आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासो सायटीत महिला दिन साजरा करायचं ठरलं होतं. खरं सांगू का, मला ह्या महिला दिनाचं काही विशेष वाटत नाही. तसे वर्षाचे ३६५ दिवस आपलेच असतात की! असा एकच दिवस साजरा करून काय मिळणारंय? पण म्हटलं ‘व्हॅलेंटाइन डे’सारखं सगळ्याच गोष्टींना असं मोडीत काढायला नको. नव्या गोष्टींचं स्वागत करावं. महिला दिनाचा कार्यक्रम काय करावा, यावर बराच खल झाला. कुणीतरी म्हणालं, आपण ‘फॅशन शो’ करूया. अगदी रीतसर रॅम्प वॉक वगैरे. पण, त्यासाठी नवे कपडे लागतील आणि एवढ्या कमी वेळात मनासारखी खरेदी करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर तो विषय मागे पडला.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला बोलावून त्यांचे विचार ऐकूया, असाही प्रस्ताव आला. आमच्या गॉसिप काकू-म्हणजे विमलाकाकूंनी कुणाचं नाव सुचवलं असेल? कंगना रनौटचं! तिची झाशीची राणी बघितल्यापासून त्या भलत्याच प्रभावित झालेल्या. त्यांनी हे नाव घेतल्यावर सोसायटीच्या मीटिंगमध्ये काही क्षण शांतता पसरली. एकदम पिनड्रॉप सायलेन्स का काय म्हणतात तो. तेवढ्यात आमच्या सौदामिनी काकूंची केसांची पिन खाली पडली आणि आवाज झाला, तेव्हा सगळे भानावर आले. मंडळातल्याच डाव्या बाजूला बसलेल्या कुणीतरी त्यांना कंगनाचा शूटिंगच्या वेळी खोट्या घोड्यावर बसून लढाई करतानाचा व्हिडिओ पाठवला आणि गॉसिप काकूंचा चेहरा एकदम उतरलाच. मग अमृताताई, सुप्रियाताई, रूपालीताई अशी नावं पुढं आली. पण, कुठल्याच नावावर शिक्कामोर्तब होईना. तेव्हा कार्यक्रम करू, पाहुण्यांचं नंतर बघू, असं ठरलं आणि मीटिंग संपली. घरीही महिला दिनाची चर्चा आठ दिवस आधीच सुरू झाली होती. घरातल्या महिलांसाठी (म्हणजे मी आणि स्वाती!) विशेष काहीतरी केलं पाहिजे, असं ह्यांनी सुचवलं. त्यावर रोहन म्हणाला, यापैकी ‘महिला’ म्हणावी अशी फक्त आईच आहे. कारण दिवसाच्या कुठल्याही वेळी घोरत पडणाऱ्या, मुंबईत लोकलसाठी दोन मिनिटं आधी प्लॅटफॉर्मवर एकदम माणसं जमतात तशी जेवणाच्या दोन मिनिटं आधी एकदम कुठून तरी प्रकट होणाऱ्या व्यक्तीला ‘महिला’ म्हणता येणार नाही. यावरून स्वाती अशी भडकली की विचारू नका! दोघं एकमेकांच्या अंगावर काहीतरी फेकतील आणि स्वातीचा हमखास नेम चुकून घरातली एखादी काचेची वस्तू फुटण्याची मला काळजी. त्यामुळे मीच मध्ये पडून भांडण सोडवलं. महिला दिनाला आपल्याला सगळ्या कामाला सुट्टी मिळणार, या आनंदात आधीचे दोन दिवस जरा जास्तच उत्साहानं काम झालं. रविवारची सुटी, त्यानंतर होळीचा दिवस आणि आज धुळवड. सलग तीन दिवस धामधुमीचे. सगळा रविवार पुरणपोळ्यांच्या तयारीत गेला. संध्याकाळी मुलांनी होळीच्या तयारीसाठी लाकडं वगैरे गोळा करायची टूम काढली. मग लाकडं न जाळता घरातल्या वापरात नसलेल्या वस्तू जाळून प्रतिकात्मक होळी करू, असं कुणीतरी सुचवलं. मी मुलांचं कपाट उघडायला गेले, तर दोघंही अचानक धावत आली. त्यांना वाटलं, मी कपाटातले, ते वापरत नसलेले कपडे होळीसाठी देतेय की काय! होळीला रात्री सगळ्यांनी एवढी धमाल केली की झोपायला उशीर झाला. सकाळी उठून बघते तर काय! आमच्या ह्यांनी पोहे तयार केले होतेे, स्वातीने चहा, रोहनने कुकर लावला होता. मला भरूनच आलं. रोज सगळ्यांनी समजून घेऊन एवढं केलं ना, तर आणखी काय हवं? चला, माझ्यासाठी ‘महिला दिन’ एक दिवस आधीच साजरा झाला होता!
{ संपर्क : ९८८१०९८०७०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.