आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोडला नाही कणा...:मुलींचं भविष्य घडवायचंय...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहेगाव पैठण येथे मी माझ्या दोन मुलींसोबत राहते. आमच्या मालकीची दीड एकर शेती आहे. या शेतीत आम्ही कापूस आणि उसाचं पीक घेतो. यातून जे मिळतं ते जगण्यासाठी खूप आहे. मी पूर्वी माझ्या पतीसोबत शेती करत होते. आमचं चार जणांचं कुटुंब होतं. पती शेती करत होते, पण २०१२ पासून दुष्काळाने आमची पाठ काही सोडली नाही. शेतीत काही येतं नव्हतं, पण आमच्या मालकांनी आशा सोडली नव्हती. ते शेतीत राबत होते. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून ६० हजारांचं कर्ज घेतलं आणि थोडं सावकाराकडूनही घेतलं होतं. शेतात पीक उत्पादन चांगलं होत नसल्यामुळं ते सतत तणावात राहात होते. मी त्यांना धीर द्यायचे. मोलमजुरी करुन जगू म्हणायचे. पण, त्यांना कर्ज कसं फेडायचं याचा खूप ताण आला होता. ते खूप निराश झाले आणि २०१५ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. मला तरुणपणीच वैधव्य आलं. पदरात दोन सोन्यासारख्या मुली होत्या. मी पार खचून गेेले होते. संसाराचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्न उभा होता. मग मीच कंबरेला पदर खोचला आणि आता शेतीच करायची, असा निश्चय केला. पुन्हा सगळं दु:ख बाजूला सारुन कामाला उभी राहिली. दोन मुलींचं भविष्य घडवायचं होतं. त्यांच्यासाठी जगायचंच होतं. सरकारी मदत मिळते का पाहिलं, पण मदत काही मिळाली नाही. आता या सरकारी मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा मी आमची शेती कसायला घेतली आणि कपाशीचं आणि उसाचं पीक घेतलं. आमच्या शेतीजवळून ब्रमुगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचा कालवा गेला आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळू लागलं आहे आणि आजही मी शेतीत अगदी मनापासून कष्ट करुन न डगमगता, सर्व अडचणींना समोरे जात शेती करते आहे. या शेतीमुळंच जगण्याएवढं उत्पादन मिळतं आहे. या शेतीच्या भरवशावरच मी मुलींची शिक्षण करु शकतेय. मी शेती करुन जगते, घर चालवते याचा मला अभिमान आहे. शेती करण्यासाठी मला दीर, नातेवाइक यांनी प्रोत्साहन दिले.

लता रमेश बोबडे

बातम्या आणखी आहेत...