आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती:लाडक्या मायबापा मला दूर का दिलं?

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकगीतांची परंपरा अतिशय प्राचीन आहे. प्राचीन काळी यज्ञीय विधींसाठी म्हटली गेलेली सुक्ते, स्तुतीपर स्तोत्रे ही त्या परंपरेचीच पण भिन्न उदाहरणे. प्राचीन भारतात गायकांच्या मंत्रपरंपरा व सूतपरंपरा होत्या. त्यापैकी लोकगीतांचे गायन, प्रसारण हे सूतपरंपरेकडे होते. म्हणून महाकाव्याच्या शैलीचा उगमही यातूनच झाला असावा असे मानले जाते. महानुभाव वाङ्मयातील ‘धवळे’, ‘गुढे’ या रचनाही लोकगीतांची प्राचीन परंपराच सिद्ध करतात.

लोकगीतांच्या परंपरेचे मूळ हे जैन प्राकृत वाङ्मयातही असल्याचे आढळते. ‘गाथा सप्तशती’मध्येही त्या काळी लोकगीते रूढ असल्याचा पुरावा आढळतो. स्त्रियांनी लग्नप्रसंगी किंवा इतर उत्सवप्रसंगी गाणी म्हणण्याची प्रथा सर्वच जाती-जमातीत अस्तित्वात होती. ‘मराठी लोककथागीत’ या पुस्तकात दिनकर कुलकर्णी म्हणतात, ‘अतिशय प्राचीन लोकप्रिय परंपरा लाभलेला वाङ्मयप्रकार म्हणजे लोकगीत. एका पाश्चिमात्य अभ्यासकाने लोककथा आणि लोकगीत यांचे नाते स्पष्ट करताना लोककथेकडे सर्व ललित वाङ्मयाचे ‘पितृत्व’ दिले आहे, तर लोकगीताकडे सर्व काव्याचे ‘मातृत्व’ दिले आहे. लोकगीतांचे दालन हे स्त्रियांनीच अधिक प्रमाणात समृद्ध केल्यामुळे लोकगीतांना ‘अपौरुषेय वाङ्मय’ असेसुद्धा संबोधण्यात आले. प्राचीन काळी वेगवेगळ्या हेतूंसाठी सूक्ते किंवा मंत्र असल्याचे आढळते.

“ज्या विधीप्रसंगांचे मंत्र नसतील तेथे मंत्राऐवजी गाणी म्हणून विधी साजरे केले जात. मैत्रायणी संहितेत विवाहप्रसंगी गाणी म्हटल्याचा उल्लेख आहे. स्त्रियांनी धान्य कांडताना म्हणावयाच्या गाण्यांचा उल्लेख विज्जिकाय - संस्कृत कवयित्रीने केलाय.

काय सांगू बाई माहेरची बढाई जुंधळ्याच्या कणसावरी राघूची लढाई.

लग्नाची हळद दळताना, रुखवत करताना, देवाला व नवरा-नवरीला हळद-तेल चढवताना वेगवेगळ्या प्रसंगांची लोकगीते स्त्रिया गातात. यात त्यांची माहेरची ओढ, जिव्हाळा, लग्नासारख्या प्रसंगाचा आनंद अशा अनेक गोष्टी सामावलेल्या असतात. यातल्या स्त्री प्रतिमा या खेळकर, मिश्कील, खोडकर, लाडक्या लेकी, सासू-सुनांमधले हेवेदावे संपुष्टात आणू पाहणाऱ्या समंजस आणि दिलखुलास असतात. लोकगीते ही देवाधर्माच्या कथा, जन्म-लग्नसोहळे इत्यादी संदर्भातही असतात. तसेच ती समकालीन जीवन, रूढी-परंपरा, सत्ता, अन्याय, हतबलता दर्शवणारीही असतात.

धर्मग्रंथ, पोथ्या-पुराणातून गायिलेल्या देवाच्या महतीपेक्षाही ओव्या, लोकगीतांमधून सामान्य पातळीवरचे निरीक्षण अचूक पुढे येते. रामयुगात त्याज्य ठरवली गेलेली सीतेची प्रतिमा सामान्य स्त्रीच्या मौखिक लोकगीतात मात्र हिरकणीसारखी लखलखीत आणि अमूल्य ठरते. कारण मातृसत्तेचे पितृसत्तेत रूपांतर होताना अनेक बाबी, संकल्पना, धारणा, नातेसंबंध बदलत गेले. महाकाव्ये ही वर्णव्यवस्था आणि पितृसत्ता टिकवण्यासाठी वापरली गेली. महाकाव्ये रचण्यामध्ये आणि त्यांना मान्यता मिळवण्यात तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध होते. या महाकाव्यांच्या रचियत्यांनी स्त्रियांशी दुजाभाव केला. पितृसत्ताक समाजाच्या घडवणुकीच्या काळात महाकाव्ये पितृसत्ताक बनली. लोकगीतांमधील अभिव्यक्ती मात्र अधिक अस्सल राहिली. लोकगीतांची रचना करणाऱ्यांवर वर्णव्यवस्था आणि पितृसत्ता टिकवण्याची जबाबदारी नव्हती. त्यामुळे त्यांना नवरा, वडील, भाऊ, सत्ताधीश यांचे गोडवे गाणाऱ्या रचना करण्याची गरज भासली नाही. मात्र असे असूनही सर्वच लोकगीते ही अशा प्रकारची आहेत असे मात्र नाही. सण, उत्सव, जत्रा, गोंधळ, जागरण, लग्न इ. प्रसंगी मौखिक परंपरेतून म्हटली जाणारी हजारो लोकगीते आहेत. त्यातल्या काही लोकगीतांवर पितृसत्तेचा प्रभाव दिसतोच. पतीपरायण आणि शरणागत स्त्रीत्वदेखील अशा लोकगीतांमधून दिसून येतं. याचे कारण पुन्हा पितृसत्तेतच शोधावे लागते. त्यामुळे बाई म्हणून जगत असताना पुरुषी प्राबल्य, कौटुंबिक राजकारणात पिचली जाणारी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसणारी, हतबल अशी स्त्री प्रतिमा लोकगीतांतून समोर येते.

“डोंगी बाई डोंगी गं शेत माझं वाऱ्यापाण्यानी गेलं लाडक्या मायबापा मला दूर का दिलं?’

लोकगीतांमधून दिसणारी स्त्री प्रतिमा ही सासुरवाशी सुनेची असते. जी आईवडील माहेर सोडून परक्या घरात सासू, सासरा, दीर, नणंदा यांच्या जाचाखाली नांदत असते. ती साहजिकच दुःखी, सहनशील, सात्त्विक अशी असते. त्याचबरोबर लोकगीतात सासरच्या लोकांविषयी आणि एकूणच परंपरेविषयीची तक्रार असते.

बाईचा हा जन्म नको घालू सख्याहरी रात्र ना दिवस परक्याची ताबेदारी

खरं तर परंपरेच्या नावाखाली घरातल्या मुलीला तिच्या पाळामुळासकट उपटूनच काढलं जातं आणि परक्या मातीत कसंबसं लावून झाकपाक केलं जातं. रोप उपटताना जसे त्याच्या मुळाचे बारीक तंतू तटतट तुटून निघतात आणि मग ते दुसऱ्या मातीत रुजेलच याची खात्री नसते, तशाच प्रकारे अनेक मुलींचं जीवन कोमेजून जातं, करपून, जळून, वाळून जातं. तरीही ही परंपरा मात्र कायम ठेवली जाते. आपलं नाव, गाव, अस्तित्व, सवयी बदलून परक्याची ताबेदारी करावी लागते. समाजातली पुरुषी व्यवस्था आणि बाईची अगतिकता, बाई म्हणून जन्माला येणं हाच तिचा मोठा गुन्हा असतो. वर्षानुवर्षे होत आलेल्या अन्यायापुढे मुकाट मान तुकवण्यावाचून तिला पर्याय नसतो. यातून परिस्थितीशरण, स्वतःकडे दुय्यमत्व घेणाऱ्या रचनांचीही निर्मिती झालीय.

प्राचीन व मध्ययुगीन काळात रचलेल्या या लोकगीतांमधून तत्कालीन स्त्री जीवन समजायला मदत होते. स्त्रिया त्या काळात कुटुंबांत बंदिस्त असल्यामुळे माहेर, सासूरवास, नातेसंबंध, नवरा, नणंद, विवाह, वैधव्य हे विषय लोकगीतांमधून हाताळले गेले. आजही स्त्रियांचे जीवन पितृसत्ताक कुटुंबरचनेपासून मुक्त नसल्यामुळे इतिहासातील एका दीर्घ काळखंडात स्त्रियांचे कौटुंबिक जीवन कसे होते हे अभ्यासण्याचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून या लोकगीतांकडे बघता येते. प्रत्येक गावात अशा असंख्य लोकगीतांचा संग्रह दडलेला आहे.

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...