आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबघता बघता दोनच झाले, भाग उभ्या या आयुष्याचे हे वय आहे का करण्याचे? हे वय नाही हा करण्याचे!
आजच्या काळातील गझलकार म्हणून ज्या ओळखल्या जातात, त्या स्वाती शुक्ल यांच्या या दोन ओळी वाचनात आल्या आणि मनोमन पटल्या. जेव्हा जे जे करण्याची मनापासून इच्छा असते त्या त्या वेळी ते करता येत नाही आणि जेव्हा करू शकतो त्या वेळी त्या गोष्टीची आपल्या आयुष्यातील किंमत शून्य झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या मनातही अशा कितीतरी गोष्टी, लहानसहान स्वप्नं, आकांक्षा, आवडीनिवडी, हौसमौज करण्याच्या इच्छा-अपेक्षा दडलेल्या असतात. कधी पुरेशा पैशाअभावी, कधी वेळेअभावी, कधी पर्यायाअभावी, तर कधी निर्णयस्वातंत्र्य नसल्याने आणि परावलंबित्वामुळे या सर्व सुप्त इच्छांना तिलांजली दिली जाते.
शहरी असो किंवा ग्रामीण, अशिक्षित असो वा सुशिक्षित; कोणत्याही घटकातील स्त्री याला अपवाद नाही. हो, काळापरत्वे तिच्या इच्छा, स्वप्ने यात बदल निश्चितच झाले आहेत, पण मनाला मुरड घालून तडजोड करण्याची परिस्थिती मात्र आजही तशीच कायम असल्याचे दिसते. पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्री शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती, चार भिंतीत सीमित असलेले ‘चूल आणि मूल’ इथवरच आयुष्याची इतिकर्तव्यता मानली गेलेली, असे स्त्री जीवन असह्य होऊ लागले तेव्हा त्याकाळच्या स्त्रीलादेखील घरचा उंबरा ओलांडून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची गरज भासली. परंतु, समाजाचे नियम, कुटुंबाच्या चालीरीती यात ती अडकून राहिली. स्वतःचे मत ठामपणे मांडणे, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या आवडीने जगणे, कोणता पेहराव करायचा, स्वतःचे राहणीमान कसे असावे, या मूलभूत गोष्टींपासून तेव्हाची स्त्री वंचित राहिली.
माहेरी असताना व्यक्त केलेल्या इच्छांसाठी तिला,‘नवऱ्याच्या घरी गेल्यावर जे करायचे ते कर, इथे हे काही चालणार नाही’ असे ऐकावे लागते, तर लग्नानंतर सासरीसुद्धा, ‘आमच्याकडे हे असलं काही चालत नाही’ हे वाक्य ऐकवून तिला तिच्या इच्छा मारण्यास प्रवृत्त केले जाते. मग सासरच्या रीतीभाती, परंपरा हे सांभाळताना तिने मनात जपलेली सर्व स्वप्ने पुन्हा धुळीला मिळतात. काळ बदलला. स्त्री शिक्षित झाली, तरी याबाबतीत आता आजकालच्या काळातही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच राहिली आहे. पेहराव, राहणीमान याबाबतीत मुलींना थोडेफार स्वातंत्र्य असले, तरी निर्णयस्वातंत्र्य हा मुद्दा ऐरणीवर आहेच. मनासारखे जगणे, शिक्षण, नोकरी करणे या सर्व गोष्टी आजच्या स्त्रीला करता येत असल्या, तरी स्वअर्जित कमाईच्या विनियोगाबाबत मात्र तिला मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. ‘तुला हवे ते शिक्षण दिले, नोकरीही करू देतोय, आता सगळ्या जबाबदाऱ्या तू पार पाड’ असा कुटुंबाचा दृष्टिकोन असल्याचे समाजात दिसते. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अशा कितीतरी घटना आहेत, गोष्टी आहेत, जिथे आपल्या मनाला हवा तो, हवा तसा निर्णय घेण्याचे स्त्रीला स्वातंत्र्य मिळत नाही. लग्न करताना, समोर आलेल्या स्थळाला होकार - नकार देतानाही तिला आजूबाजूच्या आपल्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचा शंभर वेळा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. जिला गृहिणी बनून घरी राहायचे असते, पण तिला नोकरी करणे भाग पडते, जिला नोकरी करायची असते, करिअर करायचे असते तिला घरीच गृहिणी बनून राहावे लागते. जिला लांबसडक केसांची आवड आहे, तिला केवळ नवऱ्याला आवडत नाही म्हणून केस कापावे लागतात आणि जिला अजिबात मोठे केस आवडत नाहीत, तिला बळजबरीने केस कापायचे नाहीत, असे सांगून स्वतःविषयीचा हादेखील निर्णय घेता येत नाही. हीच गत खाण्यापिण्याच्या बाबतीत आहे. ही परिस्थिती शहरी, ग्रामीण दोन्ही ठिकाणी पाहायला मिळते. समाजातील विचारप्रवाहांमध्ये बदल, सुधारणा होत आहेत, पण त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. मुलींचे लग्न ठरवण्याच्या बाबतीत आज समाजात उद्भवत असलेली परिस्थिती हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यावर पुढील लेखात विस्तृत मुद्देसूद विवेचन करीनच!
अशा किती लहानमोठ्या गोष्टी, स्वप्ने, इच्छा सांगायच्या? अगणित..! कोणी म्हणतील, या गोष्टी क्षुल्लक आहेत. पण खरंच, प्रत्येकीच्या आयुष्यात त्या त्या आयुष्याच्या वळणावर या सर्व गोष्टी मन हळवे करणाऱ्या असतात. मनावर एकदा उमटलेले नकाराचे व्रण जन्मभर कायम राहतात. आपल्या आयुष्याचे निर्णय मनाप्रमाणे न घेता आल्याने आपल्या मनावर उमटलेले दुःखाचे ओरखडे स्वतःच्याच अश्रूंची फुंकर घालून मिटवणाऱ्या त्या तुमच्याच आजूबाजूला असणाऱ्या स्त्रीचे मन आता तरी ओळखूया आणि तिला मन भरून, हृदय भरून मनाप्रमाणे मोकळा श्वास घेण्याचा निर्णय घेता यावा, यासाठी नक्की मदत करूया. { संपर्क : 9320441116
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.