आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग इंडिया:इतकी उतावीळ आणि अधीर का होत आहे आजची तरुणाई?

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारुण्य म्हणजे ऊर्जा, सकारात्मकता, आशावाद, उत्साह. तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, संघर्ष करण्याची आवड असते, तरुणांना कठोर परिश्रम करून जलद फळ मिळवायचे असते आणि त्यानंतर ते मौजमस्ती करायला विसरत नाहीत. पण, आज तरुणांमध्ये अधीरताही वाढत आहे. त्यांना नीट लक्ष केंद्रित करता येत नाही. कौशल्य विकासात त्याची आवड कमी होत आहे. मागील पिढ्यांपेक्षा आजची तरुणाई अधिक उतावीळ आहे. एखादे कौशल्य शिकण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ ती देऊ शकत नाही आणि त्यांच्या वर्तमान कामात सतत बदल करत राहते. आजची तरुणाई प्रत्येक गोष्टीबद्दल खूप तक्रार करते, मग ते काम असो किंवा आजूबाजूचे वातावरण. अधीरतेमुळे ते आपले करिअरही धोक्यात घालतात. तथापि, संयम हा आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सक्षम असणारा गुण आहे. तो आपल्याला चांगला माणूस बनवतो, आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवतो, आपण नवीन गोष्टी शिकतो आणि त्या इतरांपेक्षा चांगल्या करतो. अलीकडेच एक अतिशय मनोरंजक अध्ययन करण्यात आले, त्यामध्ये तरुणांना एक छोटा फायदा ताबडतोब हवा की महिनाभरानंतर मोठा फायदा, हा पर्याय देण्यात आला होता. तरुणांनी लगेचच छोटा फायदा निवडला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी आजचे तरुण अल्पकालीन फायदा का पसंत करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा संबंध त्यांच्या मेंदूच्या यंत्रणेशी असल्याचे संशोधनात आढळून आले. त्यांचे मन उद्याचे फायदे समजत नाही, त्यामुळे ते खूप अधीर होतात आणि त्वरित परिणाम शोधू लागतात. असो, आज आपण अशा वातावरणात राहतो ज्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी तत्काळ उद्दिष्टे साध्य करावी लागतात.

घटणारी एकाग्रता, वाढती महत्त्वाकांक्षा, झटपट आनंद आणि अपयश स्वीकारण्यास असमर्थता यांमुळे तरुणांमध्ये तणाव वाढत आहे, त्यामुळे नैराश्य, मनोविकार आणि आत्महत्येची प्रवृत्ती वाढत आहे. आपण अशा जगात राहतो जिथे ऑनलाइन वितरणासाठी स्टोअर्स आहेत, एका क्लिकवर मनोरंजन उपलब्ध आहे आणि स्मार्टफोन आपल्या आवडी आणि गरजांनुसार असंख्य गोष्टी करू शकतात. त्या तुलनेत पाषाण किंवा प्राचीन काळातील तरुणांमध्ये अंतहीन संयम असायचा. ते शिकार करण्यासाठी अनेक दिवस किंवा आठवडे वाट पाहू शकत असत. प्रत्येक पिढीबरोबर संयमाची पातळी खाली गेली आहे. आज आपण सर्व काही आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर केल्या जाणाऱ्या युगात आलो आहोत. आता जेवणाची प्रतीक्षा करावी लागत नाही, वस्तू व सेवांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही आणि आपली जीवनशैली यांत्रिक जीवनात खूप वेगवान झाली आहे.

तरुणांनी संयमाचे महत्त्व जाणून दैनंदिन जीवनात आचरणात आणले तर ते त्यांच्या अनेक चुका सुधारू शकतील. यामुळे त्यांचे जीवन सोपे, समाधानी व आनंदी होईल आणि त्यातून तणाव, राग, निराशा या नकारात्मक भावना कमी होतील. आपण धीर धरतो तेव्हा आपण शांत असतो आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. मग आपण नवीन गोष्टी शिकण्यास तयार असतो. संयमाच्या कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ आणि प्रयत्न लागतात. संयमी असल्यास आपले अपयश सहज स्वीकारता येते. ज्यांना त्यांची वाट पाहता येते त्यांच्याबाबतच चांगल्या गोष्टी घडतात.

(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) इरा त्रिवेदी लेखिका, स्तंभलेखिका आणि योगशिक्षिका admin@iratrivedi.in

बातम्या आणखी आहेत...