आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘शाब्बास मिथू’मधील नुरी हे पात्र गुणवान स्त्रियांना व्यवस्था कशी गाडून टाकते, हे दाखवते. मेहनत, क्षमतेने क्रिकेटचे मैदान दणाणून सोडणाऱ्या मितालीसारख्या प्रतिभावंत खेळाडूंनाही कसे भेदभावाला सामोरे जावे लागते, याची कहाणी हा चित्रपट समोर उभी करतो.
‘पाँच वुमन क्रिकेटर्स के नाम बताओ’, ‘लेडी सचिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राज या क्रिकेटपटूच्या आयुष्याने प्रेरित ‘शाब्बास मिथू’ या नुकत्याच प्रदर्शित चित्रपटात भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षाने ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शिपायाला विचारलेला हा प्रश्न आणि उत्तरादाखल शिपायाचे हतबल मौन मानवी इतिहासाच्या विविध क्षेत्रातील स्त्रियांचे योगदान आणि त्याची नोंद याविषयी अनेक प्रश्न उपस्थित करतो. भारतीय क्रिकेट मंडळाच्या शिपायाच्या अज्ञान आणि ओशाळलेपणाची प्रचिती अनेक ठिकाणी येते. जसे अभ्यास शाखांचे जनक असतात त्याचप्रमाणे अभ्यास शाखांच्या एक-दोन जननींची नावे सांगा. हा प्रश्न जेव्हा वर्गात विद्यार्थ्यांना विचारला जातो तेव्हा विद्यार्थीदेखील अशाच अज्ञान आणि ओशाळलेपणाने निरुत्तर होतात. केवळ विद्यार्थीच नाही तर सामान्यपणे कोणालाही जर जगप्रसिद्ध पाचेक स्त्री हॉकीपटू,अंतराळवीर,शास्त्रज्ञ,तत्त्वज्ञ,विचारवंत,कथा-कादंबरीकार,नाटककार,उद्योजिका, पंतप्रधान,राष्ट्रपती,कार्टुनिस्ट,अर्थशास्त्रज्ञ,राजकीय विचारवंत, अथवा स्त्री संतांची नावे जरी विचारली तरी बहुतेकांची अवस्था त्या शिपायासारखीच होईल.
यातून हा उपस्थित होतो की, खरंच नोंद घ्याव्यात अशा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्यादेखील स्त्रियांनी त्या त्या क्षेत्रात योगदान दिलेलं नाही का? स्त्रियांच्या संख्यात्मक अनुपस्थितीमुळे वरकरणी हे सत्य वाटत असले तरी खरे वास्तव मात्र निश्चितच वेगळे आहे. पितृसत्ताक समाजव्यवस्थेत चूल आणि मूल हेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र समजले जाते. स्त्रियांच्या इतर क्षेत्रांतील वास्तविक योगदानाला मात्र अनुल्लेखले जाते. इतिहासपूर्व काळात जेव्हा आजसारखी लिंगभावात्मक श्रमविभागणी आणि पितृसत्ताक समाजव्यवस्था अस्तित्वात नव्हती तेव्हा लहान मुलं असणाऱ्या, वृद्ध व आजारी स्त्रिया सोडता इतर स्त्रियासुद्धा पुरुषांप्रमाणे शिकारीच्या व अन्य कामामध्ये सहभागी असायच्या. स्त्रीवादी मानववंशशास्त्रज्ञांनी गुहांमधील चित्र आदींच्या अभ्यासातून हे सिद्धदेखील केले आहे. पण आज शाळेतील पाठ्यपुस्तकातून प्राचिन स्त्रियादेखील बहुदा केवळ मुलाला कडेवर घेतलेल्या अथवा घरकामासंबंधी कामात गुंतलेल्या दाखवल्या जातात. आधुनिक विज्ञापीठीय शिक्षणाची सुरुवात होण्यापूर्वी स्त्रियांची बाळंतपणं ज्येष्ठ दाई-सुईण स्त्रिया करत असत. त्यांना मानवी शरीर, आजार आणि औषधी वनस्पती याची चांगली जाण असे. मात्र आधुनिक संहितीकृत वैद्यकीय ज्ञानात या स्त्रिया, त्यांचे ज्ञान, अनुभव मात्र गडप होते.
लिखित साहित्य निर्मितीची उसंत आणि मुभा दोन्हीही नाकारल्यामुळे स्त्रियांनी त्यांच्या श्रमकार्यातच साहित्य प्रसवले. जात्यावरील ओव्या, मौखिक कथा, लोकगीते ही त्याची उदाहरणे. तसेच साहित्यातील पुरुषी मक्तेदारीला झुगारत अनेक स्त्रिया कधी पुरुषी नाव धारण करून, कधी पुरुष साथीदारासोबत, तर कधी स्वतःच्या नावाने साहित्य निर्माण करण्याचे बंड करत राहिल्या. जॉर्ज इलियट नावाने अनेक उत्कृष्ट कादंबरीलेखन करणारी मॅरी ऍन इव्हान्स हे याचे उदाहरण. मात्र साहित्यलेखन, समीक्षण, प्रकाशन यातील पुरुषी वर्चस्वामुळे स्त्री साहित्यिकांच्या साहित्याला प्रसवूच दिले जात नाही.
‘शाब्बास मिथू’ चित्रपटातील नुरी हे पात्र अनेक प्रतिभावंत स्त्रियांना व्यवस्था कशी गाडून टाकते याचं प्रतिनिधित्व करते. चित्रपटातील मुख्य पात्र मिताली राजला खऱ्या अर्थाने क्रिकेटची आवड आणि धडे क्रिकेटवेडी मुस्लिम धर्मातील नुरी देते. पण पंधराव्या वर्षी लग्न लावून देऊन नुरीच्या क्रिकेटमधील प्रतिभेला घर आणि मुलांच्या जबाबदारीत बेदखल केले जाते. एकीकडे नुरीसारख्या गुणवंत स्त्री खेळाडूंना मैदानापर्यंतदेखील पोहोचू दिले जात नाही, तर दुसरीकडे आपल्या मेहनत आणि क्षमतांनी क्रिकेटचे मैदान दणाणून सोडणाऱ्या मिताली सारख्या प्रतिभावंत खेळाडूंनादेखील कसे अन्याय आणि भेदभावाला सामोरे जावे लागते याचे उत्कृष्ट चित्रण हा चित्रपट मांडतो. जर क्रिकेटची महत्त्वाची मॅच असेल आणि त्याच वेळेस तुझी सासू गंभीर आजारी असेल तर तू कशाला प्राधान्य देशील? या प्रश्नाला एखादा पुरुष सैनिक सीमेवर लढत आहे आणि इकडे त्याच्या आईला गंभीर आजार झाला तर तो कशाची निवड करेल, असा प्रश्न त्या सैनिकाला विचारला जातो का’ या प्रश्नाने मितालीने केलेला प्रतिवाद तसेच ‘तुमचा आवडता पुरुष क्रिकेट खेळाडू कोण आहे?’ एका पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला ‘हाच प्रश्न तुम्ही पुरुष क्रिकेटरला विचारला असता का?’ हा मितालीने केलेला प्रतिप्रश्न स्त्री-पुरुषांच्या कर्तव्य आणि जबाबदारीसंबंधातील पितृसत्ताक दुजाभाव व दुटप्पीपणा अधोरेखित करतो.
भारताला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचवणाऱ्या तसेच अनेक रेकॉर्ड््स आपल्या नावावर असणाऱ्या पद्मश्री प्राप्त मितालीसारख्या खेळाडूविषयी ‘eat cricket sleep cricket’चा जप करणाऱ्या भारतात माहीत नसणे अगदी स्वाभाविक आहे. कारण मिस अमुक, मिसेस तमुक स्पर्धामध्ये स्त्रियांच्या शरीराची वस्तूवत परेड करवणाऱ्यांना स्त्रियांचे क्रिकेटसारखा ‘जेंटलमन गेम’ खेळणे पचनी पडणे कठीण ठरते आणि म्हणूनच पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा ओसंडून वाहणाऱ्या खेळात स्त्री क्रिकेटर्सना मात्र साध्या साध्या सोई-सुविधांसाठी झगडावे लागते. स्त्री क्रिकेटर्सना सामोरे जावे लागणाऱ्या भेदभावाचे कारण त्यांचे क्रिकेट खेळण्यातील क्षमतावैपुण्य नसून त्यांचे स्त्री असणे हे आहे. सिमोन द बुव्हा म्हणते त्याप्रमाणे पितृसत्ताक समाजात स्त्री आणि तिचे कर्तृत्व हे दुय्यमच ठरवले जाते. त्यामुळे स्त्रियांच्या कर्तृत्वाची मोजणी करणाऱ्या फुटपट्टयाही तोकड्याच असतात. स्त्रियांना सदैव भौतिक मूल्य आणि प्रतिष्ठा प्राप्तीपासून शक्यतो दूर ठेवण्याचे काम समाज करत असतो. पण श्रेयप्राप्तीचा हव्यास नसणाऱ्या स्त्रिया आपले कर्मकार्य अविरतपणे करत आलेल्या आहेत आणि ‘हमारी भी पहचान है’ हे दर्शवण्यासाठी, आपले कर्तृत्व आणि योगदानाची नोंद निर्माण करण्यासाठीची अग्निपरीक्षा मानवी अस्तित्वाच्या जननींना सतत देत राहावी लागणार हे मात्र निश्चित आहे...
डॉ. निर्मला जाधव संपर्क : nirmalajadhav@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.