आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:आम्ही ताराराणीच्या वारसदार...

माधुरी पाटील15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

को ल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या वडणगे गावात माझ्या पतीचा गुऱ्हाळाचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. आता गुऱ्हाळघर म्हटलं, की सगळा गड्यांचा (पुरुषांचा) कारभार असं जणू गणितच लोकांच्या डोक्यात पक्कं असतं. मी सुरुवातीला पतीच्या गुऱ्हाळाच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. मात्र, मला जसजसे काम जमू लागले तसे मी प्रथम काकवीचा ब्रॅण्ड तयार केला. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. ऊसाचा रस काढण्यापासून ते लहान लहान काहिलींमध्ये रस उकळून त्यापासून फक्त गुळच नाही, तर गुळाचे चाॅकलेट, काकवी, गुळ पावडर, लहान क्यूब बनवण्यास सुरुवात केली. आज या व्यवसायातून दरमहा तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळते.

अशी झाली जाॅगलेट निर्मिती... ग्राहकांची मागणी, दर्जा, किंमत यांचा मी अभ्यास केला. त्यातून चॉकलेटच्या आकाराचा गूळ तयार करण्यास प्रारंभ केला. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे लक्षात आले. घरगुती पद्धतीने छोट्या काहिलीत लहान स्वरूपाची गुळनिर्मिती सुरू केली. आता साडेतीन ग्रॅम वजनाचा चॉकलेटच्या आकाराचा क्यूब मी बाजारपेठेत आणला आहे. गुळाला इंग्रजीत जागरी म्हणतात. यातली पहिली दोन अक्षरं व चॉकलेट या शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांचा मिलाफ करून ‘जॉगलेट’ शब्द तयार केला. हे दोन पद्धतीत सादर केले आहे. विश्वकर्मा ऍग्रो फूड्स नवाने फर्म सुरू करुन व्यवसाय वाढवला. दररोज २५० किलो गुळाची निर्मिती करुन त्यापासून गुळ पावडर, क्यूब, जाॅगलेट निर्मिती सुरू केली. आज या व्यवसायाच्या माध्यमातून मी आणखी चार महिलांना गुऱ्हाळ घरात काम मिळवून दिले आहे.

जॉगलेटला मागणी आतापर्यंत जॉगलेटची कोल्हापूर मार्केटला मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. कोल्हापूर, पुण्यातील विक्रेते, आयुर्वेदिक दुकानांमधून चांगली मागणी आहे. भविष्यात हा व्यवसाय मला वाढवायचा आहे. विशेषतः या व्यवसायात जास्तीत जास्त महिलांच्या हाताला काम देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गुळाची ढेप विकली असती तर किलोला ६० रुपये दर मिळाला असता. जॉगलेटच्या मूल्यवर्धनातून हाच दर किलोला २५० रुपयांपर्यंत पोहोचलाय. गूळनिर्मिती रसायनविरहित करण्याचा मी प्रयत्न केलाय. कोल्हापूर जिल्हा सधन असल्यामुळे इथं पूर्वीपासून उद्योगधंद्यात महिला होत्याच. पण आता हेच चित्र ग्रामीण भागातही ठळकपणे दिसतेय. इथल्या खेड्यापाड्यात शेतीपूरक व्यवसाय सुरू करुन वर्षाकाठी पन्नास लाखांची कमाई करणारी महिला उद्योजिका नावारुपास येऊ लागली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय शेती असला, तरी शेतीशी निगडित उद्योग-व्यवसायही तितकाच पुढारला आहे. बचतगटांच्या माध्यमातून पारंपरिक शेतीच्या व्यवसायास पूरक अनेक व्यवसाय महिलांनी सुरू केले आहेत. शेळी पालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन यासोबत जरा वेगळी आणि आधुनिक काळाची गरज ओळखून गुऱ्हाळ घराच्या पारंपरिक व्यवसायास नवे रुप देण्यातही महिला पुढे आहेत, यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे, याचा आनंदच आहे. या व्यवसायातून अधिकाधिक महिलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. { शब्दांकन : प्रिया सरीकर

बातम्या आणखी आहेत...