आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवताल:चाकोरी मोडायला हरकत काय..?

कामिल पारखे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना तशी काही वर्षांपासूनच नामशेष होत चालली आहे. मात्र, माझ्या कुटुंबासाठी आजही एक फॅमिली डॉक्टर आहेत. आमची काही महिन्यांची मुलगी- अदिती काही केल्या रडायची थांबेना, तेव्हा आम्ही पहिल्यांदा घराशेजारी असलेल्या एका डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी बाळाला हातात घेतले आणि एका पायातले चांदीचे वाळे रुतते आहे म्हणून ती रडते आहे, असे म्हणत ते वाळे सैल केले. त्यानंतर लगेच अदिती रडायची थांबली. तेव्हापासून ते आमचे ‘फॅमिली डॉक्टर’ झाले ते आजतागायत. काहीही दुखणेखुपणे झाले, की आम्ही या डॉक्टरांकडे जातो आणि औषधे लिहून झाल्यावर मग आम्ही आमच्या घरातल्या सुखदुःखाच्या गोष्टी डॉक्टरांना सांगतो. बाहेर कितीही पेशंट असले, तरी डॉक्टर आमच्याशी आवर्जून बोलतात.

मागे डॉक्टर स्वतः एका जीवघेण्या वाहन अपघातातून वाचले, तेव्हा तेच पेशंट बनल्याने आम्हीच त्यांना भेटायला जात असू. मागच्या दिवाळीला डॉक्टरांना नव्या कपड्याचा जोड द्यायचा, असं आम्ही नवरा-बायकोनं ठरवलं. डॉक्टरांना त्यांचे अंगाचे माप विचारले, तर ते म्हणाले, ‘मी रेडिमेड कपडे कधीच वापरत नाही, नेहमी शिवूनच घेतो.’ आम्ही आग्रह करत म्हणालो, ‘या वेळी फक्त रेडिमेड कपड्यांचे दोन जोड वापरा, नाही आवडले तर पुन्हा शिवून घेतलेल्या कपड्यांकडे वळा पाहिजे तर. पण, एकदा रेडिमेड कपडे ट्राय तर करा..’ पण, डॉक्टरसाहेब आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि माझा नाइलाज झाला.

वास्तविक डॉक्टरांना हे समजावून सांगण्यामागं माझा स्वतःचा या बाबतीतला अनुभव होता. अनेक वर्षे मी नेहमीच्या टेलरकडून कपडे शिवून घेत असे. कधीतरी बायकोच्या हट्टावरून रेडिमेड कपडे घेतले. त्यांची फिटिंग, किंमत वगैरे पाहता मी आता कधीही शिवलेले कपडे वापरत नाही. तीच गोष्ट टी-शर्टबाबत. गोव्यात अगदी कॉलेज जीवनातही नेहरू शर्ट वापरणारा मी गेली अनेक वर्षे आरामदायक, सोयीस्कर आणि नव्या जीवनशैलीशी साजेसे म्हणून टी-शर्टचा फॅन बनलो आहे. ब्रँडेड कपडे आणि बूट वापरण्याचे फायदेही मला आता कळले आहेत. या सर्व बदलांचे मुख्य कारण म्हणजे, कुठल्या तरी एका टप्प्यावर मी माझ्या आवडीनिवडी आणि सवयींमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली होती.

आमच्या घरी घरकामासाठी मदतनीस म्हणून गेली अनेक वर्षे येणाऱ्या लताबाईंचे उदाहरण मला आजही हसू आणते. आधीच्या तीन मजली इमारतीतल्या वन बेडरूम फ्लॅटमधून आम्ही शेजारच्याच पाच मजली इमारतीत टू- बेडरूम फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो, तेव्हाची ही गोष्ट. इथे लिफ्टची सोय असूनही लताबाई जिना चढून यायच्या आणि मग पाच मिनिटं घरात धापा टाकत बसायच्या. ‘मी नाय बया लिप्टमधून येनार, भ्या वाटतंय..’ असं त्या म्हणायच्या. दोन-तीन वेळा मी त्यांना बळजबरीने लिफ्टमधून वर आणले आणि खाली पोहोचवले, तेव्हा त्या लिफ्टच्या एक कोपऱ्यात घाबरून, डोक्याला हात लावून, डोळे बंद करून बसायच्या. एक आठवडाभर असं चाललं असेल. आता परिस्थिती बदलली आहे. लताबाई नेहमीच लिफ्ट वापरतात, खालच्या मजल्यावर जाताना शक्यतो लोकांनी पाच मजले खाली चालत जावे, अशी अपेक्षा असते. लताबाई खाली जायचं असल्यास तळमजल्यावरून पाचव्या मजल्यावर लिफ्ट वर बोलावतात आणि नंतरच लिफ्टने खाली जातात. एखाद्या वेळेस वीज नसेल, तर पाचव्या मजल्यावर चढून येण्यास कुरकुर करतात. आहे की नाही माणसाच्या स्वभावाची गंमत?

गोव्याला मी नियमितपणे जातो. गेली कित्येक वर्षे एकाच खासगी कंपनीच्या वातानुकूलित बसने आम्ही प्रवास करत असायचो. पणजीला सकाळी पोहोचेपर्यंत माझे एकूण एक सांधे दुखायला लागायचे, रात्रभर झोप तर नसायचीच. दोन-तीन वर्षांपूर्वी कसे कुणास ठाऊक, स्लीपर कोचने प्रवास केला आणि त्या आरामदायक प्रवासाचा अनुभव घेतल्यावर पूर्वीच या सुविधेचा लाभ का नाही घेतला, याचं माझं मलाच आश्चर्य वाटलं.

आपल्यापेक्षा अनुभवानं, शिक्षणानं आणि वयानं कितीतरी मोठे असलेल्या लोकांना असा लहान तोंडी मोठा घास घेऊन शहाणपणा सुनावण्याचं धाडस मी अनेकदा केलं आहे, करत असतो. माझ्या शेजारी राहणाऱ्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याबाबत असंच झालं. मोठ्या तीन बेडरूम फ्लॅटमध्ये राहणारे हे माझे मित्र काही वर्षांपूर्वी सांगत होते, की त्यांच्या घरी येणाऱ्या नातवंडांना तिथं फार करमत नाही. कारण त्यांच्या घरात एअर कंडिशनर नाही आणि या आजोबांना तर ‘एसी’ची मुळीच सवय नाही. मी त्यांना म्हटले, ‘निदान एका रूममध्ये तरी एसी बसवा.’ हो - ना करत एकदाचा त्यांनी एसी बसवला. अलीकडंच मला कळलं, की त्यांनी इतर रूममध्येही एसी बसवले आहेत आणि ऑक्टोबरमध्ये आणि उन्हाळ्याच्या दोन-तीन महिन्यांत आता उकाड्याची त्यांची कसलीही तक्रार नसते. आणि ही घटना माझ्याबाबतीत घडलेली... मोबाइलचा जमाना सुरू झाला, तरी मीडियात काम करीत असूनही मी मोबाइल घ्यायला तयार नव्हतो. माझ्या घरी लँडलाइन फोन आहे आणि कार्यालयात माझ्या टेबलावर फोन आहे. घरून कार्यालयात येण्यासाठी पाऊण-एक तासाचा प्रवास होतो, त्या काळात माझ्याशी संपर्क नाही झाला तर काय आभाळ कोसळणार आहे, असा माझा प्रश्न असायचा. अखेरीस २००८ मध्ये मी मोठ्या अनिच्छेनंच मोबाइल घेतला आणि मग स्वतःचा बावळटपणा लक्षात आला. आजकाल या मोबाइलवाचून जगणं आणि चरितार्थ चालवणं शक्य तरी आहे का, असं वाटतं.

कामावर जाताना, घरी येताना दुचाकीऐवजी मी नेहमी सिटी बसचा वापर करायचो. काही वर्षांपूर्वी घरी कार विकत घेण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा ती मी साफ उडवून लावली होती. त्यानंतर पाच-सहा वर्षांनी मी कार घेतली, तेव्हा माझी चाळिशीकडे वाटचाल सुरू होती. साहजिकच कार चालवायला शिकणं खूप अवघड गेलं. आता शहरात रोज कार चालवल्याशिवाय मला चैन पडत नाही. पण, कार चालवत दूरच्या प्रवासावर निघण्याइतका पुरेसा आत्मविश्वास नाही. त्या मानाने कॉलेजात जाणारी माझी मुलगी खूप लवकर आणि अधिक सफाईदारपणे गाडी चालवायला शिकली. आता वाटतं, कार विकत घ्यायला मी खूप उशीर केला. माझ्या वयाचेच इतर काही जण मात्र आजही कार चालवू शकत नाही, हे पाहिले की आपण उशीर केला तरी एकदमच टाळले नाही, हे बरंच केलं असं वाटतं.

रविवारच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांसाठी चर्चमध्ये धर्मगुरू जे प्रवचन देतात ते ‘संडे सर्मन’ म्हणून ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी या ‘संडे सर्मन’ची वेगळीच आवृत्ती मी अनुभवली. कॅथलिक चर्चच्या ज्येष्ठ धर्माचार्यांना म्हणजे बिशप आणि कार्डिनल यांना अनुक्रमे वयाच्या ७५ आणि ८० व्या वर्षी निवृत्त व्हावं लागतं. माझ्या ओळखीतल्या एका निवृत्त बिशपांनी ऐंशीव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना फेसबुकवर आपली रविवारची प्रवचने पोस्ट करायला सुरुवात केली होती. आध्यात्मिक सेवाकार्यातून निवृत्ती अशी त्यांना मुळी मान्यच नव्हती. त्या वेळी समाजमाध्यमांचा जमाना नव्यानेच सुरू झाला होता. उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि रंजक प्रवचनाचा त्यांचे विविध शहरांत असलेले फेसबुक मित्र लाभ घेत होते आणि तत्क्षणी प्रतिसादही देत होते. नावीन्याची ओढ असली, तर काय करता येतं, याचं हे उत्तम उदाहरण होतं.

सध्याचा काळा मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचा आहे. या युगात नेहमीची चाकोरीबद्ध जीवनशैली, सवयी किंवा विचार सोडून नवी वाट तुडवावी लागते, तेव्हा कुठे यश आणि काहीतरी नावीन्यपूर्ण केल्याचा आनंद मिळतो. यालाच रूढार्थानं ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ म्हटलं जातं. साचेबद्ध आणि कंटाळवाणे जगणं टाळायचं असेल, तर असा चाकोरीबाहेरचा नवा विचार आणि कृती करायला हवी. प्रयत्न तर करून बघा.. मग मी काय म्हणतोय, ते तुम्हालाही पटेल!

बातम्या आणखी आहेत...