आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:विल, आपण आणि   ‘वर्क इन प्रोग्रेस‘

नीलंबरी जोशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तो : सॉरी. हा तुझा बोनसचा चेक. आपण आधी बोललो होतो तितक्या रकमेचा हा चेक नाही. पण, खूप विचार करून मी ही रक्कम ठरवली आहे. ती : मी इतकं काम केलं. मुलांना एकटं घरी ठेवून कामासाठी फिरले, पण तुला पर्वाच नाही. हा प्रश्न रकमेचा नाही. या कंपनीत माझी काय किंमत आहे त्याचा आहे. (असं तावातावानं बोलत असतानाच ती हातातल्या चेककडे बघते. तो ठरल्यापेक्षा खूप जास्त रकमेचा असतो.) तो : तेच मी म्हणत होतो. तुझ्या श्रमांच्या तुलनेत आपण आधी ठरवलेली रक्कम खूप कमी होती. मी ती वाढवली..!

“एरिन ब्रोकोविच” या ज्युलिया रॉबर्ट््सच्या अभिनयानं गाजलेल्या चित्रपटातला एरिन ब्रोकोविच आणि तिचा बॉस यांच्यातला हा मर्मस्पर्शी प्रसंग. या प्रसंगातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातला बॉस एरिनच्या कामाचा योग्य तो मोबदला देऊन तिला आपल्या आधीच्या वागण्याबद्दल “सॉरी” म्हणतो आहे. त्याच्या सॉरी म्हणण्याला “चेकमधली रक्कम वाढवणं” या सकारात्मक कृतीची जोड आहे.

“सॉरी म्हणणं” आणि “सॉरी असणं” यात कायमच फरक असतो. मागच्याच आठवड्यात, २७ मार्चला ‘ऑस्कर’ पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात विल स्मिथ या अभिनेत्यानं ख्रिस रॉक या सूत्रसंचालक विनोदवीराला थप्पड मारली. त्यानंतर काही वेळात विल स्मिथला “किंग रिचर्ड” या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा ‘ऑस्कर’ मिळाला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ मार्चला विलनं “इन्स्टाग्राम”वर ख्रिसची माफी मागितली. या दोन्ही घटना खूप गाजल्या. केवळ काही तासांच्या अंतरानं घडलेल्या या दोन्ही प्रसंगांचे जगभर पडसाद उमटले.

केवळ १६० शब्दांच्या या माफीच्या पोस्टमध्ये विल स्मिथ केवळ सॉरी म्हणायचं म्हणून सॉरी म्हणतो आहे असं न वाटता तो खरोखरच आपल्या कृत्याबद्दल ‘सॉरी’ आहे असं दिसून आलं. या प्रसंगाचं जरा विश्लेषण करायचं तर विल स्मिथनं माफी कोणत्या शब्दात मागितली आहे ते पाहणं गरजेचं आहे. आपल्या माफीच्या पोस्टमध्ये तो म्हणतो...‘कोणत्याही स्वरुपातली हिंसा ही विखारी आणि विनाश घडवून आणणारीच असते. कालच्या ऑस्कर पुरस्कार वितरणाच्या समारंभातलं माझं वागणं हे अक्षम्य स्वरूपाचं होतं. माझ्यावर नेहमीच विनोद केले जातात. पण जाडा (विल स्मिथची पत्नी) हिच्या आजारावरून विनोद व्हावा हे मला सहन झालं नाही. त्या वेळी माझ्या भावना उचंबळून आल्यानं मी घाईत प्रतिक्रिया दिली.

ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागतो. मी माझ्या मर्यादा ओलांडल्या आणि चुकीचं वागलो. हे लाजिरवाणं आहे आणि मला ज्या प्रकारचा माणूस बनायला आवडेल त्याचं हे अजिबात निदर्शक नाही. प्रेम आणि दयाळूपणा सामावलेल्या या जगात हिंसेला स्थान नाही. मला अकॅडमीची, या समारंभाचे निर्माते, जमलेले सर्व प्रेक्षक आणि जगभरातून हा सोहळा पाहणारे लोक या सगळ्यांचीच माफी मागायची आहे. मला विल्यम्सच्या कुटुंबीयांची आणि ‘किंग रिचर्ड’च्या सगळ्या टीमचीही माफी मागायची आहे. एरवी आपण सगळ्यांनी एक आनंदसोहळा अनुभवला असता, त्याला माझ्यामुळे गालबोट लागलं. याबद्दल मला अपराधी वाटतं आहे. स्वत:मधून एक चांगला माणूस घडवण्याचा माझा प्रवास अजूनही सुरूच आहे..!” विल स्मिथचं हे माफी मागणं खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यानं ही माफी मागताना अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. माफी कशी मागावी, याचा वस्तुपाठही घालून दिला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, त्यानं थेटपणे “माझं वागणं अक्षम्य होतं” या शब्दांत स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी घेतली आहे. असं करायचं आपण सहसा टाळतो. दुसरं म्हणजे, जाडाच्या आजारपणाबाबतचा विनोद मला सहन झाला नाही, हे सांगताना त्यानं आपण अशी कृती का केली, त्याचं कारणही समजावलं आहे. रागाचा उद्रेक झाल्याच्या घटनेनंतर आपल्या रागीट वर्तनामागचं कारण समोरच्या माणसाला समजावून सांगणं महत्त्वाचं असतं. तिसरं म्हणजे, मी माझी मर्यादा ओलांडली आणि माझी चूक झाली, हे त्यानं रोखठोकपणे मान्य केलं. “मला असं वाटतं” वगैरे गुळमुळीत शब्द त्यात वापरलेले नाहीत. आपल्या वर्तनाबद्दल त्याला अपराधी आणि ओशाळवाणं वाटतंय हेही त्यानं सांगितलं. चौथी गोष्ट म्हणजे, ही घटना भर समारंभात सार्वजनिकपणे घडली असल्यामुळे विल याने या घटनेचे साक्षीदार असलेल्या सगळ्यांचीच माफी मागितली आहे हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. ही भावनिक बुद्धिमत्ता – इमोशनल इंटेलिजन्स त्याच्या माफीत उठून दिसते.

अर्थात, त्यानं ख्रिसला थप्पड मारणं आणि नंतर माफी मागणं हे सगळ्यांनाच सकारात्मक वाटलेलं नाही. विल स्मिथच्या या वागण्यावर जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “त्यानं जगासमोर असा कोणता आदर्श घालून दिला?” असा प्रश्न ब्रिटिश असोसिएशनचा माइक फिशर याने विचारला आहे. “आपल्या वागण्याचे काय परिणाम होतात ते त्यानं आजमवायला हवं होतं,” असं तो म्हणतो. तर काही मानसतज्ज्ञांच्या मते, ख्रिसच्या विनोदावर स्मितहास्य केल्यानंतर पुढच्याच क्षणी प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या हॉलमध्ये अत्यंत शांतपणे स्टेजवर चालत जाणं आणि इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं हे झपाट्यानं घडलेले विलच्या वर्तनातले बदलच काळजी करण्यासारखे आहेत. “आपल्या प्रिय व्यक्तीच्या आजारपणावरचा विनोद सार्वजनिकरीत्या ऐकणं त्रासदायक असलं तरी शारीरिक हिंसा हे त्याला उत्तर नव्हे,” असं काहींचं म्हणणं आहे. तर, ‘त्याला नंतर या विषयावर ख्रिस रॉकशी बोलताही आलं असतं, अशा वेळी तिथून शांतपणे निघून जाणं हीदेखील एक प्रतिक्रिया असू शकली असती,’ असंही काही जणांना वाटलं.

मात्र, विल स्मिथच्या या हिंसक प्रतिक्रियेबद्दल तीव्र विरोध दिसून आला नाही. हिंसात्मक घटना आपल्या समोर येत असताना आपल्या जाणिवांची, संवेदनशीलतेची धार बोथट होत चालली आहे का? असे प्रश्न त्यावरून निर्माण होतात. राग ही एक आदिम मानवी भावना आहे. आनंद, दु:ख, चिंता, द्वेष यांप्रमाणेच आपल्या अस्तित्वासाठी राग ही भावना गरजेची आहे. जंगलात राहणाऱ्या आदिमानवासमोर अनपेक्षितरीत्या हिंस्र प्राणी आला तर अपेक्षेपेक्षा वेगळं घडल्यामुळे मनात रागाची भावना उमटली असणार. याच भावनेतून त्या प्राण्याशी लढायचं, पळून जायचं की स्तब्ध उभं राहायचं याचा ताबडतोब निर्णय आदिमानवाला घ्यावा लागत होता. त्यामुळे मानवजातीचं अस्तित्व टिकवण्याशीच राग या भावनेचा थेट संबंध आहे. आजही रस्त्यावर गाडी चालवताना दुसरा एखादा ड्रायव्हर चुकीच्या दिशेनं आला, बॉसनं आपला अपमान केला अशा अनेक अनपेक्षित घटनांमुळे आपल्या रागाचा उद्रेक होतो. या अर्थानं राग ही भावना गरजेची असली तरी आपण आपल्या रागामुळे दुसऱ्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान करतो ते मात्र चूक आहे. एखाद्याला राग येणं ही नुकतीच घडलेली घटना, त्याची मूळ वृत्ती आणि त्या घटनेकडं पाहायचा त्याचा दृष्टिकोन या तीन गोष्टींवर अवलंबून असतं. अहंकारी- स्पर्धात्मक वृत्ती, ताण सहन करायची क्षमता, राग येण्याआधीची मन:स्थिती, शारीरिक दमणुकीचं प्रमाण अशा गोष्टीही राग या भावनेत महत्त्वाच्या ठरतात. मी कोणीतरी खास आहे आणि माझे हक्क इतरांपेक्षा जास्त आहेत असं वाटत असणं, आपल्याला जाणवणाऱ्या एकाच दृष्टिकोनातून दुसऱ्यांच्या वागण्याकडं पाहणं, भोवतालची परिस्थिती आणि माणसं यांच्यावर आपलं चांगुलपण आणि आपल्या प्रतिक्रिया अवलंबून आहे, ही धारणा तसंच उतावळा स्वभाव, दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी रागाचं नियंत्रण करताना लक्षात घ्याव्या लागतात.

राग, त्यामागची कारणं, त्यावरचं नियंत्रण या गोष्टींबद्दल बोलताना आणि पत्नी जाडाविषयी केल्या गेलेल्या विनोदामुळं विल स्मिथने ख्रिसला रागाने थप्पड मारण्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं २०२१ मध्ये प्रकाशित झालेलं “विल” हे आत्मचरित्र विचारात घ्यायला हवं. जाडा स्मिथ ही अभिनेत्री आहे. तसंच ती लिंगभेद, मानसिक आरोग्य, लैंगिक छळ अशा प्रश्नांवरचा “रेड टेबल टॉक” हा टॉक शोदेखील करते. तिच्या सामाजिक भान जागृत असलेल्या विचारसरणीचा विलवरचा प्रभाव आत्मचरित्रात स्पष्ट जाणवतो. विल आणि जाडा पिंकेट स्मिथ यांचं २५ वर्षांचं समंजस नातं या पुस्तकात दिसतं. जाडाला असलेला केस गळण्याचा विकार तिच्या ऑस्कर पुरस्कारावेळच्या संपूर्ण टक्कल असलेल्या चेहऱ्यामागचं कारण आहे. ख्रिस रॉकच्या विनोदाचा याच्याशी कसा संबंध आहे? तर “जीआय जेन” या चित्रपटामध्ये डेमी मूर या अभिनेत्रीनं संपूर्ण टक्कल केलं होतं. ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकनं जाडाच्या टकलावरून “जी आय जेन-२” असा तिचा उपहासानं उल्लेख केला. “लहानपणी घडलेल्या त्रासदायक घटनांचा आयुष्यभर परिणाम राहतो, फक्त मानसन्मान लाभल्यानं मन:शांती लाभत नाही आणि स्वत:चं आयुष्य स्वत:ला नियंत्रित करता येत नाही,” असं विल यानं आत्मचरित्रात नमूद केलं आहे. आपल्या कुटुंबाचा लहानपणी समाजात उपहासानं आणि अनादरानं उल्लेख होणं हे विलला किती त्रास देत होतं, हेच त्याच्या ख्रिसला थप्पड मारण्याच्या प्रतिक्रियेतून दिसून आलं. विलनं या पुस्तकात आपण आयुष्यात सेक्स, दारू, संपत्ती, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यांच्यामागे कसे आणि किती हावरटासारखे धावलो याबद्दलही प्रांजळपणे लिहिलं आहे. त्याचा आक्रमक, रागीट स्वभाव याला कारण असू शकतो. रागामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे शारीरिक आणि चिंता, चिडचिड, वैताग, अस्वस्थता, ताण, नैराश्य असे मानसिक परिणाम रागीट माणसांवर होतच असतात. रागीट माणसं राग आल्यावर धूम्रपान करतात, दारू पिण्याचं त्यांचं प्रमाण वाढतं. तसेच रागाचे सामाजिक परिणामही तीव्र असतात. मनात सतत धुमसत असलेल्या रागामुळे आक्रमकता वाढते. अशा शत्रुत्वाची भावना सतत मनात बाळगलेल्या, खुनशी प्रवृत्तीच्या समाजात समाजविघातक कृत्यं किती वाढतात हे आपण रोजच्या बातम्यांमध्ये पाहतोय. एखाद्या क्षुल्लक वादावादीच्या प्रसंगामधून लोक एकमेकांचे जीव घेतात. राजकारणी, लोकप्रतिनिधी सभागृहात शारीरिक हिंसेपर्यंत पोहोचतात हे आपण सर्रास पाहतो. आक्रमक, रागीट स्वभावाच्या माणसांचे वैयक्तिक नातेसंबंध पणाला लागलेले असतात. त्यामुळे अशा रागीट माणसांचं प्रमाण वाढणं हे कुटुंबांच्या आणि पर्यायानं समाजाच्या आरोग्याला घातक ठरतं.

रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर “एखादा तसा वागला नसता ना, तर मी पण तसा वागला नसतो,” असं कारण सांगणं चुकीचं असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात. आपले विचार आणि वागणं याला आपणच कारण असतो. इतर लोक कसे वागतील यावर आपण कधीच नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण फक्त आपल्या प्रतिक्रियांवर आणि त्यातून आपल्या आयुष्यावरही नियंत्रण ठेवू शकतो. यासाठी आपल्या स्वत:कडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन, वेळ खर्च करून, स्वत:वर कष्ट घेऊन स्वत:ला बदलावं लागतं. ‘स्व’कडे कमालीच्या प्रामाणिकपणे पाहून आपल्या सर्व कृतींची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते. ही एकदा करून टाकायची प्रक्रिया नव्हे, तर दैनंदिन जीवनात वारंवार ते करत राहावं लागतं.

जो ‘विल” म्हणून जगायची आत्ताच्या विल स्मिथची इच्छा आहे, तिथपर्यंत तो पोहोचलेला नाही, हे त्याच्या माफीतून दिसतं. पण, ‘आय अॅम अ वर्क इन प्रोग्रेस’ या त्याच्या उद्गारांवरून, ‘आपल्यात सुधारणा व्हायला हवी’, हे कळणं ही कोणत्याही सुधारणेची पहिली पायरी असते. आणि हे प्रत्येकानंच लक्षात घ्यायला हवं..!

बातम्या आणखी आहेत...