आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन:आता साड्या कमी का नेसत आहेत नोकरदार महिला?

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवरून एका रिअॅलिटी शोमध्ये येण्याचे आमंत्रण आले होते. कार्यक्रमाचा आशय ठोस, शिक्षणसंबंधी असल्याने मी हो म्हणाले. आयकॉन्स ऑफ इंडिया या शोमध्ये दर आठवड्याला काही लघु उद्योजक त्यांच्या प्रेरणादायी कथा सांगतील. आणि ज्युरी सदस्याच्या भूमिकेत मी त्यांच्यापैकी एक उत्तम आयकॉन निवडेन.

मी अनेक स्टार्टअप्स पाहिले आणि तपासले असल्याने हे काम माझ्यासाठी सोपे होते. पण एक समस्या होती – मी शोदरम्यान कोणता पेहराव करणार? शार्क टँकसारखे रंगीबेरंगी, हास्यास्पद कपडे मला दिले जातील का? नाही नाही, मला हे मान्य नाही. काही वर्षांपासून मी पाहतेय की, टीव्ही चॅनेल्सवरील बहुतेक अँकर पाश्चात्त्य कपडे घालतात. आणि हा ट्रेंड फक्त टीव्हीवरच नाही, तर कॉर्पोरेट जगतातही दिसून येत आहे. कोणत्याही एमएनसी कार्यालयात जा, नोकरी करणाऱ्या मुली शर्ट-पँटमध्येच दिसतील. एमबीए कॉलेजपासून हे चक्र सुरू होते. मी लेक्चर देण्यासाठी जाते तेव्हा सगळे विद्यार्थी एकच काळा ब्लेझर घातलेले दिसतात. हाच व्यावसायिक ड्रेस मानला जातो. प्लेसमेंटच्या वेळी मुली याच स्टाइलमध्ये कपडे घालून मुलाखतीला जातात. तथापि, मला आयआयएम अहमदाबादचे प्रवेशपत्र मिळाले तेव्हा त्यात लिहिले होते की, प्रत्येक मुलीने आपल्यासोबत एक किंवा दोन साड्या आणल्या पाहिजेत. हेच मुलींचे पॉवर ड्रेसिंग मानले जात असे. आमच्या दीक्षांत समारंभात सर्व मुलींनी सुंदर साड्या नेसल्या होत्या. तथापि, यंदाच्या दीक्षांत समारंभात तुम्हाला एकही साडी दिसणार नाही. मग काय झालं?

गेल्या दोन-तीन दशकांत साडी हा त्रासदायक ड्रेस झाला आहे. मुली अभिमानाने सांगतात की, मला साडी नेसताही येत नाही. दुसरीकडे साडी हा बंधनकारक ड्रेस झाला. लग्नानंतर अनेक मुलींना सांगण्यात येत असे की, आता तुला फक्त साडी नेसायची आहे. हे आमच्या घरचे तत्त्व आहे. अशी हुकूमशाही कोणाला आवडेल? प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वेशभूषा करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. पण, माझे म्हणणे आहे की, साडीची स्वतःची विशेष शैली आहे. किमोनो हा पारंपरिक पोशाख आता जपानमध्ये परिधान केला जात नाही. कोरिया आणि चीनमध्येही असेच आहे. भारतात अजूनही साडी प्रचलित आहे, ही मोठी गोष्ट आहे, पण तो नव्या पिढीसाठी हळूहळू फॅन्सी ड्रेस होत चालला आहे.

मी माझ्या वर्किंग लाइफमध्ये आरामदायक कपडेच स्वीकारले. प्रथम सलवार- कमीज, नंतर लेगीज आणि जीन्ससह बहुतांश कुर्ते. पण एकेदिवशी माझी बालपणीची मैत्रीण घरी आली आणि तिला पाहून मला आश्चर्य वाटले. नेहमी टी-शर्ट आणि जीन्स घालणारी साडीत! हा चमत्कार कसा झाला? तिने सांगितले की, मी हातमागाच्या प्रेमात पडले आहे. देशाच्या विविध भागांतील पारंपरिक साड्या नेसणे हा माझा नवीन छंद आहे. ती खरोखरच खूप सुंदर दिसत होती. मलाही ही फॅशन करावीशी वाटली. आणि हळूहळू मीही हातमागाच्या साड्यांच्या प्रेमात पडले. मी कुठेही टूरला गेले की तिथून नक्कीच एक साडी विकत घेत असे.

माझ्या पुस्तकांच्या कार्यक्रमांमध्ये मी साडी नेसली तेव्हा सगळ्यांनी कौतुक केलं. माझा आत्मविश्वास वाढला आणि या पोशाखाबद्दलचे प्रेमही. म्हणूनच मी टीव्ही चॅनेलच्या लोकांना सांगितले की, मला शोमध्ये साडी नेसायची आहे आणि तीही माझ्या आवडीची. ते म्हणाले, ठीक आहे. मनात थोडी शंका आली की, १४ दिवस रोज साडी नेसल्याने गुदमरल्यासारखे तर होणार नाही ना?

खरं तर दोन-तीन दिवसांतच मी एवढी सरावले की पाच मिनिटांत तयार होत असे, तेही कोणाच्याही मदतीशिवाय. मी सौम्य, पण आकर्षक साडी निवडली. प्रोफेशनल लूकसाठी मी टसर सिल्क किंवा हँडलूम कॉटन, प्लेन किंवा प्लेन विथ बॉर्डर वापरले. थोडे वेगळे दिसण्यासाठी ब्लाउजही मिक्स अँड मॅच स्टाइलचा वापरला.

पुढच्या वेळी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचे असेल तेव्हा साडी घाला, असा माझा सल्ला आहे. त्याचा लोकांवर कसा परिणाम होतो ते पाहा. आणि हो, यूट्यूबवर माझा कार्यक्रमदेखील पाहा. कदाचित तुम्हाला लघुउद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळेल किंवा माझ्यासारखी साडी नेसायची. जसा देश तसा वेश. आजमावून पाहा साडीची अदा आणि ग्रेस. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in

बातम्या आणखी आहेत...