आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • We Should Also Celebrate The Success Of Our Parents| Article By Meghana Pant

यंग इंडिया:आपल्या पालकांनी मिळवलेले यशदेखील साजरे केले पाहिजे

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या नुकत्याच झालेल्या नैनितालच्या भेटीदरम्यान मला जाणवले की, ज्या प्रकारे आपण आपल्या यशोगाथा साजऱ्या करतो, तसेच आपल्या पालकांच्या यशाचेही केले पाहिजे. मी मोठी होत असताना मला अनेकदा विचारले जायचे की, माझे वडील नैनितालमधील कोणत्या शाळेत होते? या प्रश्नाने मी अस्वस्थ होत असे. अमिताभ बच्चन ज्या शेरवूडमध्ये शिकले होते तिथे ते शिकले की सेंट जोसेफचे विद्यार्थी होते? त्यांना कसे सांगावे ते मला कळत नव्हते, माझे वडील दीपचंद्र पंत हे पोस्टमास्तरांचे पुत्र होते. माझे आजोबा कृष्णानंद पंत यांना आठ मुलांचे कुटुंब सांभाळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यांना चांगल्या शाळेची फी परवडत नव्हती. त्यामुळे माझे वडील जुबली हॉल या हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकले. तिथे त्यांना शाळेत अनेक किरकोळ कामे करावी लागली, उदा. झाडांना पाणी घालणे. असे असूनही त्यांना तिथे चांगले वाटत असे, कारण शाळेचे कर्मचारी मुलांसाठी भाजलेले हरभरे व गूळ आणत आणि त्यामुळे वडिलांना मोफत जेवण मिळत असे. मल्लीताल सेवा समितीच्या प्रार्थना सभांनाही ते हजेरी लावत, जेणेकरून त्यांना प्रसादाने पोट भरता येईल. या कारणासाठी ते कधी कधी माझी आजी पद्मा यांच्या स्वयंपाकघरातून कच्चे तांदूळ चोरत असत.

आज त्याच शाळेसमोर माझ्या वडिलांचे एक घर आहे. अलीकडेच मी तिथे गेले तेव्हा रोज सकाळी शाळेतील मुलांचे राष्ट्रगीत ऐकू येत असे आणि मला आश्चर्य वाटायचे की, माझे वडील १९७० च्या दशकात गरिबीचे बंधन कसे मोडू शकले आणि नागरी सेवेत कसे सामील झाले? त्यांनी मला इतके चांगले जेवण कसे दिले की माझे मित्र मला विचारू लागले की तू आज किती खाल्ले आहेस? वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळूनही मी डॉक्टर होण्याऐवजी लेखक बनण्याची आवड जोपासली पाहिजे, असे जीवन त्यांनी कसे तयार केले? त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला इतका आकार कसा दिला की त्यांच्या आजूबाजूच्या मित्रांनी त्यांच्या आदरातिथ्याचे आणि उदारतेचे जितके कौतुक केले तितकेच त्यांनी त्यांच्या गायनाचा आनंद घेतला.

नक्कीच, आम्ही श्रीमंतांसारखे मोठे झालो नाही, पण माझे आई-वडील मुंबईत कामाला होते आणि माझा भाऊ व मी मलबार हिलच्या हैदराबाद इस्टेटमध्ये वाढलो. हे देशातील सर्वात महागडे निवासी क्षेत्र आहे. श्रीमंत मित्रांमध्ये मध्यमवर्गीय मुलगी असणे सोपे नव्हते. माझे मित्र मर्सिडीझमधून शाळेत यायचे, तर मी खटारा बसने. माझी आई नोकरदार महिला होती आणि ती माझ्यासाठी सकाळी लवकर जेवणाचा डबा बनवत असे, पण मी ते शाळेतल्या मैत्रिणींपासून लपवून ठेवायचे, कारण त्यांना घरून गरम जेवण मिळत असे, ते त्यांचे आचारी तयार करत असत. मी मित्रांसमोर टॅक्सीत बसायचे नाटक करायचे आणि मग त्यातून उतरून बेस्ट बसची वाट पाहायचे. मला अनेकदा विचारले जाते की, माझ्याकडे प्रस्ताव असताना मी श्रीमंत माणसाशी लग्न का केले नाही? सत्य हे आहे की, मला कधीच श्रीमंत व्हायचे नव्हते. याचे कारण माझे वडील आहेत, त्यांनी मला दाखवून दिले की एका जागी बंदिस्त राहण्यापेक्षा पुढे जाण्यासाठी संघर्ष करणे चांगले आहे. माझ्या वडिलांच्या जन्मस्थानाचे नाव पटवर्धन आहे. पटवा हा शब्द पाटक वरून आला आहे, तो जंगली अक्रोड जमिनीवर पडल्याचा आवाज आहे. मीदेखील माझ्या यशाचा आनंद तेव्हाच घेऊ शकते, जेव्हा मी त्यांच्यासाठी केलेले कठोर परिश्रम पाहू शकेन - उदा. जंगली अक्रोडाचा पृथ्वीवर पडतानाचा आवाज.

येत्या रविवारी फादर्स डे आहे आणि मी अभिमानाने सांगू शकते की, मी एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्याची मुलगी आहे आणि आज मी एक सुप्रसिद्ध लेखिका आहे, त्यासाठी मी स्वतःचे आयुष्य घडवणाऱ्या माझ्या सेल्फ मेड वडिलांचे आभार मानू इच्छिते. त्यांनी असे जीवन बनवले, ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही - अगदी शेरवूड किंवा सेंट जोसेफचे विद्यार्थीही नाही.

(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मेघना पंत पुरस्कारप्राप्त लेखिका,पत्रकार, वक्त्या meghnapant@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...