आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Will There Be Such A Scenario In 2029 Between Modi And Kejriwal? Article By Rajdeep Sardesai

दृष्टिकोन:2029 मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल असे दृश्य असेल?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीत समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांनी भाजपला मतदान केले आहे. पूर्वी ‘एमवाय’ घटकाचा अर्थ मुस्लिम व यादव असा होता, तर आज तो महिला व योजना असा झाला आहे.

एक आठवडा हा राजकारणात दीर्घकाळ असू शकतो, मग वर्षाला तर अनंत काळ म्हटले जाईल. थोडे मागे जाऊन २०१२ कडे बघू, तेव्हा उत्तर प्रदेशात भाजपला केवळ ४७ जागा व १५ टक्के मते मिळाली होती, तर सपा पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकली होती. नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी उत्तर प्रदेशात प्रचारही केला नव्हता, कारण निवडणुकीसाठी भाजपचे संघटन सचिव संजय जोशी हे संघाच्या जुन्या काळापासून त्यांचे प्रतिस्पर्धी होते. आणि आज दहा वर्षांनंतरचे चित्र पाहा. भाजपने विजयाचा चौकार मारला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४५ टक्के मतांसह भाजपचा हा सलग चौथा विजय असून मोदींच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आज भारतीय राजकारणातील सर्वात मोठी शक्ती बनला आहे. अखेर इतका नाट्यमय बदल कसा झाला?

याचे संक्षिप्त उत्तर असे असेल की, हा नवा भाजप आहे, तो नवीन भारतात काम करत आहे. मोदी-शहांच्या पक्षाने अटल-अडवाणींच्या काळातील औदार्याचा मुखवटा काढून फेकला आहे आणि आता ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना निर्दयपणे नेस्तनाबूत करणारे निवडणूक यंत्र झाले आहे. भाजपने निवडणुकीच्या राजकारणाचे नियम बदलले आहेत. पारंपरिक जातीवर आधारित राजकारणालाही यामुळे हरताळ फासला गेला आहे. भाजपने सोशल इंजिनिअरिंग आणि जातीय समीकरणे सोडून दिली आहेत असे नाही, त्यांनी केवळ पक्ष कोणत्याही एका जातीचा आहे असे वाटू नये अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली आहे. त्याऐवजी तो हिंदुत्वाची चर्चा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा समावेश असलेला हा एक राजकीय विचार आहे. या आधारावर पक्षाने आपला सामाजिक पाया विस्तारला आहे आणि धर्माव्यतिरिक्त स्वतःची ओळख असलेला हिंदुत्व-प्लस मतदार वर्गही त्यात समाविष्ट केला आहे.

भाजपच्या वाढत्या प्रभावाच्या केंद्रस्थानी सरकारी कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांचा एक मोठा वर्ग तयार करण्याचा उद्देश असलेल्या गरीब-केंद्रित योजना आहेत. पूर्वीच्या सरकारांनी हे केले नव्हते असे नाही, पण ज्या प्रकारे भाजपने राजकीय अजेंडा म्हणून शौचालय, स्वयंपाकाचा गॅस, मोफत रेशन किंवा घर यांसारख्या सुविधा देण्यात यश मिळवले आहे ते गेम चेंजर ठरले आहे. सर्व स्तरांतील किती महिलांनी भाजपला मतदान केले ते पाहा.

निवडणुका जिंकलेल्या भाजपच्या चार सरकारांनी फार चांगले प्रशासन दिले, असे नाही. योगी आदित्यनाथ म्हणतात की, त्यांनी उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली, परंतु ज्या राज्यात लाखो बेरोजगार आहेत, चमकदार यूपी शायनिंगचा प्रचार त्या राज्याच्या वास्तविकतेशी जुळणारा आहे, हे कुणाला पटेल का? मणिपूर गेल्या पाच वर्षांत शांत असेल, परंतु त्याचे दरडोई उत्पन्न अद्यापही देशात सर्वात कमी आहे. उत्तराखंडमध्ये वर्षभरात तीन मुख्यमंत्री बदलणे हा नेतृत्वाच्या संकटाचा पुरावा आहे. गोव्यातही प्रमोद सावंत यांचे सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी मानले जात होते. असे असूनही मोदी-फॅक्टरमुळे भाजपला प्रो-इन्कम्बन्सी गती निर्माण करण्यात यश आले. पंतप्रधानांनी देशातील जनतेशी-विशेषत: उत्तर प्रदेश, ज्याला ते त्यांची ‘कर्मभूमी’ म्हणतात, ज्या प्रकारचा ज्वलंत संपर्क प्रस्थापित केला आहे, तो सामान्य नेता-मतदार समीकरणाच्या पलीकडे जातो.

हिंदी पट्ट्यातील एक महिला आपल्या नवऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तिच्या मुलाला नोकरी नाही, असा शोक व्यक्त करत होती, तरीही तिने ‘मोदीजीं’मुळेच भाजपला मतदान करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी त्यांच्या समर्थकांशी इतका सखोल भावनिक बंध निर्माण केलेला दिसतो की, ‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणेवर त्यांचा जवळजवळ अतार्किक विश्वास निर्माण झाला आहे. घराणेशाहीच्या संस्कृतीचा परिणाम मानल्या जाणाऱ्या अखिलेश यादव, राहुल गांधी या विरोधी नेत्यांनीही भाजपला मदत केली आहे. खरे तर अरविंद केजरीवाल यांच्या पंजाबमधील ‘आप’च्या विजयामागेही हेच कारण आहे. केजरीवाल यांनी भ्रष्टाचार व कौटुंबिक राजवटीला आव्हान दिले आणि ते नव्या आशेच्या राजकारणाचे प्रतीक बनले. कदाचित आज भाजप केजरीवाल यांना इतर कोणापेक्षा स्वतःसाठी अधिक धोकादायक प्रतिस्पर्धी समजत असेल. भारतीय राजकारणाचा पुढचा टप्पा आपल्याला काय दाखवेल? २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी विरुद्ध केजरीवाल अशी लढत तर पाहायला मिळणार नाही?

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) नव्या भारतात काम करणारा आणि निवडणूक यंत्र झालेला हा नवा भाजप आहे. राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...