आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ते नंतर खरे ठरते

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील एका छोट्या शहरात वाढलेल्या प्रेम गणपतीची मोठी स्वप्ने होती. कसाबसा तो दहावी पास झाला आणि भविष्य घडवण्यासाठी मुंबईला निघाला. पण, तिथे पोहोचल्यावर ज्या माणसाने त्याला नोकरीचे आश्वासन दिले होते त्यानेच प्लॅटफॉर्मवरूनच गायब झाला. आता या नव्या शहरात ओळख नाही, काम नाही, पण तो परत यायला तयार नव्हता. उडुपी हॉटेल हा मुंबईत बऱ्याच काळापासूनचा ट्रेंड आहे, तिथे लोक इडली-डोसा चवीने खातात. अशाच एका हॉटेलच्या मालकाने या तरुणाला दयाभावाने नोकरी दिली. पण कोणती? भांडी धुण्याची. दुसरा कोणी असता तर त्याने नशिबाला दोष दिला असता, पण प्रेम गणपती खुश झाला - निदान रात्री झोपायला जागा तरी मिळाली. काही दिवसांनी मालकाला सांगितले, दुपारी दोन तास काम नसते, मग मी जवळच्या ऑफिसमध्ये चहा देऊ का? तो म्हणाला, ठीक आहे, कर. एक किटली आणि कटिंग चहाचा ग्लास घेऊन हा निघाला. काही दिवसांतच त्याने असे ग्राहक तयार केले, जे तो येण्याची वाट पाहत बसायचे.

चहाप्रेमींची प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. काहींना साखर कमी, तर काहींना दूध कमी. प्रेम गणपती प्रत्येकाच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना मनापासून चहा पाजतो आणि तेही हसऱ्या चेहऱ्याने. काही महिन्यांनी एका ग्राहकाने प्रस्ताव दिला, चहाची टपरी उघडूया. मी पैसे गुंतवीन, तू काम कर, आपली भागीदारी चांगली होईल. चहाचा धंदा चांगला चालला होता, पण प्रेमने विचार केला, काही खाण्याची व्यवस्था का करू नये? त्यामुळे त्याला सुचला डोसा. काही दिवसांतच त्याची टपरी चहापेक्षाही जास्त डोशांसाठी प्रसिद्ध झाली. चविष्ट खाण्यासाठी लोक मोठ्या गाड्यांतून येत. इतर टपऱ्यांपेक्षा जास्त प्रेम गणपती स्वच्छतेची विशेष काळजी घेत असे.

भांडी घासणारा आता महिन्याला एक-दीड लाख कमावत होता. मुंबईत टपरी चालली तर फार मोठी गोष्ट नाही. आता तर चांगलं आहे ना? पण, त्यांचा विचार वेगळाच होता. एकेदिवशी टपरीजवळ मॅकडोनाल्ड्स उघडले. प्रेम गणपतीच्या मनात आले- इथे श्री. मॅकडोनाल्ड्स नाहीत, मग त्यांच्या नावावर हे सगळं कसं चालतं? मीही असं काही का करू नये? डोके व मन लावून आणि मदत मागून प्रेम गणपतीने आपला व्यवसाय प्रचंड वाढवला. आज त्यांची देशभरात डोसा-प्लाझा नावाने पंचवीस ते तीस फ्रँचायझी दुकाने आहेत. आणि काही परदेशातही. पण, ही कथा मी तुम्हाला व्यवसायाच्या धड्यासाठी नाही, तर इतर काही उद्देशाने सांगत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांनी म्हटले आहे की, तुम्ही ज्याची कल्पना करू शकता आणि विश्वास ठेवू शकता ते खरे ठरते. प्रेम गणपतीकडे ना शिक्षण होते ना पैसा होता, पण मॅकडोनाल्डसारखे बनण्याचे स्वप्न त्याच्या मनात आले तेव्हा त्याने स्वतःला धिक्कारले नाही की, अरे, हा निष्फळ विचार सोड. आरशात चेहरा पाहिला का? मर्यादेत राहा. अशाच क्रूर शब्दांनी आपण रोज आपल्या स्वप्नांचा चुराडा करतो. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीत स्वत:लाच जास्त दोष देतो. हा आतला आवाज आपल्याला रडवतो, आसूड चालवतो. आपल्याला गरज आहे प्रेमाची, सहानुभूतीची. आपण ते इतरांना देतो, स्वतःला नाही. दोन आठवड्यांपूर्वी मी तुला सांगितले होते, दररोज आरशासमोर उभे राहून डोळ्यांत पाहा, स्वत:ला सांगा, मी स्वतःवर प्रेम करतो, मी स्वत:ला स्वीकारतो. मला माहीत आहे की, असे केल्यावर आतून एक माकड ओरडले असणार. त्याने तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्नही केला असेल, परंतु हार मानू नका. पुढील दोन आठवड्यांसाठी प्रयोग : मनगटावर रबर बँड बांधा. मनात माकडाचा आवाज आला की पिंग जाणवण्यासाठी रबर बँड ओढा. त्याच वेळी माकडाला सांगा - चल, निघ इधून. मी आता तुझे ऐकत नाही. दिवसातून किती वेळा पिंग करावे लागले ते नोंदवा. हळूहळू त्याची वारंवारता कमी होईल. तुमच्या आत अजूनही एक मूल आहे, जे साधे-सरळ आहे. त्याचे अश्रू पुसा, त्याला मिठी मारा. त्याला आपला मित्र बनवा. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in

बातम्या आणखी आहेत...