आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुतांश ज्येष्ठ नागरिक रशियाच्या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. मात्र सेव्हियत संघाच्या विघटनानंतर रशियात जन्मलेली पिढी रशियाने छेडलेल्या या युद्धाच्या पूर्ण विरोधात आहे.
युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या कारवाईवर रशियातील लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वात आधी हे सांगावे लागेल की, रशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी परदेशात रशियन सैन्याला कारवाई करण्याची परवानगी दिली होती. याबाबत रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मांडलेल्या प्रस्तावाचे पूर्णपणे समर्थन केले होते. यानंतर १६ तासांनी लगेच रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला. या हल्ल्याबाबत रशियन जनतेने काय प्रतिक्रिया दिल्या ते आता पाहू... बहुतांश ज्येष्ठ नागरिक रशियाच्या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. मात्र सेव्हियत संघाच्या विघटनानंतर रशियात जन्मलेली पिढी रशियाने छेडलेल्या या युद्धाच्या पूर्ण विरोधात आहे. असे असले तरी युक्रेनला धडा शिकवण्याची गरज असल्याचे या युवक-युवतींमधील काहीचे म्हणणे आहे. मात्र ही मंडळी युद्धाच्या विरोधात आहेत. एक १९ वर्षीय युवक व्लादिमीरने म्हटले की, ‘युक्रेनपासून वेगळे झालेल्या दोन प्रदेशांना मान्यता देऊन रशियाने योग्य केले. मात्र यासाठी रशियन सैन्याचा वापर करणे योग्य नाही. रशियन सैन्याने सीमा ओलांडण्याऐवजी सीमेत राहूनच दोनेत्स्क आणि लुगांस्कला मदत करायला हवी होती.’
अल्योना नामक युवती म्हणाली की, ‘दुसऱ्याच्या घरात तोंड खुपसण्याची गरजच काय? हा युक्रेनचा घरगुती विषय आहे. त्यांनी तो स्वत:च निकाली काढला असता. या युद्धासाठी खर्च होणारा पैसा देशाच्या सुख-समृद्धीसाठी वापरला असता तर अधिक उत्तम झाले असते. आम्हा तरुणांसाठी नोकरीच्या नव्या संधी प्रदान करण्यात याव्यात. आम्हाला उच्च शिक्षण नि:शुल्क उपलब्ध व्हावे. प्राध्यापक आणि डॉक्टरांना अतिशय कमी वेतन मिळते. ते वाढवण्यात यावे. युद्धात ओतला जाणारा पैसा या कामात लावला असता तर अधिक चांगले झाले असते.’
वलेरिया नामक बीएच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनीने म्हटले की, ‘मी तर पूर्णपणे युद्धाच्या विरोधात आहे. जगात कुठेही युद्ध झाले तरी मी त्याचा विरोध करते. जेव्हा माझा देश रशियाच युद्ध सुरू करतो तेव्हा त्या लोकांच्या स्थितीचा विचार करून मला रडू कोसळते. त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काल सायंकाळी झालेल्या युद्धविरोधी प्रदर्शनात मी सहभाग घेतला. या प्रदर्शनाचे आयोजन कुणीही केले नव्हते. नेहमीप्रमाणे आम्ही तरुणांनी मिळून एक मूक मोर्चा काढण्याचे ठरवले. एका तासानंतर सेंट पीटर्सबर्गचा मुख्य रस्ता नेव्स्की प्रोस्पेक्टवर शेकडो तरुण-तरुणी मूक मोर्चात सहभागी झाले. हा उत्स्फूर्त विरोध होता. जो आपोआप समोर आला.’
मात्र जुन्या पिढीचे लोक असा विचार करत नाहीत. या पिढीत ४५-५० वयाच्या वरचे लोक समाविष्ट आहेत. त्यांच्या माता-पित्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. आन्ना नामक एक महिला म्हणाली, ‘आम्ही युक्रेन नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. आम्ही साऱ्यांनी मिळून फॅसिस्ट जर्मन सैन्यापासून सेव्हियत संघाला मुक्त केले. त्यांनी तेव्हाही जर्मन सैन्यासाठी काम केले आणि मोठ्या संख्येत रशियन तसेच युक्रेन लोकांना जर्मन सैन्याच्या हस्ते ठार केले. हे लोक आता पुन्हा युक्रेनमध्ये राहणाऱ्या रशियन वंशाच्या लोकांना त्रास देत आहेत. या लोकांच्या दडपशाही आणि अत्याचारापासून रशियन लोकांना मुक्त करणे ही रशियाची जबाबदारी आहे. त्यासाठी सैनिकी कारवाई गरजेचीच आहे.’
अन्तोन नामक एका ७० वर्षीय वृद्धाचे म्हणणे असे - ‘माझेही मानने आहे की युक्रेनच्या या सत्ताधारी राष्ट्रवाद्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. मात्र समस्या चर्चेतून सुटत असल्यास अधिक चांगले. युद्ध हा कोणतीही समस्या सोडवण्याचा चांगला आणि उत्तम मार्ग असूच शकत नाही. कोणत्याही युद्धाने नवी युद्धे जन्म घेतात. त्यामुळे युद्धापासून वाचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. रुसलान नावाची एक ८३ वर्षीय वृद्ध व्यक्ती आणि माजी सैन्य अधिकाऱ्याने युक्रेनमधील रशियन हल्ल्याचा पूर्णपणे उचित ठरवले. तो म्हणाला, बळाच्या जोरावर शत्रुंना गुडघ्यावर बसवूनच धडा शिकवावा लागतो. युक्रेन शासकांना धडा शिकवण्यासाठी पुतीन यांनी एकदम योग्य पाऊल उचलले आहे. युक्रेनवासीयही आमचे भाऊबंद आहेत. आमची भाषा, संस्कृती आणि रीतिरीवाज सारखे आहेत. जो कोणी आमच्या लोकांना त्रास देईल, त्याला आम्ही सोडणार नाही.’
या वेळी रशियाची ६२ टक्के जनता याच वृद्ध जमातीत मोडणारी आहे. युवा आणि वृद्ध पिढीच्या दृष्टिकोनातून हे अंतर समजून घ्यावे लागेल. पुतीनही ७० वर्षांचे झाले आहेत आणि ते याच वृद्ध पिढीचे नेतृत्व करतात.
मॉस्कोहून
अनिल जनविजय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.