आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:गुलामी आवडे आम्हाला...

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. कॉलेजच्या एनसीसी कॅम्पसोबत एका खेड्यात गेले होते. कॅम्प सुरू असताना मोठा आरडाओरडा ऐकू आला. जाऊन पाहते तर काय, एक नवरा बायकोला झोडपत होता. बायको मार खात होती. लग्न झालेल्या क्षणाच्या नावानं बोटं मोडत होती. मार सुरूच होता. वाटलं, आता या मारहाणीत त्या बाईचा जीव जाणार. तावातावाने जाऊन तिच्या नवऱ्याच्या हातातील काठी पकडली आणि म्हणाले - ‘काय जनावर समजतोस काय तिला? ती काय तुझ्या मालकीची निर्जीव वस्तू आहे? आता मार बरं. पोलिसांतच देते तुला’ आणि काय आश्चर्य! आतापर्यंत जमिनीवर निपचित पडून मार खाणारी ती निरक्षर बायको उठली आणि हाताची बोटं माझ्यापुढे नाचवत म्हणाली - ‘ऐ बाई! कोण गं तू? कुठून आलीस? आमच्यामध्ये काय पडतेस? त्यो नवरा हाय माझा. बरोबर मारणार की मला. तुला का झोंबतंय? मी बिननवऱ्याची नाय, मग मार तर खावाच लागणार. मला नाही तर काय रस्त्यावरच्या परक्या बाईला मारंल होय? निघ इथनं..’ मी चारीमुंड्या चीत. गुलामी आवडते हो आम्हाला.. दुसरा प्रसंग अगदी पंधरा दिवसांपूर्वीचा. एक अति उच्चशिक्षित ताई सतत म्हणायच्या- ‘कुठे काही संधी असेल तर सांगा बरं.’ आणि योगायोगाने पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची जाहिरात आली. चांगली घसघशीत फेलोशिप, शैक्षणिक गुणवत्तेत आपसूकच होणारी वाढ आणि सोबतच विद्यापीठात अध्यापनाची ही संधी.. तत्काळ त्यांना फोन केला. जाहिरातही पाठवली. काही दिवसांनी सहज आठवलं म्हणून विचारलं- ‘फेलोशिपसाठी अर्ज केलात ना?’ त्या अजीजीने म्हणाल्या- ‘नाही हो. हे म्हणाले, कशाला उगीच? आता पोरांकडे लक्ष द्यायचं सोडून तू काय थिसिस लिहीत बसणार आहेस का? कुठे नोकरी मिळाली तर पाहू..’ मी थक्क. ‘अहो, चांगली शाळा-कॉलेजात जाणारी मुलं तुमची. नोकरी मिळेल तेव्हा मिळेल. आता जे मिळतं आहे ते तरी पदरात पाडून घ्या. पोस्ट डॉक्टरेट मिळेल तुम्हाला. पैसा आणि अनुभवही..’ त्या उत्तरल्या- ‘असू द्या हो. ‘हे’ नको म्हणतात तर नको तर नको. तुम्हाला तर माहिती आहे मी ‘यांना’ विचारल्याशिवाय काहीही करत नाही. कितीही स्त्रीमुक्तीच्या गप्पा मारा. पुरुषांएवढं आपल्याला कुठे कळतं?’ ताईंचा अभ्यासविषय होता - स्त्रीवाद. खरंच ऐकायला आवडणार नाही, पण गुलामी आवडते आम्हाला. फरक एवढाच की ती कधी शारीरिक असते तर कधी मानसिक. सिमोन म्हणते - ‘गुलामी, गुलाम का पेशा नहीं होती.’ गुलामी स्त्रीची आवड नाही, निवड नाही, तर हतबलता असते. एका मर्यादेपर्यंत हे नक्कीच स्वीकारायला पाहिजे. पण कित्येक दशकं मिरवलेले हे कारण आम्ही बायका अजून किती दिवस पुरवणार आहोत? ‘आम्ही दयनीयच’ हे बिरुद वागवलं की आम्हा बायकांचे अर्धे प्रश्न सुटतात. मग कसला विचार करायला नको. कसला विरोध करायला नको. कसले निर्णय घ्यायला नको.. आणि कसली जबाबदारीही नको. हिंदीचे एक तथाकथित स्त्रीवादी रचनाकार राजेंद्र यादव यांचं म्हणणं पटतं की ‘स्वाधीनता के अपने खतरे होते हैं और गुलामी का अपना आनंद होता है.’ खरं आहे ते. स्वतंत्र होण्याचे खूप धोके आहेत. खूप तोटे आहेत. सर्वात मोठा तोटा म्हणजे निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय चुकले तर त्याची जबाबदारीही घ्यावी लागते. सर्वेक्षण सांगते की ८९ टक्के स्त्रियांना जबाबदारी स्वीकारायला आवडत नाही. जर्मन ग्रीयर तिच्या ‘फीमेल युनक’ या गाजलेल्या पुस्तकात म्हणते की - ‘मी माझ्या स्थिरतेपेक्षा आणि सुरक्षिततेपेक्षा स्वातंत्र्याला जास्त प्राधान्य देते. यातून उद्भवलेल्या असुरक्षिततेच्या भावनेला आत्मविश्वासाचे उत्प्रेरक मानते.’ वाह! क्या बात है.. आयुष्यात प्रत्येकाला स्थिरता हवीच असते. प्रत्येकाला सुरक्षितता हवीच असते. जे लोक हे नाकारतात ते चक्क खोटं बोलत असतात. मोठी गमतीदार प्रक्रिया आहे ही. पण स्थैर्य आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी बहुतेक वेळा स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते. आपण स्वातंत्र्य महत्त्वाचे मानत असू तर अनेकदा स्थैर्य आणि सुरक्षिततेसोबत तडजोड करावीच लागते. स्वाभाविकपणे यामुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मग या असुरक्षिततेसोबत, त्यातून उद्भवलेल्या भीतीसोबत दोन हात करावे लागणारच. या प्रक्रियेतून जो आत्मविश्वास वाढेल त्याला मात्र तोड नसते. मात्र आम्हा बायकांना आत्मविश्वास वाढवणारी ही प्रक्रियाच नको असते. परिस्थितीचा सामना करण्यापेक्षा वेळ मारून नेण्याकडे आमचा कल अधिक असतो. मान्य आहे की स्त्री शतकानुशतके गुलाम राहिलेली आहे. हे स्वातंत्र्य वगैरे तिच्यासाठी फार अनोख्या गोष्टी आहेत. ती गोंधळलेली आहे की या स्वातंत्र्य नावाच्या गोष्टीसोबत ‘डील’ कसं करायचं? सगळं मान्य. पण व्यवस्थेची गोम कळलीये ना आता. शतकांची धाव दशकांत घ्यायची आहे. मग हे चमडीबचावनिमित्त किती काळ पुरवायचं? किती दिवस ‘आमच्यावर अन्याय झाला हो’ म्हणत गळे काढत राहायचं? हा अन्याय संपणारा नाहीच. वेगवेगळ्या स्वरूपात तो होतच राहणार आहे. अशा परिस्थितीत गळे काढण्याएवढा वेळ आहे का आमच्याकडे ? कधी काटेरी तर कधी अगदी मऊ मऊ रेशमी स्वरूपातील हा अन्याय वाढतच राहणार हे ओळखण्याची नजर कधी ‘डेव्हलप’ करणार आम्ही? मी आहे ही अशी आहे. सामान्य माणसासारखी. बरीही आणि वाईटही. बघा कसं पचवता आमचा अस्तित्व? हे म्हणण्याची धमक कधी दाखवणार बायका? हे असले प्रश्न उपस्थित केले की बायकांची उत्तरं ठरलेली.. ‘एवढं सोपं नसतं हो.. घर मोडून पडेल अशानं. बाई सहन करते न म्हणून सुरळीत आहे सर्व..’ केवढा हा गैरसमज! आमची अनामिका फार काकुळतीने विचारते हो - क्यों लेती हो थोडी-सी रोटी? और क्यों लेती हो बहुत सारी दया? या प्रश्नाचं उत्तर एकच... कारण - गुलामी आवडे आम्हाला..!

भारती गोरे संपर्क : drbharatigore@gmail.com

बातम्या आणखी आहेत...