आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • 'Wise' Boys Supporting 'crazy' Girls... | Article By Ravindra Rukhmini Pandharinath

‘परग्रहा’वरून पत्र:‘वेड्या’ मुलींना साथ देणारी ‘शहाणी’ मुले...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, ‘व्हॉट्स अॅप’ला कोणीतरी ‘कायप्पा’ असा मराठी शब्द सुचवलाय. तो मला खूप आवडला. हे माध्यम म्हणजे आपली पूर्वीची चावडी. मसालेदार मजकूर येथे हातोहात खपतो. पुरुषांचे स्त्रियांवरील शिळे/पाचकळ विनोद (म्हणजे पुरुष / नवरे कसे बिच्चारे आणि बायका कशा जहांबाज) इथे नेहमीच लोकप्रिय होतात, पण अलीकडे बायका या क्षेत्रातही उतरल्यात. त्यांनी प्रसवलेले विनोदही कायप्पावर दिसू लागलेत. त्यातला एक असा, ‘प्रत्येक यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुष दडलेला असतो– तिचे पाय ओढणारा...’ या विनोदामागे एक ठसठस आहे, मूकवेदना आहे. काय आहे ती वेदना? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक छोटा शोध घ्यायला सांगतो. गेल्या दोन शतकांतील स्वतंत्र कर्तबगार स्त्रियांची उदाहरणे आठवा (उत्तम पत्नी किंवा आदर्श माता सोडून). तुम्हाला काय दिसते? झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी आमोणकर, बेगम अख्तर इ. यातील सावित्रीबाईंचा अपवाद वगळला तर बाकीच्या सर्व एकल महिला आहेत. त्यांना पुरुषांची साथ लाभली नाही किंवा ती साथ सुटल्यानंतरही त्या आयुष्यात कर्तबगारी गाजवू शकल्या. म्हणूनच अशा गुणवान स्त्रियांनी एकतर विवाह केला नाही, केला असेल तर त्या विभक्त झाल्या किंवा पती निधनानंतर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. हे असं का घडतं? आपल्या समाजात स्त्रियांची भूमिका ही सातत्याने दुय्यम स्वरूपाची राहिली आहे. पुरुषाला पत्नी आणि माता म्हणून साथ देणे हे तिचे आद्य कर्तव्य. रांधा-वाढा-उष्टी काढा, पै-पाहुण्यांचा आदर-सत्कार करा, मुलांची उस्तवास्त करा ही तिच्या कामांची कधीही न संपणारी यादी. यातून वेळ मिळाला तर तिने कर्तबगारी गाजवावी. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. उलट त्यांत अनेक नव्या कामांची भर पडलीय. उदा. मुलांचा अभ्यास, बँकांची कामे, नव्या रेसिपी शिकणे, रोजचा प्रवास हे सर्व करून तिने नोकरी-व्यवसाय करून घराला हातभारही लावायला हवा. तो फक्त ‘हातभार’च असावा, हा दंडक. ती नवऱ्यापेक्षा जास्त कमवू लागली किंवा वरच्या पदावर गेली की घरोघरी ‘अभिमान’ चित्रपटाचे खेळ सुरू! स्त्रीने घरची कामे करू नयेत, असे कोणाचेच म्हणणे नाही. प्रश्न हा आहे की, ही सारी कामे तिने एकटीनेच का करायची? तिला एखाद्या क्षेत्रात अधिक भरीव काम करायचे असले, तर तिने काय करावे? मूल आजारी आहे म्हणून किशोर किंवा रफी गाण्याच्या रेकॉर्डिंगला येऊ शकला नाही, असे आपल्या वाचनात येत नाही. पण, अशा परिस्थितीत स्त्री कलाकारांचे किती मानसिक हाल होतात, हे त्यांच्या आत्मचरित्रांतून कळते. जिच्या मागे घराची आघाडी भक्कमपणे सांभाळू शकेल अशी आधारफळी उभी असते, अशीच स्त्री आज करियरचे मैदान गाजवू शकते, इतरांना विशेषत: तिच्या सोबतच्या इतर महिलांना ते सोडावे लागते. शेकडो स्त्रियांनी कुटुंबासाठी आवडत्या क्षेत्राला तिलांजली दिलीय. यशस्वी पतीच्या जीवनचरित्रातील एक तळटीप एवढाच त्यांचा उल्लेख. विवाहित स्त्रियांच्या चरित्रात मात्र माहेर-सासरच्या कुटुंबाने साह्य केल्यामुळेच मी येथवर पोहचू शकले, याचा ठायी-ठायी उल्लेख असतो. वैधव्याचा उत्सव : मातृसेवा संघ हे नाव तुमच्यापैकी अनेकांनी ऐकले असेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आणि आजही भक्कमपणे पाय रोवून काम करणाऱ्या तुरळक संस्थांपैकी ही एक. सुरक्षित प्रसूती आणि नवजात शिशुच्या आरोग्य रक्षणासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे घरोघरी असंख्य स्त्रिया व अर्भके मृत्युमुखी पडत असत, असा तो काळ. भारतीय स्त्रियांना ही सेवा उपलब्ध व्हावी म्हणून कमलाबाई होस्पेट या प्रशिक्षित परिचारिकेने १९२१ मध्ये नागपुरात या संस्थेची स्थापना केली आणि लवकरच तिच्या शाखा विविध राज्यांत विस्तारल्या. कमलाबाई या ‘पद्मश्री’चा बहुमान मिळवलेल्या भारतातील एकमेव परिचारिका आहेत. विलक्षण जिद्द, पराकोटीचा सेवाभाव आणि त्याचबरोबर माणसे जोडण्याची हातोटी, या गुणांच्या जोरावर त्यांनी स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली ही अभिनव संस्था जन्माला घालून नावारूपाला आणली. पण, हा झाला नंतरचा इतिहास. नागपूरची ही मुलगी लग्न करून कर्नाटकात गेली. सासरी छळ आणि थोड्याच काळात वैधव्य. सासरची मंडळी कर्मठ. त्यांनी तिच्या माहेरच्यांना कळवण्याची तसदीही न घेता तिच्या केशवपनाची तयारी केली. यापुढील सारे आयुष्य अंधाऱ्या खोलीत मान खाली घालून कंठायचे असेच तिला बजावण्यात आले. तिच्या सुदैवाने माहेरच्या लोकांना ही खबर लागली. तिचे भाऊ ठामपणे तिच्या बाजूने उभे राहिले. सासरच्या लोकांच्या धमकावणीला भीक न घालता ते तिला माहेरी घेऊन आले आणि त्यांनी तिला नर्सचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहित केले. संस्थेच्या उभारणीतही ते तिच्या मागे भक्कमपणे उभे होते. या कमलाबाईंनी एकदा म्हटले की, ‘वैधव्य ही लाज वाटण्याची बाब नाही; मला तर त्याचा उत्सव करावासा वाटतो.’ त्यांच्या या उद‌्गारामागे किती भळभळत्या जखमा असतील, याची कल्पनाच केलेली बरी. कमलाबाई एकल महिला होत्या. त्यांच्या मागे सासरचे नसले, तरी माहेरचे पुरुष साथ देण्यासाठी उभे होते. त्यांच्या कहाणीला शंभर वर्षे उलटून गेली आहेत. निदान आता तरी एखाद्या स्त्रीला यशोशिखर गाठण्यासाठी तिच्या माहेर-सासरची मंडळी, मुलं-बाळं कसोशीनं प्रयत्न करीत आहेत, हे चित्र समाजात प्रस्थापित व्हायला हरकत नाही. ते अपवाद ठरल्यास हुशार, गुणवान स्त्रिया ‘लग्नबंधनात अडकण्याचा मूर्खपणा’ न करता आपल्या स्वप्नांचा ध्यास घेण्यासाठी आयुष्यभर एकटे राहण्याचा निर्णय घेतील. हे चित्र आजच मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहे. परवाच एका शिबिरात मला एक तरुण मुलगी भेटली. तिला संरक्षण खात्यात गुप्तहेर म्हणून करियर करायचे आहे. अशा ‘वेड्या’ मुलींना साथ देण्याचा ‘शहाणपणा’ करणारी मुले पुढे येतील का, या प्रश्नाच्या उत्तरावर या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे. - सुंदर वेडेपणा करणाऱ्यांचा मित्र. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...