आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Western Invasion Of India's Education System Still Continues | Article By Rajiv Malhotra

चर्चा:भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर अद्याप पाश्चात्त्य आक्रमण सुरूच

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाश्चिमात्य शिक्षण संस्थांकडून भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि संस्कृतीवर होणारे आक्रमण ही नवीन गोष्ट नाही, पण आता त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आयआयटीला लक्ष्य केले आहे. हार्वर्ड येथील मानववंशशास्त्राच्या प्राध्यापक अजंथा सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या ‘द कास्ट आॅफ मेरिट : इंजिनिअरिंग एज्युकेशन इन इंडिया’ या पुस्तकात आयआयटीवर जातीय अत्याचाराचा आरोप केला आहे. त्यांच्या युक्तिवादाचा मूळ आधार असा आहे की, आयआयटीची रचना उच्च जातींना अनुकूल आणि मागासलेल्या जातींना जाचक आहे. त्या भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात त्याची मुळे शोधतात. इंग्रजांच्या आगमनापूर्वी अभियांत्रिकी हा एक व्यावहारिक व्यवसाय मानला जात होता, तो मागासलेल्या जातीतील लोकांसाठी योग्य आणि फायदेशीर होता. ब्रिटिशांच्या काळात यात बदल झाला. कारण त्यांनी अभियांत्रिकीच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक बाबींची विभागणी केली होती. उच्चवर्णीयांनी सैद्धांतिक बाजू हायजॅक केली आणि मागासलेल्या जातींना केवळ व्यावहारिक काम उरले.

हे काही अंशी खरे आहे. हे एक सार्वत्रिक सत्य आहे की, परंपरेने भारतात कला, हस्तकला, ​​कारागिरी आणि अनेक प्राचीन परंपरांचे तांत्रिक ज्ञान मागासलेल्या जातीच्या लोकांकडे होते. इन्फिनिटी फाउंडेशन या माझ्या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास’ या पुस्तक मालिकेत अनेक मागासलेल्या जातींतील लोकांच्या पराक्रमाचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. तथापि, प्रा. सुब्रह्मण्यम हे अधोरेखित करण्यात अयशस्वी ठरल्या की, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सुधारणात्मक उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. ब्रिटिश व्यवस्थेची रचना ब्राह्मणांच्या फायद्यासाठी नाही, तर त्यांना देशावर राज्य करण्यास मदत करतील अशा कारकुनांची फौज विकसित करण्यासाठी केली गेली होती. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्याऐवजी स्वातंत्र्यानंतरच्या सर्व सरकारांनी ती चालूच ठेवली. यामुळे व्यावहारिक पातळीवर कौशल्ये गमावली आहेत. दुसरीकडे संगणक विज्ञानातील अभियांत्रिकीच्या विस्ताराने सैद्धांतिक बाजूचा आणखी विस्तार केला आहे, त्यामुळे या क्षेत्रात अतिरिक्त संधी निर्माण झाल्या आहेत. व्यावहारिक कौशल्ये व क्षमतांवर आधारित मानवी भांडवलाचा प्रवाह रोखला गेला आहे.

सुब्रह्मण्यम यांनी युक्तिवाद केला की, ही दुर्दैवी परिस्थिती सुधारण्याचा मार्ग म्हणजे आयआयटी रद्द करणे. ही उत्कृष्टता केंद्रे प्रतिभावान तांत्रिक लोक तयार करतात हे महत्त्वाचे नाही. या संस्था जगात ब्रँड इंडियाचे महत्त्व वाढवत आहेत, हे त्यांनाही पटत नाही. भारतातील किंवा सिलिकॉन व्हॅलीतील आयआयटीयन्सचे यश त्यांना सहन होत नाही, असे दिसते. त्यांच्या मते हा ब्राह्मण सत्तेचा विस्तार आहे. ते प्रवेश परीक्षेलाच लबाडी म्हणतात. सुब्रह्मण्यम यांनी आयआयटीबाबत मांडलेली समस्या आणि त्यांनी सुचवलेले उपाय मार्क्सवादी विचारसरणीशी जोडलेले आहेत. मार्क्सवाद आणण्यासाठी तुम्हाला सध्याच्या संरचना नष्ट करून नवीन मार्ग तयार करावा लागेल. आयआयटी सुस्थापित संरचना असल्याने ती त्यांच्या नाशाची हाक देत आहे. खोट्याच्या आधारे भारताची प्रतिमा डागाळली जात असून विद्यार्थ्यांच्या मनात भारताच्या समाजव्यवस्थेबद्दल विष कालवले जात आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजीव मल्होत्रा लेखक आणि विचारवंत rajivmalhotra2007@gmail.com

बातम्या आणखी आहेत...