आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • What Is The Significance Of Mamata's Victory In West Bengal? Rajdeep Sardesai, Senior Journalist; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:पश्चिम बंगालमधील ममतांच्या विजयाचा अन्वयार्थ काय? - राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांस्कृतिक ओळख असलेल्या राज्यांमध्ये ‘दिल्लीचे राजकारण’ चालणार नाही हा या निवडणुकीचा धडा

लोकशाहीत प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते, पण पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे महत्त्व मोठे आहे. प्रादेशिक पक्षांची आपल्या भागांतील पकड कायम आहे, प्रादेशिक भाषा, स्थानिक मुद्द्यांवर लोकल ग्राउंड कनेक्ट किंवा जातीय समूहांच्या अपेक्षा, आपल्या भागातील अशा नाड्यांवर हात असलेले नेते जनतेचे मन जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत, हे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जींचा मोठा विजय हे त्याचे निदर्शक आहे. केरळमध्ये विजयन यांचीही गुड गव्हर्नन्सच्या रूपात चांगली पकड आहे. तामिळनाडूत स्टॅलिन यांनी द्रविड ओळख कायम ठेवली आहे, तर आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा सरमा यांनी प्रादेशिक आकांक्षांची पूर्तता करणारे नेते ही प्रतिमा बनवली आहे.

या प्रादेशिक नेत्यांच्या अशा ताकदीमुळेच त्यांच्या पक्षाला विजय मिळाला आहे. त्याचा धडा असा की, ज्यांची स्वत:ची प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख आहे अशा राज्यांत तुम्ही दिल्लीचे राजकारण करू शकत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे भाजपने या वेळी बंगालच्या निवडणुकीत जेवढी ताकद आणि संसाधनांचा वापर केला तेवढा कुठल्याही विधानसभा निवडणुकीत स्वत: भाजपने किंवा इतर पक्षांनी केला नसावा. पण राष्ट्रीय पक्षाच्या अगणित संसाधनांसमोर प्रादेशिक नेत्याने आपली मुळे मजबूत करून एकट्याने लढत दिली तर जनतेची सहानुभूती त्याच्यासोबत असते. ममता व विजयन हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

दुसरा घटक म्हणजे मुस्लिम मते. बंगालमध्ये मुस्लिम पूर्णपणे तृणमूलसोबत गेले आहेत हे स्पष्ट आहे. त्यांनी काँग्रेस किंवा डाव्या पक्षांवर विश्वास ठेवला नाही. दुसरीकडे, भाजपने हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा खूप प्रयत्न केला, श्रीरामाच्या घोषणा दिल्या आणि ममतांना हिंदूविरोधी घोषित करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. भाजप हिंदू-मुस्लिम नरॅटिव्हमध्ये अडकला आणि ममतांनी बंगालची मुलगी, बंगालचा गौरव हे मुद्दे समोर करून हिंदू ध्रुवीकरणाची भाजपची रणनीती अयशस्वी ठरवली. ममतांनी बंगालमध्ये ४८ टक्के मते मिळवली त्याचा अर्थ हिंदू मतेही त्यांच्यासोबत आहेत हे स्पष्ट आहे. पण देशातील दुसरा सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच्या दुर्दशेची चर्चा केल्याशिवाय विश्लेषण अपूर्ण ठरेल.

पाच वर्षांपूर्वी ज्या बंगालमध्ये काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष होता, आज त्याचा सफाया झाला आहे. ज्या आसाम आणि केरळमध्ये त्याला मोठी अपेक्षा होती, तिथेही अपेक्षाभंग झाला आहे. खरे म्हणजे, काँग्रेसला आपले दुखणेच कळलेले नाही. ऐन निवडणूक काळात सक्रिय होऊन जनतेचे मन जिंकता येत नाही हे राहुल गांधींना समजून घ्यावे लागेल. काँग्रेसला ग्राउंड लेव्हलला काम करावे लागेल. आपले प्रादेशिक नेते तयार करावे लागतील. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला मते. बंगाल, केरळ आणि काही अंशी आसाममध्ये महिलांसाठी राज्य सरकारांनी सुरू केलेल्या योजनांचा पक्षांना फायदा झाला आहे. आपल्याला काय फायदा झाला हे मतदार पाहतात. महिलांनीही ममता, विजयन आणि आसाममध्ये भाजपला साथ दिली.

पुढील वर्षी ७ राज्यांत निवडणूक, जनता कोविड मुद्द्यावर सरकारांना पारखणार...
पुढील वर्षी यूपी, उत्तराखंड, गुजरात, पंजाबसह सात राज्यांत निवडणूक आहे. कोविडशी लढण्यात या सरकारांच्या भूमिकेकडे जनतेचे बारीक लक्ष आहे. यूपीत भाजपसमोर अखिलेश आणि मायावती आपल्या प्रादेशिक ताकदीचे समीकरण कशा प्रकारे साधतात हे पाहावे लागेल. ‘विधानसभा निवडणुकीत फोकस स्थानिक मुद्दे, स्थानिक नेतृत्वावर ठेवा’ हा या निवडणुकीचा खरा संदेश आहे. बंगालच्या निकालामुळे राष्ट्रीय राजकारणात बदल होईल, असे म्हणणे सध्या चुकीचे ठरेल. कारण लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षे बाकी आहेत.

बातम्या आणखी आहेत...