आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट लाखमोलाची:याचसाठी होता का अट्टहास?

ॲड. अनंत खेळकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दो न वयोवृद्ध व्यक्ती आपसात चर्चा करीत होत्या. पहिले गृहस्थ म्हणाले, “आयुष्य खरंच किती वेगवेगळी वळणं घेतं. विवाहानंतर पती-पत्नीच्या नात्यात खूप गोडवा असतो. त्यांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. पुढे संसाराचा व्याप वाढत जातो. ती आपल्या लेकरांमध्ये अन् परिवारात गुंतून जाते. पतीही आपल्या कामात व्यग्र राहतो. दोघांनाही आपल्याला दुर्लक्षित केलं जातंय, असं उगीचच वाटू लागतं. कधी-कधी तर त्या दोघांतही दुरावा निर्माण होऊ लागतो. पण, जसजसा काळ पुढे सरकत जातो तसतसं म्हातारपण वाट्याला येतं. मुले आपापल्या संसारात रमून जातात. मग म्हाताऱ्या जोडप्यात एकाकी पडल्याची भावना जागृत होते. आपल्या जोडीदाराची आवश्यकता वाटू लागते.” त्यावर लगेच दुसरे गृहस्थ म्हणाले, “अगदी खरं आहे तुमचं. आयुष्यभर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जगलो. जोडीदाराकडे दुर्लक्ष करीत राहिलो. पैसे कमावण्याच्या नादात आरोग्य गमावले. आता तेच आरोग्य पुन्हा मिळावं म्हणून पैसे खर्च करीत आहोत. शेवटी म्हातारपणात गरजा तरी काय असतात? एक लहानशी खोली, एक पलंग, दोन खुर्च्या, एक पंखा आणि औषध-गोळ्यांनी खचाखच भरलेला डबा. जर याच आपल्या गरजा होत्या, तर त्यासाठी आयुष्यभर किती दगदग केली. त्यावेळी हा प्रश्न आपण मनाला विचारला नाही की या ओळी आठवतात... ख्वाहिशों के बोझ में तू क्या कर रहा है? इतना तो जीना भी नहीं है जितना तू रोज़ मर रहा है.. हे ऐकून पहिले गृहस्थ म्हणाले, “जसं जोडीदाराचं आहे, तसंच मुलांचं आणि समाजाचंही आहे बघा. माणूस आयुष्यभर विविध जबाबदाऱ्या पार पाडतो. सगळ्यांसाठी शक्य ते सगळं करीत राहतो. आपल्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालूून साऱ्यांच्या सुखासाठी धावत राहतो. दिवसरात्र राबराब राबून पैसा कमावल्यावर एक दिवस जगाचा निरोप घेण्याची वेळ येते. मृत्यूनंतर लोक “बाबा कुठं आहेत?” असं न विचारता “बॉडी कुठे आहे?” अशी विचारणा करतात.’ ‘हो ना..’ दुसऱ्या गृहस्थांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला. पहिले गृहस्थ हलकेच आवंढा गिळून पुढं बोलू लागले, “तुम्ही घरासाठी वेळ काढत नाही. आता कुठं जाऊ नका, घरातच थांबा, असं म्हणणारे आपण या जगातून गेल्यावर मात्र, “चला, घाई करा! बॉडी कडक पडते आहे..” असं म्हणू लागतात. मृत व्यक्तीचे कपडे, गादी, चादर, उशी घरात ठेवू नये, असं म्हणणाऱ्यांना त्या व्यक्तीचे पैसे, सोने, जमीनजुमला आणि इतर सगळं काही कसं काय चालतं, हे तर न उलगडणारं कोडं आहे. जिवंतपणी, या खडतर आयुष्याची वाट तुडवताना संधी मिळेल तेथे सतत पाडायचा प्रयत्न करणारे लोक मृत्यूनंतर मात्र खांद्यावर उचलून घेतात. या इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर घरात फोटोसमोर काही दिवस दिवा अन् अगरबत्ती लावून हार घातला जातो. पुढे काही दिवस तो फोटो भिंतीवर टांगला जातो. त्यानंतर तो हळूच कुठं अडगळीत पडेल, हे सांगता येत नाही. मग आणखी काही दिवसांनी मागे राहतो फक्त भिंतीवरचा फोटो नसलेला एक खिळा अन् ज्यांना आपण आयुष्यभर आपले आपले म्हणून जपत आलो, त्यांच्या काळजातला आटून गेलेला कळवळा... हे सारं पाहिल्यावर असं वाटतं की, याचसाठी का केला होता अट्टहास?’ {संपर्क : anant2khelkar@gmail.com