. अशा आशावादी कल्पना दुधाळ जमिनीत पडलेल्या धान्यांच्या दाण्यांतून रुजून येणाऱ्या रोपांतील दाण्यांप्रमाणे गावागावांत तयार होवोत, हीच अपेक्षा!

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...