आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:फिटे अंधाराचे जाळे...

प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“फो टो’ तसा अगदी साधाच शब्द वाटतो, पण त्यात प्रचंड ताकद असते, ती इतिहासाची सफर किती क्षणांत करून देते, याचा प्रत्यय आला. गहाळ कागदपत्रांचा कपाटात शोध घेताना खूप जुना म्हणजे अगदी सत्तावीस वर्षांपूर्वीचा आमच्या लग्नाच्या हळदीतला फोटो हाती लागला आणि बघता बघता त्यात कधी रमले ते कळलंच नाही. सगळी मंडळी, तो सगळा जुना परिसर, वाजंत्री सगळंच झटकन् नजरेसमोर आलं. हयात नसलेली आज्जी, आजोबा, बाबा यांची क्षणात भेट झाली. आठवणी डोळ्यांत तरळल्या, नको तितके प्रश्न मनःचक्षूसमोर उभे राहिले, डोळे पाणावले, पण धूसर वर्तमानातदेखील आठवणींचा प्रवास काही थांबेना. भूतकाळातील संघर्षाची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना लख्खपणे समोर उभी राहिली. विनाअनुदान तत्त्वावर महाविद्यालयात काम करताना काढलेले तेे क्षण, भाजीचा खर्च अधिक होऊ नये म्हणून “आम्हाला सरबरीत, पातळ भाजी आवडते” असं अगदी ठाम विश्वासाने मांडलेला खोटा वास्तववाद, पण आज वास्तव काही वेगळे आहे. तो न्याहाळताना लक्षात आलं की, गरिबीतला संसार दोघांनी कसा नेटाने उभा केला, किती उदंड विश्वासाने प्रवास करत राहिलो, त्याचीच तर आज हा जुना फोटो साक्ष देत होता! आयुष्यातले संघर्ष कधी सांगून येत नाहीत. त्यांचा ना आवाज येतो, ना पूर्वसूचना. तो येतो तोच आपल्याला भावनिक, मानसिक पंगू बनवण्यासाठी आणि इथेच आपल्या धाडसाचा, सहनशक्तीचा कस लागतो, हे समजलं. कदाचित अशा नाजूक परिस्थितीत, कठीण काळात आपल्या पाठीशी कुणी असेल किंवा नसेलही, तेव्हा दोघे कसे एकमेकांची सावली बनून राहतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा वेळी आपल्या त्या फाटक्या संसाराची, लोक मोठ्या चवीने दखल घेण्याचीच वाट पाहत असतात. पुन्हा प्रश्न उभा ठाकतो, तो आपल्या आत्मविश्वासाचा. आपल्या परस्परांवरील निस्सीम श्रद्धेचा. सत्य हे आहे की, तो त्या वेळी ढळू नाही दिला तर संसारातील वादळे खूप सहज बाजूला होत असतात. आपल्यातला अहंकार, असमंजसपणा बाजूला करणं ही दोघांची जबाबदारी आहे. बदलत्या काळात भलेही दोघांच्या भूमिका बदलत चालल्यात; पण कुटुंब, नातेसंबंध यांचा मूळ अर्थ तर बदलत नसेल ना? संवादातील भावनिक ओलावा तर संपत नसतो ना? कुठे तरी आता आपल्याला थांबायला हवं, विचाराने समृद्ध व्हायला हवं. पती-पत्नीमधील आरोग्यदायी संबंध हाच खऱ्या अर्थाने कुटुंबाचा पाया आहे, हे समजून घ्यायला हवं. अगदी सुधीर मोघे यांच्या कवितेच्या ओळीप्रमाणे - “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश.. दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश..’ याप्रमाणे संसार प्रकाशमय होणार, हे निश्चित आहे! { संपर्क : ९९७०९४८८७३