आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Womens Day Special Sabir Solapuri Rasik Article : The Woman consciousness In The Ghazal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला दिन विशेष:गझलेतील स्त्री-जाणिवा

एका महिन्यापूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

आज महिला गझलकारही मराठीत मोठ्या संख्येनं तंत्रशुद्ध गझला लिहू लागल्यात. त्यांनी सोसलेल्या, भोगलेल्या, अनुभवलेल्या सामाजिक जाणिवा त्यांच्या गझलांमधून प्रत्ययकारी शब्दातून त्या मांडू लागल्यात. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला गझलकारांचे शेर रसग्रहणासाठी घेणं औचित्यपूर्ण ठरेल.

कालची स्त्री रुढी परंपरेच्या शृंखलेत अडकलेली होती. परंतु आजची स्त्री ही शिक्षण घेऊन मोठ्या आत्मविश्वासानं वावरताना दिसतेय. विचारांच्या आकाशात भरारी मारू लागलीय. त्यामुळं अनेकानेक क्षेत्रात तिनं धडाडीनं अन् शिक्षणाच्या बळावर कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवलाय. स्त्री साक्षरतेचं हे आजचं चित्र खचितच लक्ष वेधणारं आहे. स्त्रियांमध्ये काळानुरूप बदलण्याचं मोठं सामर्थ्य सामावलंय हेच यावरून सिद्ध होतंय.

गझल हा भावभावनांच्या प्रकटीकरणाचं एक शक्तिशाली माध्यम आहे. परंतु गझल हा काव्यप्रकार सहज साध्य नाही. त्याच्या आकृतिबंधाचा, तंत्राचा सर्व बारकाव्यानिशी अभ्यास करावा लागतो. 'अभ्यासो नि प्रकटावे' असा हा काव्यप्रकार आहे. आज स्त्री गझलकारही मराठीत मोठ्या संख्येनं तंत्रशुद्ध गझला लिहू लागल्यात. त्यांनी सोसलेल्या, भोगलेल्या, अनुभवलेल्या सामाजिक जाणिवा त्यांच्या गझलांमधून प्रत्ययकारी शब्दातून त्या मांडू लागल्यात. एकुणात महिला गझलकारांच्या गझलांमध्ये दुनियादारीचं आकलन आहे. जगणं समजून घेणं आहे. केवळ स्त्री भूमिकेतून आकांडतांडव करून पुरुषांना हिणवण्याचा खटाटोप नाही. त्याच्या अभिव्यक्तीला स्त्रीच्या विविध भावरूप छटांची किनार आहे. त्यांची प्रतिभा नुसती स्वप्नरंजनाच्या बागेत नाही बागडत तर वास्तवाचा ठाव घेते. ही निर्भयता नाशिक येथे पार पडलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी यांच्या या शेरातून अभिव्यक्त होताना दिसून येते.

एकटी स्त्री आजला रस्त्यात आली

कांकणे केलीत काळाच्या हवाली

स्त्रीनं चार भिंतीतच आपलं आयुष्य कंठावं तिनं घराबाहेर पडूच नये. अशी तरतूद व्यवस्थेनं करून ठेवली होती. घर अन् काबाडकष्ट या चक्रात अडकलेल्या स्त्रियाच्या अंगी असलेले कितिक कलागुण बरबाद होऊन गेले. संसाराच्या ओझ्याखाली तिला दाबून ठेवल्यामुळं भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशी सर्व तऱ्हेनं तिची कुचंबणा झाली. उडण्यापूर्वीच तिचे पंख छाटून ठेवण्यात आले. चोहीकडून तिची कोंडी करून ठेवण्यात आली होती. पुरुषांचा मात्र जगभर मुक्तपणे वावर होता. यावर आशा पांडे म्हणतात.

काय प्रश्न हा तुझा हारले कशास मी

धावलास तू जगी मी घरात राहिले

स्त्रीचं जगणं म्हणजे विस्तवाशी उभं खेळ मांडणं असतं. वेदनेला कवटाळण्यात, दुःखाला गोंजारण्यात आसवं ढाळत बसण्यात फारसा अर्थ नसतो. हे तिला पुरतं उमगतं. पराभवाची पर्वा न करता चेहऱ्यावर हसू फुलवत या जगात जगावं लागतं. ही तिची सोशिकता असते. जगण्याशी केलेली तडजोड असते. सोसणं अंगवळणी पडलं की हार पचवूनही हासता येतं. ही ताकद स्त्रियांच्या ठायी ओतप्रोत असते. मराठी साहित्यातील पहिल्या महिला बालगझलकार शोभा तेलंग यांनी त्यांच्या शेरातून स्त्रीजीवनाच्या पराजयाची कहाणी मांडलीय.

विस्तवाशी खेळले मी कालपावेतो जरी

आजला, माझ्यासवे मी हारते आहेच ना!

मातेचं अंतःकरण आकाशासारखं उत्तुंग असतं. तिची ममता सागरासारखी अथांग असते. ऊन्हाचं दुःख सोसतानाही ती मुलांसाठी सुखाची सावली होते. ती त्यांच्या चुका पोटात घेते. लेकरांना माफ करणं हाच त्या माऊलीचा धर्म असतो. ती विलक्षण सोशिक असते. घरादारासाठी तिला कितीतरी गोष्टींचा त्याग करत जगावं लागतं परंतु याची ती कुठं वाच्यता नाही करत. पनवेल येथे संपन्न झालेल्या अकराव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. फातिमा मुजावर यांचा शेर याच गोष्टीची साक्ष देतो.

सहाया ऊन्ह दुःखाचे सुखाची सावली झाले

चुकांना माफ करणारी अशी मी माऊली झाले

बाई असल्याचं अभिमानानं सांगणं हे आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. बाईपणाचा गौरव जगानं करायलाच हवा. कारण कित्येक महापुरुषांची, युगकर्त्यांची मुळं तिच्या गर्भातूनच अंकुरली, फुलली. पुढं त्यांनी इतिहास घडविला. राजमाता जिजामाता यांनी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जाणता राजा दिला. त्यामुळंच तर स्वराज्याची स्थापना होऊ शकली. संस्कारांनं आपल्या मुलांना घडविणाऱ्या मातांची कितीतरी उदाहरणं आहेत. सुनंदा शेळके यांनाही बाई असल्याचा अभिमान वाटतो.

अभिमानाने सांगत असते बाई आहे

युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे

कालच्या स्त्रीच्या तुलनेत आजची स्त्री अधिक कणखर आहे. हे तिला पक्कं ठाऊक असलं तरी भूतकाळात सोसलेल्या जाच जुलमाचा सल तिच्या मनात घर करून असतोच. जगण्याला सामोरं जाताना तिची पावलं आणखी दमदारपणे पडतात. गावात जे काही माझ्या वाट्याला आलं होतं ते मी मागचं सारं सोसून टाकलंय. आता मी वेदनेच्या अंगणाची पाहुणी अजिबात होऊ नाही शकत. असं ती धीटपणे सांगतेय. शेरातून मांडतेय. तिच्यातली कणखरता, तिची स्पष्टता बिनधोकपणे ती काळाच्या पटलावर नोंदवतेय. आता काळ बदललंय या नव्या भानाची जाणीव ती समाजाबरोबर काळालाही करून देतेय. आत्मभान जागृत झालं की उषेची नवी पहाट दिसू लागते. नीता भिसे यांनी गाववाल्यांना नेमकी हीच जाणीव करून दिलीय.

वेदनांच्या अंगणाची पाहुणी नाहीच मी ही…

राहुनी गावात ह्या मी पाहिले मागेच होते!

आजची स्त्री शिकलीय् सुधारलीय पुढारलीय तरीही तिच्यावरील अन्याय अत्याचाराची मालिका थांबलेली नाही. काळ कोणताही असो. स्त्रीवर अन्याय ठरलेलाच असतो. आजच्या काळात तर उमलण्यापूर्वीच कळी खुडली जाते. ही माणुसकीचीच हत्या असते. ज्योती बालिगा-राव यांनी महिलांवरील अत्याचार तसेच स्त्रीभ्रूण हत्या या दोन्ही घटनांकडं लक्ष वेधलंय.

मागुन मीही पाहिला दाही दिशांना आसरा

नाराजही होती धरा, आभाळ फाटले होते

राज्यघटनेनं महिलांमध्ये आत्मसन्मानाची भावना रुजवली. त्यांच्यात स्वाभिमान जागवलं. कणखर बाण्यानं, ताठ मानेनं कसं जगायचं हे शिकवलं. त्याच बरोबर त्यांना समानतेची जाणीव करून दिली. स्त्री लाचार किंवा कमकुवत नाही तर ती सक्षम आहे अबला नाही तर सबला आहे. हेही सांगितलं म्हणूनच आजच्या स्त्रिया रोजच्या जगण्याच्या संघर्षात हार नाही मानत. नोकरी सांभाळूनही ती कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलते. अशी स्त्रीच घराचा मुलाधार असते. श्रम करण्याच्या मनोवृत्तीमुळं स्त्री सक्षम बनत गेली. ही तिची सक्षमता अनन्यसाधारण आहे. हा वेदनेचा प्रवास असला तरी त्याला उंची देणारा शेर डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी लिहिलंय

खाल मानेने कुणाचा घेतला आधार नाही

वेदना उंची मनाची एवढी लाचार नाही

आशय, विषय अन् मांडणी या तिन्ही अंगांनी वरील शेर वेगळेपण दर्शवितात. अनुभव आशेचा असो वा निराशेचा, दुःखाचा असो वा आनंदाचा त्यातील भाव उत्कटतेने प्रकट होत जातो. महिला गझलकारांनी गझलेतून आपल्या जाणिवा अभिव्यक्त करून मराठी गझलेचा परीघ विस्तीर्ण केलाय. हे खरंय.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...