आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुकथा:आजी-आजोबांसाठी वेलकम पार्टी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ मेरिकेहून संजू आणि त्याची पत्नी अंजू दोघेही आपल्या मुलांसोबत गावी आले होते. गावातील प्रत्येकाला उत्सुकता असायची ती अमेरिकेतले अनुभव, गप्पागोष्टी करण्याची. दोघे नवरा-बायको वर्षातून दोनदा गावी यायचे. आपल्या मुलांना गावातलं वातावरण, तिथलं चुलीवरचं जेवण, शेती आणि मुख्य म्हणजे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना म्हणजेच मुलांच्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी...दोघेही अमेरिकेत राहत असले तरी त्यांनी चांगले संंस्कार केले होते आपल्या मुलांवर. नातवंडं, मुलगा, सून गावी आल्यामुळ संजूचेे आई, वडील खूप आनंदात होते, कारण मुलगा-सून-नातवंडं यंदा चांगले महिनाभर गावी राहणार होते. त्यामुळे सगळेच खूप खुश होते.

हल्ली वयोमानामुळं आई-वडिलांची तब्येत जरा खाली-वर होत असते हे गावी येण्याआधीपासूनच संजूच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच संजू आणि त्याच्या बायकोने या वेळी आई-वडलांना आपल्यासोबत अमेरिकेला नेण्याचा निर्णय घेतला होता. आई-वडलांच्या या निर्णयामुळे तर संजूची मुलं अगदी आनंदाने नाचत होती. संजूच्या आईवडिलांना मात्र गाव सोडून देशाबाहेर जाणं नको वाटत होतं. ते संजूला म्हणाले, “अरे आम्ही बरे आहोत या गावात. तुम्हीच येत जा अधूनमधून. पण संजूने त्यांचं ऐकायचं नाही असं ठरवलेलंच होतं. आपल्या आईवडिलांचं तिकीट संजूने भारतात येण्याआधीच बुक केलं होतं. संजूला मनापासून वाटत होतं की आई-वडिलांना आपल्याशिवाय दुसरं कुणी नाही. त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या तब्येतीची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? बायकोनेही नवऱ्याच्या या विचाराला पाठिंबा देत सासू-सासऱ्यांना अमेरिकेला नेण्याच्या विचाराला सहमती दर्शवली.

संजूच्या सुटीचा एक महिना संपत आला होता. आईबाबांसह अमेरिकेला जाण्याची त्याची तयारी सुरू होती. सगळ्यांनीच आग्रह केल्यामुळे शेवटी आईबाबा संजूसह अमेरिकेला जायला तयार झाले. अमेरिकेच्या एअरपोर्टवर उतरल्यानंतर तिथले लोक, त्यांचे उंची कपडे, स्वच्छ रस्ते बघून आई-वडील दोघांना अवघडल्यासारखं वाटू लागलं. आपल्याला बघून इथले लोक नावे ठेवतील का? संजूला नंतर वाईट तर नाही ना वाटणार? सगळे प्रश्न दोघांच्याही मनात घुटमळत होते... पण संजूने त्यांना धीर दिला आणि घरी नेलं. पंधरा दिवसांनंतर, संजूने जवळच्या मित्र-मैत्रिणींना बोलावून आई-वडलांसाठी एक पार्टी ठेवली. वेलकम पार्टी. आपल्या आई-बाबांना सगळ्यांची ओळख करून द्यायची होती त्याला. संजूच्या आईने या पार्टीसाठी छान नऊवार साडी, नथ, हातभरून बांगड्या घातल्या होत्या. वय झालेलं असले तरी साजरी दिसत होती आई-वडिलांनी पण त्यांचं नेहमीचं पांढर धोतर, नेहरू शर्ट, पांढरी टोपी..अस्सल महाराष्ट्रीय वेश परिधान केला होता. पार्टीला सगळे जमल्यावर संजूने आईवडिलांची ओळख करून दिली. सगळ्यांना संजूच्या आईवडिलांना बघून आपल्या आईवडिलांची आठवण झाली. ओळखी झाल्यानंतर, “अरे आम्ही दोघं आतमध्ये बसतो’ असं संजूचे आई-बाबा त्याला म्हणाले.

संजू लगेच म्हणाला,” नाही बाबा, आज तुमच्यासाठी सगळ्यांना बोलावले, मग तुम्ही का आत जाता? उलट आमच्यामध्ये बसून गप्पा मारा, हवं तसे राहा. एकदम गावी राहतात तसे..स्वतःला वेगळं समजू नका.’ हे ऐकून आईवडिलांचे डोळे आनंदाने पाणावले. मुलाचा, सुनेचा खूप अभिमान वाटला. ते संजूला सगळ्यांसमोर म्हणाले, संजू आम्ही खूप नशीबवान आहोत तू आमच्या पोटी जन्म घेतला.आईवडिलांचं कर्तव्य असते मुलांना संस्कार देणे, चांगले शिक्षण देणे. मुलं कितीही मोठी झाली तरी लहानच असतात आई-वडलांसाठी. तू अगदी आनंदाने आमचं सगळं करतोस. सून अंजू, नातवंडंदेखील आपुलकीने आमचं करतात यातच आम्ही खुश आहोत. अजून आम्हाला काही नको.

हे ऐकून संजू आणि त्याच्या बायकोने सर्वांसमोर आई-वडलांना वाकून नमस्कार केला. ‘तुम्ही गरिबीतून काटकसरीने मला चांगले शिक्षण दिले, काय चूक, काय बरोबर ते सांगितलं म्हणून मी आज एवढ्या मोठ्या पदावर अमेरिकेत काम करतोय. ते सर्व तुमचं पुण्य. तुम्हाला आनंदात आणि सुखात ठेवण्याचं मी माझं कर्तव्य पार पाडतोय. त्यात काय विशेष...? संजूच्या आईवडिलांनी हलकेच डोळ्याच्या कडा पुसल्या. आईवडिलांना म्हातारपणी मुलांची सोबत हवी असते. मुलाने पाठवलेले नुसते पैसे नको असतात तर प्रेमाचे दोन शब्द आणि सोबत हवी असते...

रेवती जोशी संपर्क : ७७९८५९२६४६.

बातम्या आणखी आहेत...