आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल आला होता, त्यात १२२ देशांमध्ये भारत १०७ व्या क्रमांकावर होता. हंगर इंडेक्समध्ये भारत उत्तर कोरिया, इथिओपिया, सुदान, रवांडा, नायजेरिया आणि काँगो या देशांच्याही मागे आढळला! तेव्हाही माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, अशा चुकीच्या अहवालांना आपण एवढ्या गांभीर्याने का घेतो आणि त्यांना जगात इतके कव्हरेज का मिळते? आता वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आला आहे. या अहवालातही आकडेवारीतून हास्यास्पद निष्कर्ष काढण्यात आले आहेत. अहवालात १३६ देशांपैकी भारत १२६ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारत हा जगातील सर्वात नाखुश देशांपैकी एक आहे! या अहवालानुसार युक्रेन, इराक, बुर्किना फासो, पॅलेस्टाइन, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांसारख्या युद्ध किंवा अंतर्गत संघर्षांनी ग्रासलेले किंवा जवळपास दिवाळखोरीत गेलेले देश भारतापेक्षा अधिक सुखी आहेत. चला, निदान आमचे शेजारी तरी खुश आहेत! सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क या एनजीओने युनायटेड नेशन्स समर्थित वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. किती छान नाव आहे, नाही का? या छोट्या संस्थेची वार्षिक कमाई ११ दशलक्ष डाॅलर आहे. यातील बहुतांश निधीही अनुदानातून येतो. त्यांनी जारी केलेला अहवाल पीडीएफ दस्तऐवज आहे, त्यामध्ये अशा तीन गोष्टी आहेत, ज्या अशा अहवालांसाठी आवश्यक मानल्या जातात. पहिली, तो रंगीबेरंगी आणि सुंदर डिझाइन केलेला आहे, दुसरी म्हणजे त्यात भरपूर आकृत्या व तक्ते आहेत आणि त्यात ‘रिग्रेशन को-इफिशियंट’ असे शब्द वापरले आहेत, त्यामुळे आपल्याला असे वाटते की, आपण खूप काही अॅकॅडमिक वाचत आहोत. तिसरी, यात विविध वांशिक समुदायांतील लोकांची बरीच छायाचित्रे आहेत. अशा अहवालांत सादर केलेल्या छायाचित्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही आहेत : एक, ती कुटुंबाची छायाचित्रे असावीत किंवा मुले असलेली स्त्री दाखवावी, दोन, छायाचित्रांत दिसणारे लोक गरीब असावेत, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू असावे. तीन, छायाचित्रांत एखाद्या विकसनशील देशातील लोक खेड्यात त्यांची पिके किंवा गुरे यांसोबत उभे असलेले असावेत आणि चार, छायाचित्रांसोबत एक चांगले जग तयार करू इच्छिणारे एक व्हर्च्युअल-सिग्नलिंग कोट असले पाहिजे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये हे सर्व आहे. तो प्रत्येक देशातील आनंदाची पातळी मोजण्याचा आणि रँकिंग देण्याचा दावा करतो. आनंद - हा शब्द भुकेसारखा मोठा आणि भावपूर्ण आहे. पण आनंदाचे मोजमाप कसे करायचे? तुम्ही जगभर फिरून लोकांना विचाराल की, तुम्ही आनंदी आहात का? नक्कीच नाही. ते खूप सोपे होईल. असो, तिसऱ्या जगातले बिचारे सुख म्हणजे काय हे कसे सांगणार? आनंद म्हणजे काय ते आम्ही त्यांना सांगू आणि त्याचे निकषही आम्हीच ठरवू. मग ते निकष काय आहेत? यासाठी ते गॅलप वर्ल्ड पोलवर अवलंबून आहेत. पोलमध्ये लोकांना विचारले जाते की, त्यांना आयुष्यात कुठे राहायचे आहे आणि त्या तुलनेत ते सध्या कुठे आहेत? हे १ ते १० च्या प्रमाणात मोजले जाते. एखाद्या व्यक्तीने स्वतःला कमी रँकिंग दिले तर याचा अर्थ त्याचा देश दुःखी आहे! म्हणजेच, मला वाटत असेल की, मी जीवनात एखाद्या टप्प्यावर पोहोचले पाहिजे, परंतु मी आता त्या टप्प्यावर नाही, तर याचा अर्थ मी दुःखी आहे का? सर्वेक्षणात असे प्रश्न प्रत्येक देशातील ५०० ते २००० लोकांना विचारले जातात. याचा अर्थ असा की, १ अब्ज ४० कोटी लोकसंख्येच्या देशाबद्दल २००० लोकांनी जे सांगितले त्या आधारावर निर्णय घेतले जातात! अहवालाच्या लेखकांनी आनंदाचे मोजमाप करण्यासाठी आणखी काही घटक जोडले आहेत, उदा. दरडोई उत्पन्न (म्हणजे ते आधीच या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की, जे श्रीमंत आहेत ते आनंदी आहेत), तुम्ही किती दान देता (हेही श्रीमंतांना अनुकूल आहे), तुमच्याकडे किती भ्रष्टाचार आहे, तुम्हाला समाजकल्याणाचे किती फायदे मिळतात (श्रीमंत देशांच्या खात्यात आणखी एक मुद्दा), तुम्ही निर्णयासाठी किती स्वतंत्र आहात (आपला सामूहिक समाज पश्चिमेकडील व्यक्तिवादी समाजांच्या तुलनेत या मुद्द्यावर नक्कीच चांगले गुण मिळवणार नाही) इ. इ. या निकषांवर जगातील सर्वात आनंदी देश कोणता? फिनलंड, तो सलग सहा वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. हा देश उत्तर ध्रुवाजवळ आहे आणि काही ठिकाणी हिवाळ्यात तापमान उणे ४० अंशांच्या खाली जाते. त्यातील काही भागात दोन महिने सूर्य उगवत नाही. तिथले लोक फारसे बोलत नाहीत. तुम्ही याला जगातील सर्वात आनंदी देश म्हणता? सर, तुम्ही कधी आमची आयपीएल बघायला आलात का? किंवा तुम्ही आमचे विवाह सोहळे आणि सण पाहिले आहेत? आणि असे अहवाल तयार करणाऱ्यांनी जगातील नैराश्याची पातळी मोजली आहे का? त्यांनी घटस्फोटाचे प्रमाण पाहिले आहे का? किंवा पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात वृद्ध त्यांच्या मुलांशी किंवा नातवंडांशी किती सहजतेने भेटू शकतात याचे तुम्ही मूल्यांकन केले आहे का? किंवा देवाशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळे लोक जीवनात किती शांतता अनुभवतात? या सर्व गोष्टी अप्रासंगिक आहेत आणि केवळ आर्थिक निकष प्रासंगिक मानले जातील का? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.