आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागीतांजलीश्री यांच्या ‘रेत समाधी’ कादंबरीला यंदाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित केलेल्या जगातील कोणत्याही भाषेत लिहिलेल्या कादंबरीला दिला जातो. डेझी रॉकवेल यांनी ‘रेत समाधी’चे भाषांतर केले आणि ब्रिटनमध्ये एक प्रकाशक शोधला. अशा प्रकारे ती निवडीस पात्र ठरली आणि हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे हिंदीतील पहिले पुस्तक ठरले. ही अभिमानाची बाब आहे यात शंका नाही, परंतु काही अस्वस्थ प्रश्नदेखील उद्भवतात, त्यांना तोंड दिले पाहिजे. मी गीतांजली यांना व्यक्तिशः ओळखतो, पण हिंदी लेखन क्षेत्रात त्यांनी काही नुकताच अवतार घेतलेला नाही. त्यांच्या यापूर्वी चार कादंबऱ्या आणि दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्यावर एक अस्सल पुस्तकही लिहिले आहे. हिंदीच्या जगात त्यांना ओळख आणि मान्यता मिळाली आहे. मग परदेशी पुरस्कार मिळवूनच त्या साहित्यविश्वाच्या सुपरस्टार का झाल्या? आजही आम्हा भारतीयांसाठी परदेशी मान्यता खूप महत्त्वाची आहे. बुकरची अर्थातच मोठी ख्याती आहे, पण भारतात त्याची शंभरपट अतिशयोक्ती झाल्याचे दिसून आले आहे. रवींद्रनाथ टागोरांना १९१३ मध्ये साहित्याचे नोबेल मिळाले होते, त्यानंतर त्यांच्या महानतेची संपूर्ण भारतात ओळख झाली. बीटल्समध्ये सामील झाल्यानंतर रविशंकर घरोघरी ओळखले जाऊ लागले. सत्यजित रे यांच्या चित्रपटांचे परदेशात कौतुक झाल्यानंतरच त्यांच्या देशवासीयांनी त्यांना दंतकथा मानले. २००८ मध्ये अरविंद अडिगा यांनी ‘द व्हाइट टायगर’साठी बुकर जिंकला तेव्हा भारतीयांनी त्यांना साहित्यिक नायक म्हणून पाहिले. तीच कथा स्लमडॉग मिलेनियरची आहे. ब्रिटनमध्ये बाफ्टा पुरस्कार जिंकला, तेव्हा तो भारतात अधिकृतपणे प्रसिद्धही झाला नव्हता. पण प्रसारमाध्यमे त्यावर लट्टू झाली. फेब्रुवारी २००९ मध्ये त्याने ऑस्कर जिंकला तेव्हा आपले भान हरपले. एका ब्रिटिश दिग्दर्शकाने बनवलेल्या चित्रपटाला आपण आपला विजय जाहीर केला. अनेक भारतीयांना वाटते की, बुकर जिंकणे म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी ओळख मिळवणे. त्याला एक ग्लॅमर जोडलेले आहे. पण हा प्रवास कुठून सुरू झाला त्याचे काय? एका अग्रगण्य भारतीय प्रकाशकाने एका मुलाखतीत सांगितले की, एखाद्या लेखकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तर पुस्तकांच्या विक्रीतील तफावत दहा प्रतींपेक्षा जास्त होत नाही. क्रॉसवर्ड पुरस्कार किंवा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकल्यावर कदाचित हजार प्रती विकल्या जातात, पण बुकरसारखा पुरस्कार मिळाल्यावर त्या पुस्तकाच्या ५० हजार ते दीड लाख नवीन प्रती विकल्या जातात. भारतातील बुकर-विजेत्या कादंबऱ्या पाहता पाहता विकल्या जातात, कारण ब्रिटिशांनी मान्यता दिलेले हे पुस्तक कसे आहे हे जाणून घेण्याची वाचकांना उत्सुकता असते. भारतात ‘रेत समाधी’ २०१८ मध्ये राजकमल प्रकाशनाने प्रकाशित केली होती. राजकमलचे संचालक अशोक माहेश्वरी यांच्याशी मी बोललो. बुकर पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत वाचक पुस्तकाबद्दल उत्साही नसल्याची कबुली त्यांनी दिली. पुस्तकाच्या फार कमी प्रती विकल्या गेल्या. या प्रतिसादाने लेखक स्वतः निराश झाला. असे का झाले असावे? शेवटी, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा पुस्तक बाजार आहे. हिंदीला मोठी साहित्यिक परंपरा आहे आणि तिची बाजारपेठही संख्येच्या बाबतीत अफाट आहे. गीतांजली यांच्या पहिल्या कादंबरीला क्रॉसवर्ड पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१७ मध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले. पण यामुळे त्या ख्यातनाम लेखिका झाल्या नाहीत, बुकर जिंकल्यानंतरच झाल्या. जगातील बहुतांश लोक बोलायला शिकत होते, तेव्हा आपल्या देशात साहित्याचा विकास झाला होता. मग आपल्या देशात लेखकांवर चर्चा, समीक्षा वगैरे का होत नाहीत आणि ते जास्त का वाचले जात नाहीत? आपण एखाद्या परदेशी व्यक्तीची वाट पाहत आहोत का, जो आपली पुस्तके अनुवादित करून आपल्यापर्यंत पोहोचवेल? भारतात वर्षभरात २४ भाषांमध्ये सुमारे ८० हजार पुस्तके प्रकाशित होतात. परदेशातून मान्यता मिळणे वाईट नाही, परंतु प्रतिभेला न्याय देण्यासाठी हा एकमेव निकष असू शकत नाही.
गीतांजली लेखन क्षेत्रात नवीन नाहीत. त्यांच्या यापूर्वी चार कादंबऱ्या आणि दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मग परदेशी पुरस्कार मिळवूनच त्या साहित्यविश्वाच्या सुपरस्टार का झाल्या?
पवन के. वर्मा लेखक, मुत्सद्दी,माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.