आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • What To Do And What Not To Do While Going To A Wedding | Article By Rashmi Bansal

नवा विचार:लग्नाला जाताना काय करावे अन् काय अजिबात करू नये

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेले होते. पण, तिथे गेल्यावर मला वाटले की, मी तयारी नीट केली नाही. अनेक महत्त्वाच्या गोष्टी सोबत आणायला विसरले. त्यामुळे खूप त्रास झाला. असो, मी तुम्हाला सावध करते, जेणेकरून तुम्ही तीच चूक करू नये. लिहून घ्या. १. काळा चष्मा : चित्रपटाच्या सेटवर गेला आहात का? आता वेडिंग कॉकटेल फंक्शनमध्येही असाच चकचकाट दिसेल. चमकदार प्रकाशयोजना, चमकदार कपडे आणि रंगीबेरंगी मेकअप, आनंद घेताना डोळ्यांवर आणि मनावरही ताण पडेल. म्हणूनच काळा चष्मा सोबत ठेवा. दिवस असो किंवा रात्र, हे सर्व फॅशनबद्दल आहे! २. इअरप्लग्ज : आता संगीत समारंभाकडे जाऊया, तिथे संगीतापेक्षा गोंगाट जास्त असतो. कानाच्या सुरक्षेसाठी इअरप्लग्ज सोबत ठेवा. याचा आणखी एक फायदा म्हणजे भटिंडाची मावशी येऊन म्हणते, ‘कशी आहेस?...’ ते आपल्याला ऐकू येणार नाही. आणि जे ऐकले नाही त्याबद्दल वाईट कसे वाटेल! ३. हाजमोला : आता आपण लग्नाला आलो आहोत तर तिथे जेवण करावेच लागेल. पण पोट मात्र एकच असते. आपण उंटांसारखे असतो तर आपण २५१ पदार्थांचा आस्वाद घेऊ शकलो असतो. आणि मग आठवडाभर काही खाल्लेच नसते. तरच अमृतसर ते अंटार्क्टिकापर्यंतच्या सर्व पाककृतींचा आस्वाद घेता आला असता. असो, आता पोटासाठी एक गोळी पर्समध्ये ठेवा. हळूहळू, थोडी थोडी चघळा. ४. हत्तीची कातडी : तुमच्याशी कोणी नीट बोलले नाही. कोणी बोलले तर २० वर्षांपूर्वीच्या भांडणावर बोलू लागले. अहो, हत्तीच्या सोंडेपेक्षा लांब स्मरणशक्ती असलेले काही लोक असतात. मग आपणही हत्ती व्हावे. त्यांच्यासारखी जाड कातडी पांघरावी. मग काही टोचणार नाही आणि वाईटही वाटणार नाही. ५. संयमाचे फळ : कोणत्याही समारंभात सहभागी होण्यापूर्वी या फळाच्या एक- दोन फोडी तोंडात टाका. कारण कोणताही समारंभ वेळेवर सुरू होत नाही किंवा संपतही नाही. वरात दारात आली तरी वधू पार्लरमधून परतलेली नसते. स्टेजवर फोटो काढायचा असेल तर वाट पाहा. नातेवाइकांवर प्रेम करा. ६. खोटे स्मित : मेकअप केला, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरील हसू. मनात नसले तरी ते दाखवणे आवश्यक आहे. बाथरूममध्ये आरशासमोर उभे राहून याचा सराव करा. तुम्हीही अभिनय करू शकता. एका दिवसासाठी अमिताभ किंवा रेखा बनू शकता. ७. लिफाफा : आजकाल अनेक लोक लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर ‘भेटवस्तू नको, फक्त आशीर्वाद हवा’ असे लिहितात. त्याचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही फक्त रोख रक्कम द्या. जुन्या काळात लोक थर्मास, डायनिंग सेट व पुष्पगुच्छ मिळवून थकले होते. त्यामुळे हा नवा नियम तयार करण्यात आला. थोडी अनिच्छा असेल, पण आग्रह धरलात तर ते घेतील. शेवटी, रोख ही रोखच आहे. ८. स्पोर्ट््स शूज : पहिल्या समारंभात सुंदर पेन्सिल हिल्स घातली होती. दुसऱ्या समारंभात छोटी हिल घातली. तिसऱ्या समारंभाआधी पाय इतके दुखू लागले की उठावेसे वाटत नाही. या दिवशी स्पोर्ट््स शूज उपयुक्त ठरतील. कुणी विचारले तर सांगा, इन्स्टाग्रामवर हेच चाललंय. अहो, चित्रविचित्र परिधान ही एक कला आहे... बरं, हे उपहासाचे शब्द होते. खरे म्हणजे सोबत नेले पाहिजे मोठे हृदय. कोणाचे तरी लग्न आहे, तेव्हा सर्वकाही आपल्या इच्छेनुसार होणार नाही. पण, त्यांनी तुम्हाला प्रेमाने बोलावले, आनंदात सहभागी केले, म्हणून त्यांना आदर द्या. तक्रारखोर चेहरा व वाकडे बोलणारे होऊ नका. आजकाल कुटुंबातील सदस्यांना एकमेकांना भेटण्याच्या संधी कमी मिळतात. मुले नातेवाइकांना ओळखत नाहीत. दोष त्यांचा नाही, आपला आहे. आजीच्या घरी महिनाभर घालवण्याऐवजी आपण त्यांना फिरायला घेऊन गेलो. आपण एकत्र उठतो-बसतो, हसतो-खेळतो, एकमेकांना जाणून घेतो, सहन करतो तेव्हाच प्रेम वाढते. आजच्या विवाह सोहळ्यांत चकचकाट कमी आणि आत्मीयता अधिक असती तर... किती पैसे खर्च झाले, याची गणती नसती. आज प्रत्येक मन आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहे, पण ते धावते स्वप्नांच्या मागे. प्रियजन भेटल्यावर त्यांना मिठी मारा. आपसात फक्त प्रेम वाढवा. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in

बातम्या आणखी आहेत...