आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि असुरक्षिततेमुळे आपल्या रागाचा पारा वर चढत आहे. त्यातच कोरोना महामारीने आव्हानांचे डोंगर उभे केल्याने रागाचा पारा उन्हापेक्षाही वाढतोय. अगदी किरकोळ कारणावरून त्रागा करण्याच्या, हिंसाचार करण्याच्या घटना घडत आहेत. राग किंवा क्रोध हा आपला शत्रू आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग आल्यावर आपण एकाग्रता गमावतो. रागामुळे शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. स्वाभाविक गती नष्ट होते. रागाच्या भरात आपण विचारशून्य होतो. विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही. त्यामुळे योग्य -अयोग्यचा फरक जाणवत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे. आपल्या संतांनी राग म्हणजेच क्रोधाला ‘रिपू’ म्हटले आहे. रिपू म्हणजे अवगुण. षडरिपूंपैकी एक. रागामुळे सर्वप्रथम आपलाच विनाश होणार असल्याचे महात्मा बसवेश्वरांनी एका वचनांत सांगितले आहे. ते म्हणतात,
शरीराचा राग नात्यांना घातक मनातील राग विवेकाला घातक, घरातील आग सर्वप्रथम घर जाळून टाकेल शेजाऱ्यांचे घर जाळणार नाही, कूडलसंगमदेव
आपला राग शारीरीक पातळीवर व्यक्त झाल्यास हिंसक घटना घडतात. रागाने फुसफुसणाऱ्या मनामुळे शरीरावरही परिणाम होतात. आपल्या शरीरातील दोष वरचढ होतात. त्या आगीत सर्वप्रथम आपणच भस्मसात होतो. आजच्या ताणतणावाच्या युगात रागामुळे बीपी-शुगरसारखे आजार कधीही घात करू शकतात. राग आला की बीपी वाढतो. त्यापाठोपाठ शुगरची समस्या डोके वर काढते. म्हणजे क्रोधाग्नीमुळे आपणच सर्वप्रथम जळून जाणार हे ठरलेलं असल्याचं महात्मा बसवेश्वरांना अभिप्रेत आहे. दुसरीकडे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काम-क्रोधास बंदिखानी घालण्याची, वश करण्याची सूचना केलीय. रागापासून कुणाचीही सुटका झालेली नाही, हे जितकं खरं आहे त्याहून रागाने कुणाचं भलं झालेलं नाही हे कैकपटीने खरं आहे. तोंडून येणाऱ्या शब्दांवर आणि हातून घडणाऱ्या कृतीवर आपला ताबा नसतो. मात्र त्याचे परिणाम चांगले नसतात. शस्त्राने केलेल्या जखमा भरून निघतात, शब्दाने केलेल्या नाही.
राग येण्याची कारणं म्हणजे आपला स्वभाव. आपली गृहितकं. समज-गैरसमज. पूर्वग्रहदूषित मतं. अगदी खोलवर रुजलेली विचारसरणी. यासोबत आपल्या आवडीनिवडी आणि ज्या वातावरणात आपण वाढतो त्याचाही आपल्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम होतो. साहजिकच राग आणि संयमसुद्धा त्या वातावरणाची देणगी असू शकतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, अपेक्षाभंग, स्वत:च्या चुकांची पावती दुसऱ्याच्या नावावर फाडणे ही राग येण्याची सर्वात महत्त्वाची कारणं आहेत.
आपल्या अवतीभोवती अशी खूप माणसं आहेत की आपल्याला राग येतो, आपण थोडे रागीट आहोत हे मान्य करत नाहीत. जे स्वत: स्वीकारतच नाहीत, ती मंडळी रागातून बाहेर येण्यासाठी कसे प्रयत्न करतील? त्यासाठी संतश्रेष्ठ मुक्ताबाई आपल्याला मदत करतात. चराचरासाठी पसायदान मागणारे खुद्द ज्ञानेश्वर माउली उपेक्षा, उपहास, अपमान आणि समाजामध्ये असलेले जाणिवेच्या अज्ञानामुळे उद्विग्न आहेत. स्वत:वरच रागावून ताटीचे म्हणजे झोपडीचे दार लावून आत स्वत:ला कोंडून घेतात. त्या वेळी ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभंगात मुक्ताई म्हणतात-
‘योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा। विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।’
योगी, संत हे जनाचा अपराध सहन करतात, पण रागावत नाहीत. विश्व रागाने-द्वेषाने भडकले तरी संत स्वत: पाणी होऊन ती ज्वाला विझवितात. स्वत: सुखसागर होऊन जगाला शांत करतात. संयमाची शिकवण देतात. मुक्ताईच्या या अभंगातील संदेश आपण वर्तमानाशी रिलेट करणं अधिक महत्त्वाचं आहे. आता केवळ संत-महात्मे नव्हे, तर सर्वांनीच स्वत:कडे ‘पाणी’ होण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. रागरूपी आगीला विझविण्यासाठी स्वत:मध्येच विवेकातून जलस्रोत विकसित करण्याची गरज आहे. मग रागाच्या भरात काहीबाही करून राग शांत झाल्यावर मोठी किंमत मोजण्यापेक्षा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चा एक स्वतंत्र पॅटर्न वा थेरपी विकसित करावी. रागावर नियंत्रण मिळवण्याचे अनेकांनी अनेक उपाय सांगितले आहेत. काहींनी राग येण्याच्या कारणांचीही चर्चा केली आहे. राग आल्यास दीर्घ श्वास घ्यावा हा सुपरहिट फंडा मानला जातो. मनातल्या मनात शंभर मोजणे, रागातील कृतीनंतर होणाऱ्या परिणामांचा क्षणभर विचार करणे, तशी स्वत:ला सवय लावणे, राग अनावर झाल्यास त्या ठिकाणाहून तातडीने लांब जाणे, घरी रागाचे प्रसंग निर्माण झाल्यास दुसऱ्या खोलीत जाणे, थोड्या वेळात शांत होऊन नरमाईच्या भाषेत त्या मुद्द्यावर चर्चा करणे हा मार्ग आपण स्वीकारू शकतो. आवडते छंद जोपासणे, सर्जनशील कार्यात व्यग्र राहणे लाभदायक ठरू शकते. बागकाम करणे, साफसफाई करणे यांसारख्या कामांमध्ये आपण व्यग्र राहू शकतो. संगीत ऐकणे, वाद्य वाजवणे यांसारखी कामे आपण करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे ऑफिस आणि घर वेगळे ठेवणे. म्हणजे घरच्या कटकटींचा परिणाम ऑफिसच्या कामावर आणि ऑफिसच्या कामाचा ताण घरच्या सदस्यांवर निघणार नाही याची काळजी घेणे. आम्ही काही मित्रांनी घरी आणि बाहेरही अँगर मॅनेंजमेंट थेरपी विकसित केलीय. ज्याबद्दल आपल्याला राग आलेला आहे त्याच्याशीच थेट बोलायचे. राग आल्यास स्पष्ट तणतण न करता शांतपणे सांगणे की, मला राग आला आहे. जरा जास्तच राग आला असेल तर ‘मला खूपच राग आला आहे’ असे सांगून टाकणे. राग येण्यामागच्या कारणांवर अधिक चर्चा करून उगाळत न बसता ओके म्हणत त्या मुद्द्याला बाय देणे. कुणालाही गृहीत धरायचे नाही, कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत.
शेवटी राग येऊ न देणे हाच रागावरचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. योगियांचे योगी अल्लमप्रभुदेव म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला नेहमीच तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब पडताच जसा चर्रर्र आवाज येतो, तसेच रागाचा पारा आकाशाशी स्पर्धा करणारे जग हवंय की शांत आणि समजूतदार जग हवंय हा चॉइस सर्वस्वी आपलाच आहे. त्यासाठी आपला स्वतंत्र अॅक्शन प्लॅन हवा इतकंच. संपर्क : channavir@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.