आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:टेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात का करत आहेत?

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा (फेसबुक), अॅमेझॉन, ट्विटर यांमध्ये काय साम्य आहे? जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या असण्याव्यतिरिक्त या सर्वांनी अलीकडेच मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे केवळ त्यांच्याबद्दलच नाही, तर संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रातील लाखो लोकांनी अलीकडे नोकऱ्या गमावल्या आहेत. या जगातील सर्वोत्तम नोकऱ्या होत्या. वारंवार केल्या जाणाऱ्या ‘कामासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाणे’ या सर्वेक्षणात त्यांचे नाव आघाडीवर असायचे. या कंपन्या प्रगतीचे आश्वासन देत असत, यांची मोठी कार्यालये असत, मोफत जेवण दिले जाई, गलेलठ्ठ पगार आणि शेअरचे पर्यायही देत असत. यासोबतच त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम, वर्क फ्राॅम बीच, भरमसाट सुट्या, विदेशी ठिकाणांहून ऑफसाइट काम करणे आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना कार्यालयात आणण्याचीही सुविधा देत असत. पण, काही महिन्यांत सर्वकाही बदलले. कंपनीत अनेक दशकांपासून काम करणारे कर्मचारी असोत किंवा अलीकडील कॅम्पस-नियुक्त असोत - त्यापैकी अनेकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. मीडिया रिपोर्ट््सनुसार, डंझो, शेअरचॅट, रिबेल फूड्स, कॅप्टन फ्रेश, भारत अॅग्री, ओला, देहाट, स्किट.एआय, काॅइन डीसीएक्स, लेड स्कूल, बाउन्स, कॅशफ्री, स्विगीसारख्या भारतीय कंपन्यांनीही अलीकडे अनेकांना कामावरून काढले. येत्या काही दिवसांत आणखी कपात होणार आहे. मुक्त-बाजारपेठ अर्थव्यवस्थेत आपले स्वागत आहे. आपण अनेकदा आर्थिक उदारीकरणाच्या फायद्यांबद्दल बोलतो आणि खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देतो, परंतु आपण त्याच्या काळ्या बाजूकडे दुर्लक्ष करतो. आणि ते म्हणजे खासगी क्षेत्र क्रूर व भावनाशून्य आहे. ते नफा आणि वाढीच्या तत्त्वज्ञानावर चालते. त्याचा उद्देश भागधारकांना परतावा देणे हा आहे. सर्व काही चांगले चालले असेल तर या खासगी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेतात, असे दिसते, परंतु परिस्थिती प्रतिकूल होते व कंपनीच्या कार्यक्षमतेवर दबाव येतो तेव्हा त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जे काही करावे लागेल त्या करतील. यात तुम्हाला काढून टाकणे समाविष्ट आहे. वाईट वाटल्यास क्षमस्व. तंत्रज्ञान क्षेत्र सहसा भरभराटीला येते, परंतु दोन मुख्य कारणांमुळे आज ते घसरत आहे. एक, कोविडने आणलेल्या तंत्रज्ञानाची भरभराट लोकांच्या अपेक्षेपेक्षा कमी दीर्घायुषी असल्याचे सिद्ध झाले. या काळात टेक-कंपन्यांनी जास्त लोकांना कामावर घेतले होते, त्यांना असे वाटले की जग कायम ऑनलाइन वितरण आणि आभासी बैठकांवर अवलंबून राहील. ते चुकीचे सिद्ध झाले. दुसरे कारण म्हणजे स्टार्टअप क्षेत्रातील तेजीही आता संपली आहे. तेजीच्या काळात कंपन्यांनी सर्व खर्चात वाढ करण्यावर भर दिला होता. पण, आज भावना बदलल्या आहेत. व्याजदर जास्त आहेत आणि गुंतवणूक करणारे लोक आता या कंपन्यांकडून नफ्याची मागणी करत आहेत. अशा स्थितीत खर्चात कपात करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना काढून टाकणे. यामुळेच सरकारी नोकरीचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे, कारण ती सुरक्षित मानली जाते. आज कोट्यवधी भारतीय सरकारी नोकऱ्यांच्या शोधात आहेत. मग आपण काय करावे? खासगी क्षेत्रात भावनांना स्थान नाही आणि तेथून तुम्हाला कधीही बाजूला केले जाऊ शकते का? काही प्रमाणात होय. कारण खासगी क्षेत्रातील कंपन्यांची पहिली जबाबदारी त्यांच्या भागधारकांप्रती असते. खरे तर ले-ऑफ सुरू झाल्यापासून मोठ्या टेक-कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे भागधारकांची मोठी कमाई झाली आहे. परंतु, खासगी क्षेत्राची चांगली गोष्ट म्हणजे ते कर्मचाऱ्यांना दीर्घ मुदतीत चांगले पगार देते. जे कर्मचारी कामावरून काढले ते अजूनही सरकारी नोकऱ्यांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत. ज्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांनाही नवीन नोकऱ्यांच्या संधी आहेत, ते संयमाने आणि इतर ठिकाणी अर्ज करत असतील तर. खासगी क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी हे करता येईल : १. चांगला पगार मिळतो, पण नोकरी सुरक्षित नाही, म्हणून बचत करा. समजा तुम्हाला फक्त अर्धा पगार मिळतोय, बाकीचे वाचवा. तुमच्याकडे इतकी बचत (नेस्ट-एग) असणे आवश्यक आहे की नोकरी गमावल्यास नवीन नोकरी मिळेपर्यंत तुम्ही एक ते दोन वर्षे जगू शकाल. २. कोणतेही एक क्षेत्र सर्वोत्तम आहे असे समजू नका. अशी कोणतीही कंपनी नाही, जी नेहमीच फायदेशीर राहण्याची हमी असते. टेक-कंपन्या खूप हॉट समजल्या जायच्या ही फार जुनी गोष्ट नाही, पण आज तसे नाही. वित्त आणि रिअल इस्टेट क्षेत्रदेखील चांगल्या आणि वाईट काळातून गेले आहे. गरज भासल्यास क्षेत्र बदलण्यात काहीही नुकसान नाही. नोकरीच्या शोधाची व्याप्ती वाढवा. ३. नोकरीशी भावनिक संबंध जोडू नका. प्रत्येक जण एकमेकांवर प्रेम करतो म्हणून खासगी क्षेत्रातील कंपन्या पिकनिक, रिट्रीट, ऑफसाइट इ. देत नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे आता परिस्थिती चांगली आहे. परंतु, ती नेहमीच चांगली नसेल. आपल्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये भावनांची गुंतवणूक करा. तुम्ही कधीही एखाद्याला मृत्युशय्येवर असे म्हणताना ऐकले आहे का की, मी ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवला असता किंवा चांगले पॉवरपॉइंट सादरीकरण केले असते तर...? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...