आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी, विविध आयोजनांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत प्रगतिपथावर असलेल्या देशाच्या विकासाचा दृश्य आढावा आपल्याला प्रोत्साहित करतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास आजची विस्मित करणारी प्रगती, आमूलाग्र बदल आपल्याला सुखावतात. अजोड बुद्धिमत्ता, अथक परिश्रम आिण अपार जिद्दीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले आदराचे स्थान, शक्तिशाली देशाचा मान भारताला लाभला आहे. अशा काळात देशातील विकासाची खरी स्थिती काय आहे? संपूर्णपणे विकसित राष्ट्र बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल, याचा सूत्रबद्ध आराखडा बनवून सुनियोजित पद्धतीने शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी तीव्र समस्या असतील अशा विविध कार्यक्रमांचा अग्रक्रम ठरवून त्या क्षेत्रास विशेष प्राधान्य देत विकासाचे शिखर गाठावे लागेल. या नवराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सर्वांना आपापल्या परीने योगदान द्यावे लागेल. कौटिल्याच्या काळापासून “प्रज्ञा सुखे सुखं राज्ञ:| प्रज्ञानाम च हिते हित्ं|’ ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आहे. प्रजेच्या सुखात राज्यकर्त्यांचे सुख, प्रजेच्या हितात राज्याचे हित, अर्थात प्रजेचे कल्याण सर्वोपरी मानण्यात वचनबद्धता पाळण्यात आलीय. कालमानानुसार परिस्थिती बदलली. औद्योगिक क्रांतीनंतर हळूहळू कल्याणकारी संकल्पनेचा उदय होऊन त्यानुसार सर्वांचा सर्वांगीण चतुर्मुखी विकास ही शासनकर्त्याची जबाबदारी झाली आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. या पुढचा टप्पा विकसित राज्याचा. त्या अंतर्गत जेव्हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा; मग ती स्त्री असो वा पुरुष, तृतीयपंथी, बालक, तरूण, वृद्ध, दिव्यांग, दलित, पीडित, वंचित अशा विविध घटकांतील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास झालेला असेल. प्रत्येकाला शिक्षण, रोजगार, राेगराईमुक्त जीवन मिळेल. लोकसंख्या नियंत्रणात असेल, दारिद्रयरेषेखाली कोणीही नसेल, सर्वांना आवश्यक स्वास्थ्य सुविधा मिळतील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यात शांतता व सुरक्षितता नांदेल. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य, समान अधिकार प्राप्त असतील, तेव्हाच एखादे राष्ट्र सक्षम आणि विकसित राष्ट्र म्हणवू शकेल. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र संरक्षणाचा विकास, प्रभावी प्रशासन, पायाभूत संरचना यासारख्या अनेक क्षेत्रातील निगडित विविध पैलूंचा सर्वांगीण विकास, ही विकासाची प्रमुख परिमाणे आहेत. आज आपण विकसनशीलतेच्या पायरीवर आहोत आणि विकसित दर्जा मिळवण्याच्या स्थित्यंतरात संक्रमणाच्या विशिष्ट टप्प्यावर आहोत. विकासाचा शेवटचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे.
या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीचे अवलोकन, परीक्षण केले असता अनेक विषय गतिप्राप्तीसाठी प्रलंबित आहेत. ज्या विषयांना प्राधान्याच्या यादीत अग्रक्रम मिळणे अत्यंत आवश्यक, अनिवार्य आहे, त्यापैकी महिला सबलीकरणाचा विषय प्राथमिकतेने हाताळणे ही काळाची गरज आहे. १३९ कोटी लोकसंख्येच्या देशात ५१.९६ टक्के पुरुष आणि ४८.०४ टक्के स्त्रिया आहेत. परंपरागत रूढीवादी, पुरुषप्रधान भारतीय समाजाच्या मानसिकता झपाट्याने बदलत असून, पूर्वीची चूल आणि मूल ही स्त्रियांची भूमिका मागे पडली आहे. सर्वच क्षेत्रांत स्त्रिया अग्रेसर आहेत. सक्रिय, यशस्वी आहेत. मग त्या डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए किंवा आकाशाला गवसणी घालणाऱ्या वैमानिक वा संपूर्ण जगाला बोटीवरून प्रदक्षिणा घालणाऱ्या साहसी समुद्र तारिणी असोत; राजकीय नेत्या, सनदी अधिकारी, कार्पोरेट विश्वातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओ असोत की आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पदके मिळवून देत देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडू असोत... मोठ्या प्रमाणावर कार्यरत प्रशासक महिला, सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या वा स्वयंसेवी संस्थांमार्फत सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या असोत... प्रत्येक ठिकाणी महिला आपापला मोर्चा सक्षमपणे आणि यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. म्हणजेच त्यांच्यात नेतृत्वगुणांची, कौशल्याची, ज्ञानाची कमतरता नाही. परंतु, अशा उच्चपदासीन महिला किती आहेत? फारच कमी. त्यांचे प्रमाण पाहिले तर आपण अचंबित होतो. ४८ टक्क्यांपैकी एवढ्या मोठ्या स्तरावर किती पोहोचतात? वंचित महिलांनाही संधी मिळणे आवश्यक आहे, परंतु यासाठी त्यांना प्रशिक्षित करून, त्यांचे सबलीकरण करणे ही पहिली पायरी असेल. मग अशा साऱ्या महिलांचे सबलीकरण कसे व्हायला हवे? त्यात कोणत्या बाबींचा समावेश असावा? सबलीकरणाचे विविध परिमाण, पैलू काय असावेत? महिलांच्या सबलीकरणाची दशा मांडतानाच पुढची दिशा निश्चित करण्यासाठी, समाजाच्या विकासात त्यांचा सहभाग, योगदान वाढवण्यासाठी नेमके काय करावे? एवढ्या मोठ्या वर्क फोर्सला निष्क्रिय ठेवण्याने राष्ट्राचे अपरिमित नुकसान होईल. ते टाळण्यासाठी काय करता येईल? या आणि अशा मुद्द्यांचा वेध या सदरातून आपण घेणार आहोत.
संपर्क : ९८२२२३१०७६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.