आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • What Is Masculinity And Femininity? | Artical By Ravindra Rakhamin Pandharinath

परग्रहा’वरून पत्र:पुरुषीपणा आणि बायकीपणा म्हणजे काय हो?

रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रिया नऊ महिने अपत्याला गर्भात वाढवतात, त्याला जन्म देतात, काही काळ त्याला अंगावरचं दूध पाजतात. पुरुष हे करू शकत नाहीत, हाच स्त्री-पुरुषांमधला मुख्य नैसर्गिक भेद आहे, बस्स! त्याशिवाय बाकीचे सर्व भेद हे मानवनिर्मित/समाजनिर्मित आहेत. अर्थात ते सारे वरवरचे आहेत. पण, या वरवरच्या भेदांनी आपलं सारं जीवन व्यापलंय.

प्रि य मित्र-मैत्रिणींनो, स्त्री-पुरुषांची भावविश्वं व अनुभवविश्वं, त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, हे आपण पाहिलं. त्यामुळे होणाऱ्या गमतीजमती व नातेसंबंधांना जाणारे तडे आपल्या परिचयाचे आहेत. पण हे असं का घडतं? ही दोन जगं परस्परांच्या इतक्या जवळ असूनही इतकी दुरावलेली का आहेत? त्यांच्यामधलं अंतर पार करणं हे वाघा बॉर्डर पार करण्याइतकं कठीण का आहे, किंवा तसं का मानलं जातं? ह्या साठा प्रश्नांची पाचा उत्तरी कहाणी आहे, तिचं नाव आहे लिंगभाव. म्हणजे बायकीपणा व पुरुषपणा ह्यांचा कारखाना.

आपण सर्व स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येतो. (ह्या विभाजनापलीकडेही एक वर्गवारी आहे. तिच्यात समलैंगिक, उभयलिंगी, इंग्रजीत LGBTQ+, यांचा समावेश होतो. त्यांचा स्वतंत्र विचार आपण वेगळ्या पत्रातून करणार आहोत.) पण किशोरावस्थेत पाऊल ठेवण्यापूर्वी स्त्री-पुरुषांत फरक करणं तसं कठीण असतं. पण तरीही अगदी लहानपणापासून आपली ओळख एक स्त्री किंवा पुरुष म्हणून केली जाते. ती ओळख आपल्याला समाजाकडून दिली जाते व आपण सारे ती प्राणपणाने जपतो. इतकी की तिला धक्का लागला तर आपला जीव द्यायलाही माणसं मागेपुढे पाहत नाहीत. अगदी बालवाडीतल्या मुलग्यालाही मुलगी म्हणणं हा स्वतःचा अपमान वाटतो. आपली ही ओळख कोण ठरवतं? त्यामागचे निकष कोणते? त्यामागचा उद्देश काय?

खरं पाहिलं तर स्त्री आणि पुरुष ह्यांच्यातील नैसर्गिक फरक अतिशय मोजके आहेत. वयात आल्यावर त्यांच्या शरीरात काही अंतर्बाह्य बदल होतात. उदा. पुरुषांना दाढी-मिशा फुटणे, लैंगिक अवयवांची वाढ, स्त्रियांच्या शरीराला गोलाई व पुरुषांच्या स्नायूत येणारा भरीवपणा. वयाच्या एका टप्प्यानंतर स्त्री-पुरुषांमध्ये लैंगिक अंतर्स्राव, sexual hormones पाझरणे थांबतेदेखील. त्यामुळे लहान मुलांप्रमाणे वृद्धांमध्येही स्त्री-पुरुषांमधील शारीरिक भेद कमी प्रमाणात दिसून येतो. स्त्रिया नऊ महिने अपत्याला गर्भात वाढवतात, त्याला जन्म देतात व जन्मानंतर काही काळ त्याला अंगावरचं दूध पाजतात. पुरुष हे करू शकत नाहीत, हाच स्त्री-पुरुषांमधला मुख्य नैसर्गिक भेद आहे, बस्स! त्याशिवाय बाकीचे सर्व भेद हे मानवनिर्मित/समाजनिर्मित आहेत. म्हणजे ते पक्के, चिरेबंद किंवा बदलू न शकणारे नाहीत. ते सारे वरवरचे आहेत. पण ह्या वरवरच्या भेदांनी आपलं सारं जीवन व्यापलंय. कारण आपण जिला समाज व्यवस्था म्हणतो तिने पुरुषीपणा आणि बायकीपणा असे हवाबंद कप्पे निर्माण केले आहेत आणि आपल्यातल्या प्रत्येकाला आपापल्या कप्प्यात फिट्ट बसण्याची कसरत करावी लागते. ते केलं नाही किंवा त्यात काही कसर राहिली, तर...? लोक हसतील, वाळीत टाकतील, आपण कुठलेच राहणार नाही...

पुरुष म्हणजे कसा आक्रमक, खंबीर, कधीही न झुकणारा, कर्तबगार, धाडसी, बुद्धिमान, भावनांमध्ये न वाहणारा, बायका-मुलांना काही कमी पडू न देणारा, आणि स्त्री म्हणजे नाजूक, अबोल, लाजरीबुजरी, सौम्य, समंजस, कॉम्प्रमाइझ करणारी, लवचिक, स्वत:च्या अहंकाराला मुरड घालणारी, भित्री, भावनाप्रधान, नटण्या-मुरडण्याचा सोस असणारी, म्हणजे अर्थातच सहनशील, क्षमाशील. झालं.. कोट्यवधी स्त्री-पुरुषांचं सारं आयुष्य मग ह्या वर्णनात फिट्ट बसण्यात सरतं. कोणत्याही स्त्री व पुरुषाने नीट आत्ममूल्यांकन केलं तर ह्या वर्णनातल्या अनेक बाबी आपल्याला लागू होत नाहीत, तसेच परिचयातील कोणतीही व्यक्ती ह्या वर्गीकरणात सामावू शकत नाही, हे त्याच्या/तिच्या लक्षात येऊ शकेल. पण आहे कोणात हिंमत असे परीक्षण करण्याची? पुरुषांवर संकटे कोसळतात, तेव्हा खरंच का ते धीरोदात्तपणे त्यांचा सामना करतात? स्त्रिया तेव्हा फक्त माजघरात बसून मुसमुसत राहतात हेदेखील खरं आहे का? मग हजारो पुरुष शेतकरी अस्मानी-सुलतानीचा मुकाबला करण्यात कमी पडले म्हणून आत्महत्या करतात, त्याचं काय? शिवाय त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवा आत्महत्या न करता, शेतीचा कर्जात अधिकच रुतलेला गाडा स्वतःच्या हिमतीने बाहेर खेचून काढतात. शेती गिळंकृत करायला तापलेले नातेवाईक, एकट्या बाईचा फायदा घेण्यास आतुर घरातील व बाहेरील लंपट पुरुष ह्यांचा मुकाबला त्या समर्थपणे करतात, ह्याचा अर्थ कसा लावायचा? घर, कारखाना, सरकारी व खासगी कार्यालयं, व्यापार, क्रीडा, उद्योग, शेती ह्या सर्व आघाड्यांवर यश संपादन करणाऱ्या ज्या असंख्य स्त्रिया तुमच्या-आमच्या परिचयाच्या आहेत, त्या केवळ सेलिब्रिटीच नाहीत, तर आपल्या आया, मावशा, काकी, आत्या, बहिणी, बायको, मैत्रिणीदेखील आहेत, हे पुरुषही मान्य करतील. ह्या कर्तबगार स्त्रियांच्या तुलनेत वत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान, मानसिक आधार देणाऱ्या पुरुषांची संख्या कमी असली, तरी तेही आहेत आपल्या अवतीभवती हे स्त्रियाही कबूल करतील. नवरा, भाऊ, मुलगे ह्यांच्याबद्दल फारसा चांगला अनुभव नसणाऱ्या बाईलाही ‘माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला’, हे सांगण्यात धन्यता वाटतेच ना. सुमारे शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे स्त्री-पुरुष समतेची लाट येण्यापूर्वी कर्तबगार स्त्रियांची संख्याही खूप मर्यादित होती. आता पुरुष-स्त्री समतेची नवी लाट आली, पुरुषांनी स्त्रीसुलभ गुण अंगीकारण्यात धन्यता मानली, त्यासाठी प्रयत्न केले, त्याला समाजाने पाठिंबा दिला, तर अशा प्रेमळ-कनवाळू पुरुषांची संख्याही झपाट्याने वाढेल. स्वैपाक, मुलाबाळांचा सांभाळ करण्यात मला फारसा इंटरेस्ट नाही, असं सांगणारी स्त्री आजही अल्पसंख्य आहे. मला कॉर्पोरेट जॉब करायचा नाही. त्यापेक्षा मी घर सांभाळून कलेची जोपासना करेन, असे स्वप्न असणारे कितीतरी तरुण मला माहीत आहेत. पण त्यांना कर्तेपणाच्या-पोशिंद्याच्या भूमिकेच्या बाहेर पडू द्यायला समाजाची आडकाठी आहे.

समाजव्यवस्था स्त्रियांच्या उन्नतीच्या आड कशी येते ह्यावर बरेच लिहून-बोलून झाले आहे. पुरुषप्रधान असूनही ती पुरुषांवर कशी अन्याय करते, आपल्या ‘मर्दानगी’ची किती किंमत पुरुषाला चुकवावी लागते, ह्याचा नंतरच्या पत्रात विचार करू. तोवर, वाचा, विचार करा, आपले अनुभव तपासून पाहा. बोलत राहा. तुम्हाला स्त्री-पुरुष भेदापलीकडे नेऊ पाहणारा तुमचा मित्र. संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...