आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:नेमकं उत्तर शोधायलाच हवं...

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या कितीतरी वेळापासून विचार करतेय कुठून विषयाला सुरुवात करावी. मन विषण्ण झालं की, शांतता जवळची वाटते. नको वाटतात शब्दांचे आसरे. मी एकटीच नाही खरं तर प्रत्येक संवेदनशील माणूस माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना ऐकून हादरतो, हळहळतो. आपापल्या परीने व्यक्त होत असतो. हल्ली रोज सकाळी वर्तमानपत्र हातात घेतलं की, बातम्या लागल्या की, सोशल मिडियावर डोकावलं की काहीतरी विपरीत आणि अघटीत घटनांचे हल्ले मनावर, मेंदूवर होतात की नकोसं वाटू लागतं. कधी मोबाईल दिला नाही म्हणून, कधी विडीओ गेम खेळू दिला नाही म्हणून, कधी अभ्यासासाठी बोलले म्हणून अल्पवयीन मुलं जन्मदात्यांना ठार करतात. प्रेमात नकार दिला म्हणून, एकतर्फी प्रेमात बुडून, प्रेमभंग पचवता येत नाही म्हणून, मनासारखा जोडीदार मिळाला नाही म्हणून, आवडेनासा /आवडेनाशी झाली म्हणून, विवाहबाह्य संबंधांसाठी चाकूचे वार केले जातात, असिड हल्ले करून विद्रूप केलं जातं, बलात्कार करून निर्घृण खून केले जातात. समाज माध्यमांवर चारित्र्यहनन करणाऱ्या खऱ्या खोट्या चित्रफिती, फोटो व्हायरल केले जातात, आत्महत्येला भाग पाडलं जातं. वासनांध होवून तान्ह्या बाळापासून ते वृद्ध महिलांवर बलात्कार केले जातात. चारित्र्याच्या संशयावरून कुणी माथेफिरू नवरा बायकोचे शीर धडावेगळे करून हातात मिरवत गावभर फिरून पोलीस स्टेशनला हजर होतो. कुणी संशयावरून पेटवून देतो, कुणी विषप्रयोग करतो. व्यसनांच्या आहारी जावून, कुणी धर्मांध होवून तर कुणी अंधश्रद्धेचे बळी पडून ठेचून हत्या करत आहेत. एखाद्याला विरोध केला, मतभेद झाले तरी हत्या. मालमत्तेचे वाद आणि भावकीतली भांडणे आणि त्यातून होणारे खूनही होत असतातच. हे आणि यासारखे अनेक अमानवीय आणि क्रूर प्रकार दिवसागणिक वाढत जात आहे. फक्त घटनाच नाही तर त्यातली क्रूरताही वाढतेय. नुकतंच दिल्लीत श्रद्धा वालकर हिचा खून करून तिच्या देहाचे ३५ तुकडे करून शांत डोक्याने त्याची विल्हेवाट लावणाऱ्या अमानुष आफताबला ताब्यात घेतलं गेलंय. त्याने तिला दिलेला त्रास, हिंसात्मक वर्तन आणि त्या संबंधी रोज नवनव्या बातम्या वाचून जनमानसातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात लोक व्यक्त होत आहेत. उलट सुलट चर्चा, आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे सर्व पाहून सामंजस्याने विभक्त होणं, सामोपचाराने वाद मिटवणे, नकार स्वीकारणे, समोरच्या व्यक्तीच्या मतांचा, भावनांचा आदर करणं हे पर्याय कालबाह्य झाले आहेत की, पर्याय शिल्लकच उरले नाहीत असे प्रश्न मनात डोकावून जातात. कशामुळे सडताहेत मेंदू? कशाने नासतेय माणुसकी? कुठून येतेय ही विकृती जन्माला? इतके क्रूर, अमानवी कसे होत जाताहेत माणसं? कसा झाला जीव इतका स्वस्त? हवं ते मिळवायचंच, नाही मिळालं तर समोरच्याला संपवायचं आणि स्वतःलाही उद‌्ध्वस्त करून घ्यायचं. कुठे गहाण टाकलाय विवेकी विचार आपण? आपल्या संवेदना दिवसेंदिवस बोथट होत जात आहेत का?

आपल्या आत आपणच गंभीरतेने डोकावून पाहिलं पाहिजे आता. शोधलं पाहिजे कसली पुटं चढली आहेत का? छोट्या छोट्या गोष्टी विकोपाला जात आहेत का? रागाचा भडका उडतोय का? राग, मत्सर, द्वेष, इर्षा घरोबा करून बसले आहेत का? नकारात्मकता, औदासिन्य सोबत करताहेत का? कशाच्या प्रभावाखाली जगतोय आपण? समाज माध्यमे? वेबसिरीज? पोर्न? त्यातली चमक धमक, अवास्तवता, दिखाऊपणा नेमकं काय आकर्षित करतंय आपल्याला? नेमकं काय हवंय आपल्याला? कुठे थांबायचं कळतच नाहीये का? का वाहवत जाताहेत माणसांचे जत्थे? आपल्यातही आहे का कुठलीशी बोचणारी, प्रतिशोध घ्यावा वाटणारी चलबिचलता? रागराग होतोय का? त्याचा निचरा न होता कुठेतरी दुसरीकडे निघतोय का किंवा मनातच साठतोय का? त्रासदायक गोष्टी तिथेच सोडून पुढे जातोय का? की त्याचं ओझं वागवत फिरतोय वर्षानुवर्षे, महिनोंमहिने आपण? ताण, अपेक्षांचे ओझे, आर्थिक कुचंबणा सक्षमतेने हाताळू शकतोय का आपण? की रेटत नेतोय फक्त? शोधली पाहिजेत नेमकी उत्तरे. मनावरचे मळभ, ताण दूर व्हावा म्हणून काय करतोय आपण? कामाच्या व्यापातून काढतोय का वेळ स्वतःसाठी? वेगळा वेळ, वेगळा पैसा किंवा खूप साधनं लागत नाहीत आरोग्यपूर्ण जीवनशैलीत स्वतःला ढाळून घेण्यासाठी. देतोय का वेळ कुटुंबियांना, मित्रांना? स्वतःच्या छंदांना? निसर्गाच्या सान्निध्यात जावून रिफ्रेश करतोय का स्वतःला? कदाचित सध्या या गोष्टी महत्त्वाच्या वाटतही नसतील. कृती न करण्यासाठी सबबी खूप असतील. आपल्याला काही त्रास त्रास होणार नाही हा फाजील आत्मविश्वास देखील असेल अनेकांमध्ये, पण आत दाबून ठेवत असलेला नकारात्मक विचार, ताण यांचा दूरगामी परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो. कुठेतरी त्याचा विस्फोट स्वतःसाठी किंवा इतरांसाठी घातक ठरू शकतो. आपण या समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत किंबहुना आपल्या सर्वांनी मिळून समाज घडतो आणि समाजामुळे आपण घडत असतो. त्यामुळे सामाजिक घटनांचे, परिस्थितीचे पडसाद आपल्या वर्तनातून कळत नकळत उमटत असतात. नमुन्यादाखल पहायचं असेल तर प्रसार माध्यमातील, समाज माध्यमातील श्रद्धाच्या घटनेच्या बातम्या, पोस्ट पहा आणि त्याखालच्या उलट सुलट प्रतिक्रिया वाचा. संकुचितता, ताठरता, कट्टरता, व्यक्ती स्वातंत्र्यावर घेतलेले आक्षेप आणि मनातली घाण तिथे ओकणारे कोण आहेत? तुमच्या माझ्या आजूबाजूचे किंवा तुमच्या माझ्यापैकीच कुणाचे तरी हे प्रातिनिधिक चेहरे आहेत.

घटना घडते, माणूस हळहळतो, व्यक्त होतो, चिडतो, सल्ले देतो. काय करावे काय करू नये हे इतरांना सांगणं, सल्ले देणं जितकं सोपं असतं तितकं स्वतः मध्ये बदल करणं नक्कीच सोपं नसतं. पण अशक्य देखील नसतं म्हणून ‘आफताब वृत्ती’ चुकूनही मनात फोफावू नये, आपल्या कुटुंबियांना, जोडीदाराला, स्वतःलाही त्रास होऊ नये, एक आफताब समाजातून वजा व्हावा, विवेकी विचार वृद्धिंगत व्हावेत म्हणून आपण स्वतःवर, स्वतःच्या विचारांवर, वर्तनावर सातत्याने काम केलं पाहिजे. वेळोवेळी आत्मपरीक्षण करायला हवं. जिथे त्रास हाताळता येत नाहीये, समतोल राखता येत नाहीये असे वाटते तिथे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची मदत घेण्यात दिरंगाई करायला नको. विचार वर्तनात खुलेपणा यावा, समतोल राखला जावा म्हणून सकारात्मक मित्रांमध्ये वावरले पाहिजे, वाचन केलं पाहिजे. निकोप आणि खुल्या मनाने चर्चा केल्या पाहिजेत. वेबसिरीज आणि तत्सम माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि वास्तव हे भिन्न आहे हे आपल्या पौगंडावस्थेतील ते तारुण्याच्या उंबरठ्यावरील पाल्यालाही वेळोवेळी सांगितलं पाहिजे. त्यांच्यासोबत जजमेंटल न होता संवाद साधून त्यांना समजून घेतलं पाहिजे. धोके समजावून सांगितले पाहिजेत. नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून वेळीच स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. काळानुसार बदलणारी विचार पद्धती आणि जीवनशैली स्वीकारतांना स्वतःच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेतच, पण सोबत क्षमतांचाही विचार केला गेला पाहिजे. लेखामध्ये वर बरेच प्रश्न आहेत प्रत्येकाची विचारांची फ्रेम वेगळी असली तरी विवेकी विचारांनी स्वतःच्या आत डोकावता आलं की काय करायला हवं आणि काय नको ते आपलं आपल्याला निश्चित कळतं.

डॉ. निशिगंधा व्यवहारे संपर्क : ९८५०३२२३३४

बातम्या आणखी आहेत...