आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकत्याच प्रकाशित झालेल्या एका बातमीत, भारतीय कारखाने उत्पादनात रोबोटच्या वापराला कसे प्रोत्साहन देत आहेत, हे सांगण्यात आले. पंधरा वर्षांपूर्वी उद्योगाशी संबंधित कामांसाठी भारतात शंभरहून कमी रोबोट बनवले जात होते, आज त्यांची संख्या वार्षिक सहा हजारांवर पोहोचली आहे. हे चौथ्या औद्योगिक क्रांती किंवा औद्योगिक क्रांती ४.० चे वैशिष्ट्य आहे की, ते आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि इंटरनेट वापरून पारंपरिक उत्पादन प्रक्रिया ऑटोमेशनकडे नेते.
रोबोट या शब्दाचा शोध १९२० मध्ये चेक लेखक कारेल चापेक यांनी लावला होता. त्यांनी ‘रोसुम्स युनिव्हर्सल रोबोट्स’ नावाचे नाटक लिहिले. सायन्स फिक्शनने ही कल्पना स्वीकारली. ज्यांना जगाचा ताबा घ्यायचा होता अशा माणसांसारख्या मशीनची त्याने कल्पना केली, तर ऐतिहासिकदृष्ट्या रोबोट्स ही बुद्धिमान यंत्रे आहेत, ती कारखान्यांमध्ये वापरली जातात. पण, आता मानव आणि रोबोट यांच्यातील नाते बदलत आहे. रोबोट कारखाने सोडून आपल्या सामाजिक जीवनात प्रवेश करत आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी अशा बॉक्ससारख्या रोबोटच्या क्लिप पाहिल्या असतील, ज्यांनी कोविडदरम्यान अन्न आणि औषधे पोहोचवण्याचे काम केले. भारतातील रुग्णालयांमध्ये आता रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
रोबोट्स आता फक्त यांत्रिक उपकरणे राहिली नाहीत - ते चपळ, सक्रिय आणि स्वायत्त मशीनमध्ये रूपांतरित झाले आहेत, जे कार चालवण्यापासून ते नियोजित शहर बनवण्यापर्यंत सर्वकाही करू शकतात. रोबोटिक्सचे युग आले आहे. यामध्ये स्मार्टफोन तंत्रज्ञानातील जलद नावीन्याचे प्रमुख योगदान आहे. स्मार्टफोनमुळेच वायरलेस कम्युनिकेशन, नॅनो चिप्स, स्वस्त सेन्सर्स आणि कॅमेरे अस्तित्वात आले. स्मार्टफोन तंत्रज्ञानाने रोबोटिक्समध्येही बदल केले आहेत. आज मशीन लर्निंगमध्ये झालेल्या प्रगतीने रोबोट त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल चांगले निर्णय घेऊ शकतात, हे सुनिश्चित केले आहे.
आता यंत्रमानव केवळ आपल्यासाठी काम करणार नाहीत, तर ते आपल्यासोबतही काम करतील. शस्त्रक्रियांव्यतिरिक्त आजारी आणि वृद्धांसाठी आरोग्य सेवेमध्ये त्यांची भूमिका वाढत आहे. वृद्धाश्रमात स्वच्छता करणे, वस्तू हलवणे, मनोरंजन करणे हे रोबोटचे काम होत आहे. महामारीच्या काळात बंगळुरूस्थित स्टार्टअपने बनवलेला ‘मित्रा’ नावाचा रोबोट भारतातील अनेक रुग्णालयांमध्ये सेवा देत होता. त्याने रुग्णांच्या रीडिंग घेतल्या आणि कन्सल्टेशनमध्ये मदत केली.
रोबोट्स सर्वत्र आहेत : चालकविरहित कार, ट्रॅफिक सहायक ड्रोन, गोदामे, शेती, अगदी युद्धातही. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रिमोट कंट्रोल, ऑटोमेटेड सिस्टिम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पूर्ण मदत घेतली जात आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये भारत सरकारने ड्रोन वाहतूक व्यवस्थापन धोरण तयार केले. कंटाळवाण्या, पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या किंवा धोकादायक अशा रोजच्या कामांसाठी माणसांऐवजी रोबोटचा वापर केला जात आहे. त्यामुळे रोबो माणसांच्या नोकऱ्या तर खाणार नाहीत ना, हे आव्हानही निर्माण होत आहे. अनेक संशोधकांना आढळून आले की, ऑटोमेशन तंत्र नवीन रोजगार निर्माण करतात. पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हे आठवत असेल की, पूर्वी ट्रंक कॉल्स एका शहरातून दुसऱ्या शहरात संवाद साधण्यासाठी वापरले जात होते. अनेक लोक टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम करत होते. मात्र, दूरसंचार क्रांतीनंतर या क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. येल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसून आले की, जपानमधील उत्पादन नोकऱ्यांमध्ये १९७८ ते २०१७ पर्यंत २.२ टक्क्यांनी वाढ झाली असून दर १,००० कामगारांमागे एक रोबोटिक युनिट बसवण्यात आले आहे. आगामी काळात काय होईल हे सांगणे कठीण आहे, परंतु हे निश्चित आहे की, मालकांना आता लाइफलाँग लर्निंग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) साधना शंकर, लेखिका, भारतीय महसूल सेवा अधिकारी sadhna99@hotmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.