आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ दिल ने कहा:जेव्हा एनसीसीची बेस्ट कॅडेट बनली स्टार अभिनेत्री!

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये या हुशार मुलीची प्रतिभा सर्वांच्या नजरेत भरली होती. त्यामुळे प्रशिक्षणाच्या शेवटी इन्स्टिट्यूटचे संचालक जगत मुरारी यांनी तिच्याबाबत प्रसिद्ध दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना माहिती दिली. ते आपल्या नवीन चित्रपटासाठी एका नवीन उत्तम अभिनेत्रीचा शोध घेत होते. आपला पहिला चित्रपट येताच या मुलीने अंगभूत अभिनयगुणाने सर्वांची मने जिंकली.

आ जची कथा एका अशा मुलीची आहे, जी भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची हुशार विद्यार्थिनी होती आणि ती अभ्यासासोबत एनसीसीतही सहभागी होती. ती प्रत्येक काम मनापासून आणि मेहनतीने करायची आणि त्यामुळेच तिची देशातील सर्वोत्तम एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाली होती. १९६६ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या मुलीला सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर ही मुलगी तिच्या शाळेतील सर्वांची आवडती विद्यार्थिनी झाली. या मुलीचे वडील पत्रकार होते. ते इंग्रजी वर्तमानपत्रासाठी लिहायचे. एकदा त्यांना सत्यजित रे यांच्या मुलाखतीसाठी कलकत्त्याला (आताचे कोलकाता) जावे लागले. तेव्हा ते आपल्या या हुशार आणि प्रतिभावान मुलीला सोबत घेऊन गेले. त्यांनी आपल्या मुलीची सत्यजित रे यांच्याशी ओळख करून दिली. मुलीनेही त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. मुलाखत संपली. दुपारचे जेवण केले आणि कलकत्ता फिरून वडील आणि मुलगी भोपाळला परतले. काही दिवसांनंतर त्यांना सत्यजित रे यांचा एक टेलिग्राम आला. त्यातून त्यांना कळले की, सत्यजित रेे हे एका नवीन चित्रपटावर काम करत आहेत आणि त्यातील एका भूमिकेसाठी या पत्रकार महोदयांच्या हुशार मुलीला घेण्याची त्यांची इच्छा आहे. वडिलांनी मुलीला सत्यजित रे यांच्या टेलिग्रामचा सारांश सांगितला. मुलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की, तिच्या शाळेतील लोक काय विचार करतील? सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट झाल्यानंतर सिनेमात काम करतेय? मनात असंख्य विचार सुरू होते. तिची ती अवस्था वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी तिला मनातील शंका-कुशंका काढून सत्यजित रे यांच्या चित्रपटात काम करण्याबाबत समजावून सांगितले. त्यानंतर वडिलांची आज्ञा पाळत वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तिने सत्यजित रे दिग्दर्शित ‘महानगर’ या बांगला चित्रपटात काम केले. ही भूमिका तिने अतिशय उत्तमपणे साकारली. आपण अभिनयातच करिअर करायचे आणि या क्षेत्रातच आपले भविष्यही घडवायचे, हे तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच ठरवले होते. तिने जेव्हा सत्यजित रे यांना, “कोणत्या अॅक्टिंग स्कूलमध्ये जावे?’ असे विचारले तेव्हा ते म्हणाले, “मला नाही वाटत की तुला अभिनयाचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.’ एखाद्या महान दिग्दर्शकाकडून अगदी सुरुवातीच्याच काळात अशी स्तुती ऐकून कोणाचेही मन मोहरले असते. पण, या मुलीला माहीत होते की लक्ष्य खूप दूर आहे, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि एका निश्चयानेच तिने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. तिथे तिची निवडही झाली. जे काही शिकता येईल, ते मोठ्या मेहनतीने ती तिथे शिकली. फिल्म इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षणादरम्यान, निर्माता दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी या मुलीला आपल्या एका चित्रपटात नायिकेच्या भूमिकेची ऑफर दिली. मात्र, संस्थेच्या नियमानुसार तिला बाहेर काम करता येणार नव्हते. त्यामुळे तिला ही सुवर्णसंधी नाकारावी लागली. पण, या मुलीची प्रतिभा संस्थेतील सर्वांच्या नजरेत भरली होती. त्यामुळे प्रशिक्षणाच्या शेवटी फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक जगत मुरारी यांनी या हुशार मुलीबाबत प्रसिद्ध दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना माहिती दिली. त्या काळात ते आपल्या नवीन चित्रपटासाठी एका नवीन उत्तम अभिनेत्रीचा शोध घेत होते. आपला पहिला चित्रपट येताच या मुलीने अंगभूत अभिनयगुणाने सर्वांची मने जिंकली आणि नंतर एका पाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देऊन कालची सर्वोत्तम एनसीसी कॅडेट स्टार अभिनेत्री झाली. ९ एप्रिल १९४८ रोजी जन्मलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे जया बच्चन. आज त्यांचा वाढदिवस आहे. जया बच्चन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो! मी आपल्याला १९९२-९३ मध्ये भेटलो होतो. त्यानंतर आपण मला सदैव आशीर्वाद दिले आणि माझ्यावर प्रेम केले, माझ्या प्रतिभेचे नेहमीच कौतुक केले. १९९३ मध्ये, जेव्हा मी तुम्हाला एक कथा सांगितली, तेव्हा तुम्ही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्या कथेवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करण्याचे वचन दिले. तुम्ही तेव्हा चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अध्यक्षा होता. तुम्ही मला चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक बनवलं. हा चित्रपट होता “अभय’, जो महान लेखक ऑस्कर वाइल्डच्या ‘The Canterville Ghost’ या कथेवर आधारित होता आणि या चित्रपटासाठी मला माझ्या आयुष्यातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मला १ फेब्रुवारी १९९५ चा तो दिवस चांगला आठवतो, जेव्हा या चित्रपटाचा प्रीमियर सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्ही श्रीमती सोनिया गांधी यांना खास आमंत्रित केले होते. चित्रपट सुरू झाल्यानंतर सुमारे १०-१५ मिनिटांनंतर तुम्ही चित्रपट थांबवला आणि मला सांगितले की, श्रीमती सोनिया गांधी तुमच्याजवळ बसून चित्रपट पाहू इच्छितात, जेणेकरून तुम्ही हिंदी संवादांचे इंग्रजीत भाषांतर करून त्यांना सांगावे. मी त्यांना हिंदीतील “करुणा’ या शब्दाविषयी येशू ख्रिस्ताचा संदर्भ देऊन समजावून सांगितले. त्या खूप आनंदी दिसत होत्या. कदाचित त्यांनी तुम्हाला हे नंतर सांगितले असेल! तुमचा सदैव ऋणी असेन. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा! प्रिय वाचकहो, मी तुम्हा सर्वांना यापूर्वी सांगितले आहे की, “कुछ दिल ने कहा’ या सदरात इतरांना आणि मलाही आलेले अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. तर आज माझा स्वत:चा अनुभव सांगण्याचा दिवस होता. हा सत्य अनुभव मी आपल्याशी शेअर केला. नमस्कार! जय हिंद! वंदे मातरम! अन्नू कपूर सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक