आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • When Will Mom Retire (from The Kitchen)? Article By Ravindra Rukmini Pandharinath

‘परग्रहा’वरून पत्र:आई (स्वयंपाकघरातून) रिटायर कधी होणार?

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, ‘आई रिटायर होते’ ह्या गाजलेल्या नाटकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ‘आई ही अखेर आई असते, ती जन्मभर आपले काम करीत राहते. तिला ना आराम, ना विश्रांती. तिने आपलं काम बिनातक्रार आयुष्यभर करीत राहणं ह्यातच तिच्या आयुष्याचं सार्थक आहे,’ असं आपण मानतो. हे नाटक म्हणजे त्या समजाला धक्का देण्याचा एक प्रयत्न होता. ह्यातील आई ‘मी आता आईपणाच्या ड्यूटीतून रिटायर होणार’ असं जाहीर करते. ह्या नाटकाची आठवण आज आली, ह्याला कारण मागच्या पत्रातून सुरू झालेली चर्चा. परंपरेने चालत आलेलं सासू-सुनेच्या नात्याचं दुष्टचक्र थांबवायचं असेल, तर काय करावं लागेल, ह्या प्रश्नाच्या अनेक उत्तरांपैकी एक आहे, सासूबाईंनी क्रमाक्रमाने स्वयंपाकघरातून रिटायर होणं. कारण स्वयंपाकघरात केवळ अन्न शिजत नाही; घरगुती राजकारणातील डावपेचही तिथेच शिजतात. बायकी राजकारणाचं सत्ताकेंद्र म्हणजे स्वयंपाकघर. त्यामुळे बायकीपणाकडून मानवीपणाकडे वाटचाल करायची असेल तर ह्या केंद्राचं विकेंद्रीकरण करावंच लागेल.

खरं पाहिलं तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, बारा महिने चोवीस तास स्वयंपाकघराला बांधून घेणं ही अजिबात आनंददायी गोष्ट नाही. ‘माझी आई म्हणजे सुगरण’, ह्याचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व मुलग्यांनी आपल्या आईप्रमाणेच सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत घरातल्या सर्वांसाठी रांधा-वाढा-उष्टी काढा-भाज्या आणा-निवडा-चिरा-विरजण लावा इ. खटाटोप, फार नाही, पंधरा दिवस करून पाहावा. म्हणजे सुगरणपणाची पदवी मिळवण्यासाठी तिला कशाकशाची किंमत द्यावी लागली असेल हे त्यांना नक्की कळेल. उत्तम स्वयंपाक करणं, आपल्या आवडीच्या माणसांना प्रेमाने खाऊ घालणं ह्यात नक्की आनंद आहे. पण सातत्याने, उसंत न घेता तेच काम वर्षानुवर्षं करीत राहणं ही अतिशय बोअरिंग बाब आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही, शरीर-मनाची सारी ऊर्जा संपून जाते. तरीही, बायका स्वयंपाकघराची सूत्रं सोडण्यास नाखुश असतात. ह्याचं कारण असं केल्यास घरावरील आपली उरलीसुरली सत्ता संपुष्टात येईल अशी त्यांना भीती वाटते, हे आहे.

मागच्या पिढीतील स्त्रियांना घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करायचा होता, पण त्याच वेळी घरकामाकडे दुर्लक्ष करूनही त्यांना चालणार नव्हते. त्यासाठी त्यांनी ह्या दोन्ही घोड्यांवर एकाच वेळी स्वार होण्याचं ठरवलं. त्यांना सुपरवुमन होण्याच्या वेडाने झपाटलं. करिअर व संसार ह्यांचा सुवर्णमध्य साधताना स्त्रियांनी दोन्ही आघाड्यांवर स्वतःची भरपूर दमणूक करून घेतली. कारण तंत्रज्ञान आणि घरकामाची बाई ह्या दोहोंच्या मदतीमुळे आपण सहज हे पार पाडू असं त्यांना वाटत होतं. पण ते तेवढं सोपं नव्हतं. ह्यांच्यामुळे त्यांचे श्रम काही प्रमाणात कमी झाले हे खरं. पण दुसरीकडे सुगरण किंवा सुपरवुमन ह्या शब्दांची व्याप्तीही वाढत गेली. एकुणातच आपण कितीही जोराने धावलो, तरी शर्यतीची फिनिशिंग लाइन पुढेपुढेच जात आहे व तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही, ह्याचं भान ह्या सुपरवुमनना आलं, पण तोवर बराच उशीर झाला होता. ह्याचा अर्थ गृहिणीला स्वयंपाकघरातून ग्रेसफुली रिटायर होता येणार नाही, असा नाही. पण त्यासाठी जरा वेगळा विचार करावा लागेल.

मध्यंतरी आम्ही दाऊदी बोहरा समाजाच्या एका उपक्रमाविषयी वाचलं. विविध गावां-शहरांत विखुरलेला हा छोटेखानी, व्यापारी समाज. अनेक ठिकाणी हा समाज सामूहिक स्वयंपाकघर चालवतो. आपल्या समाजातील स्त्रियांचा वेळ व ऊर्जा रांधा-वाढा-उष्टी काढा ह्यात जाऊ नये, वृद्ध व एकाकी व्यक्तींचा प्रश्न सुटावा व समाजातील सर्वांना पोषणयुक्त स्वच्छ आहार नियमितपणे मिळावा ह्या उद्देशाने हा उपक्रम चालवला जातो. त्याअंतर्गत दोन्ही वेळेचा स्वयंपाक मोठ्या मुदपाकखान्यात करून घरोघरी पोहोचवला जातो. हे सर्व काम फक्त पुरुषच करतात. आजच्या काळात अशा उपक्रमाचं मोल खूपच आहे. एखादी गृहनिर्माण संस्था, एकाच शहरात राहणारे स्नेही किंवा नातेवाईक ह्यांनी ठिकठिकाणी असे छोटेखानी प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? कुणी वृद्ध किंवा तरुण एकटे राहतात. कुणाकडे वृद्ध माणसं व लहान मुलं असल्यामुळे गृहिणीला अजिबात फुरसत मिळत नाही. कुणा तरुण जोडप्यांना स्वयंपाक करायला आवडत/जमत नाही. अशा सर्वांसाठी असे सामायिक स्वयंपाकघर अतिशय उपयुक्त ठरू शकते. मात्र त्यासाठी सर्व संबंधितांना ह्या प्रयोगात सहभागी व्हावं लागेल. सर्वांच्या चवी, आवडीनिवडी, पोषणमूल्य, आरोग्य, स्वच्छता ह्यांचा मेळ घालावा लागेल. नियोजन व अन्न निर्मिती ह्यांची जबाबदारी एखाद्या कुशल व्यक्तीकडे दिली, तर आपल्या मदतनीसाकडून ती स्वयंपाक करून घेईल. सामान आणणे, डबे आणणे-पोहोचवणे ही कामं एखादा तरुण मुलगा करू शकेल. गोडधोड, रविवारचा खास मेनू, चटण्या-कोशिंबिरी अशा गोष्टी वेगवेगळी माणसं आळीपाळीने करू शकतील. प्रश्न आहे ह्या दिशेने सुरुवात करण्याचा. माझ्या बहीण-मेव्हण्यांनी त्यांची मुलं लहान असताना असाच एक प्रयोग केला होता. रविवारचा निदान एक वेळेचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी घेण्यास त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उद्युक्त केलं होतं. दहावीतला दादा आणि त्याची पाचवीतली जुळी भावंडं (भाऊ-बहीण) मिळून शनिवारी बसून रविवारच्या नाष्टा-जेवणाचं नियोजन करीत. त्यासाठी लागणारं सामान दुकानातून आणून ठेवत. तेव्हा इंटरनेट नव्हतं. त्यामुळे आई-बाबांना रेसिपी विचारत, पुस्तकं पाहत स्वयंपाक करण्यात येई. कधी नाष्टा बनायला दुपार उजाडे, तर कधी भात किंवा भाजी करपून जाई. पण कुणीही कुणाला नावं ठेवत नसे. आपण मिळून सर्वांसाठी छान काहीतरी बनवत आहोत, त्यातून नवं काही शिकत आहोत ह्याचा आनंद मुलांना मिळत असे. मुलांना व्यवहारज्ञान व सामूहिकतेचे महत्त्व शिकवण्याचा आनंद आई-बाबांना मिळत असे. ह्या प्रयोगातून शिकलेला समता व आत्मनिर्भरतेचा धडा मुलांना आयुष्यभर उपयोगी पडला, हे वेगळं सांगायला नकोच. आईने स्वयंपाकघरातून रिटायर व्हावं ह्याचा अर्थ तिथे आता सुनेचं राज्य प्रस्थापित व्हावं (व त्याचबरोबर ती ह्या रांधा-वाढा..च्या चक्राला जुंपली जावी), असा होत नाही. रांधण्यासोबत मन सांधण्याचं कामही करायचं असेल, तर स्त्री-पुरुष, आबालवृद्ध सर्वांनी ह्या सोहळ्यात सामील व्हायला हवं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा स्वयंपाकात रुची घेणारा मित्र,

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...