आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:समाज काय म्हणेल?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्ली मला काही कळेनासं झालंय. जिकडे जाईल तिकडे आणि कोणी बघेल तो केवळ हेच म्हणतो ‘समाज काय म्हणेल?’ काही काम हाती घेतलं की चार माणसांमधील दोन माणसं तर आवर्जून आणि सहजतेने सांगतात की,जे करायचे ते लक्षपूर्वक आणि विचारपूर्वक कर. नंतर काही झालं तर,‘लोकं काय म्हणतील?’

समाजशास्त्रात ‘माणूस समाजाशिवाय राहू शकत नाही आणि समाजाशिवाय तो अपूर्ण आहे’ अशी व्याख्या केली जाते. पण, आपण कधी कधी समाजात पाण्याच्या प्रवाहासारखे इतके वाहून जातो की, आपले वैयक्तिक जीवन हे विसरून जातो. आयुष्यातल्या लहानशा निर्णयापासून ते मोठ्या निर्णयापर्यंत केवळ हाच विचार डोक्यात फिरतो की, लोक काय म्हणतील? दैनंदिन जीवनात अशी खूप उदाहरणं आहेत. आता परवाचीच गोष्ट माझ्या मैत्रिणीचे लग्न होऊन साधारण दोन-तीन वर्षे झाली आहेत. तिला एक वर्षाचं लहान मुलंही आहे. ती माझ्या अगदी जवळची मैत्रीण म्हणून, ती मला कोणतीही गोष्ट न हिचकता सांगते. मग ती तिच्याबद्दल बोलत होती, लग्नाच्या सुरुवातीचे दिवस अगदी सुखात गेले आणि आज मात्र...एवढं बोलून थांबली आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आले. मग दीर्घ श्वास घेत तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली,‘सासुबाईंचे टोमणे, नवऱ्याने बसता-उठता केलेला अपमान, लहान लहान गोष्टीवरुन भांडणं, मारणं ‘, यामुळे ती खूप खचून गेली. हे ऐकल्यावर मला तिच्याबद्दल वाईटही वाटलं आणि तिच्यावर दयाही आली. या बोलण्यावर मी काही वेळानंतर तिला विचारलं ‘तुझ्या मनात काय आहे?’ त्यावर ती म्हणाली, “माझ्याकडून आता हे काही सहन होणार नाही.’ असे बोलल्यानंतर मी लगेच विचारलं ‘तुझ्या आई-वडिलांना हे माहीत आहे का आणि त्यावर ते काय बोलले ?’ तिने क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, “लग्नानंतर सासर हेच मुलीचे घर असतं. हे बघ पोरी अशा लहानशा कारणावरुन लगेच मुलीने माहेरी येऊन राहणं चांगलं नाही. आता कुठे दोन वर्षे झाली लग्नाला, हे जेव्हा लोकांना कळेल तर तेव्हा चार लोक काय बोलतील?’ यावर माझ्या मनात एकच विचार आला की, आपल्या मुलीच्या आयुष्यापेक्षा समाजच मोठा?

कधी कधी वैयक्तिक प्रश्न देखील जेव्हा समाजाचा प्रश्न बनतो. हे बघून मनाला कुठेतरी खंत वाटते. मला असे म्हणायचे नाही की, आपण समाजाचा विचारच करू नये. विचार करावा, पण त्यालाही काही मर्यादा असावी. प्रत्येक गोष्टीमध्ये जर लोकांचा विचार करत राहू तर आपण आपले जीवन जगायचे विसरून जाऊ आणि वृद्धावस्थेत हा प्रश्न नक्की पडेल की, आयुष्यात आपण काय जगलो? आणि किती जगलो ? मग तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी वेळ पुन्हा येणार नाही. कारण वेळ जगातील ही अशी गोष्ट आहे की एकदा गमावली की नंतर कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ती परत येत नाही. त्यामुळे जगताना एकच विचार मनात ठेवायचा मला जे योग्य वाटते, मला ज्या गोष्टीत आनंद मिळतो मी तेच करणार मग कोणीही, कितीही, काहीही बोलू दे. कारण ज्या गोष्टीत आनंदच नाही ती पूर्ण करण्यात काही अर्थच नाही.

वैशाली बिरूणगी

बातम्या आणखी आहेत...