आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा:भविष्याला आकार देणारा वाचनवेडा संशोधक : इलॉन मस्क

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नकळत्या वयात पुस्तकं त्याच्या आयुष्यात आली आणि आयुष्याचा अविभाज्य अंग झाली

खूप कमी वयात इलॉनच्या हाती पुस्तकं पडली आणि तो एका संमोहित करणाऱ्या जगात हरवू लागला. वाचताना तो तहानभूक विसरायचा. एखाद्या नव्या विषयावरचं पुस्तक दिसलं की, कधी एकदा ते वाचेन असं त्याला व्हायचं. इलॉनची पुस्तकांशी मैत्री नाही, तर चक्क आयुष्यभरासाठी गाठ बांधली गेली. तो दिवसाला दहा-दहा तास केवळ वाचनात घालवायचा. त्याची बौद्धिक भूक ना पालक भागवू शकायचे, ना मित्र. फक्त उत्तमोत्तम पुस्तकंच त्याची ही भूक भागवायला समर्थ असायची. मस्क कुटुंबीय कधी शॉपिंगसाठी बाहेर पडले की, इलॉन हळूच एखाद्या पुस्तकांच्या दुकानाकडे आपला मोर्चा वळवायचा आणि तासन‌्तास पुस्तकांचा फडशा पाडायचा. मग त्याच्या भावंडांना त्याला शोधावं लागायचं. असं कधी तरी नव्हे, कायमच व्हायचं. सुटीच्या दिवशी तर इलॉन दोन-तीन पुस्तकं वाचून संपवायचा. माहितीपर, विज्ञानविषयक, कथा, कादंबऱ्या, कॉमिक्स आणि ज्ञानकोश अशा विविध प्रकारातलं त्यानं केलेलं वाचन त्याला समृद्ध तर करत होतंच; शिवाय त्याच्या मनात काही नवे प्रश्न उभारत होतं. मग ही जिज्ञासा शमवण्यासाठी इलॉन पुन्हा नव्या ग्रंथांच्या शोधात असायचा.

आजही इलॉन पुस्तकांच्या प्रेमात आहे. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ इलॉनचं आवडतं पुस्तक. आयझॅक असिमोव्हची फाउंडेशन सिरीज इलॉनला सर्वोत्तम पुस्तकांची शंृखला वाटते. या दोन पुस्तकांनी इलॉनच्या मनात एक बीज पेरलं. आपण या विश्वाची सेवा केली पाहिजे हा बीजविचार इलॉनच्या मनात रूजवण्यास ही दोन पुस्तकं कारणीभूत ठरली. रॉबर्ट हाईनलिनचं ‘द मून इज अ हार्श मिस्ट्रेस’ आणि ‘स्ट्रेंजर्स इन अ स्ट्रेंज लॅण्ड’ ही पुस्तकं त्याला आजही खूप आवडतात. स्ट्रक्चरल डिझाइन या विषयावरचं ‘स्ट्रक्चर्स : ऑर व्हाय थिंग्ज डोन्ट फॉल डाऊन’ हे पुस्तक त्याच्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. वॉल्टर आयझॅक्सन या जगद्विख्यात लेखकाचा इलॉनच्या जीवनावर खूप सखोल प्रभाव आहे. वॉल्टर आयझॅक्सन लिखित ‘बेंजामिन फ्रँकलिन : अ‍ॅन अमेरिकन लाइफ’ आणि ‘आइनस्टाइन : हिज लाइफ अ‍ॅण्ड युनिव्हर्स’ ही चरित्रं इलॉनला आजही प्रेरणादायी वाटतात. इलॉनच्या आयुष्याला वळण देणाऱ्या एका पुस्तकाचा उल्लेख तो अनेकदा करत असतो. इलॉन त्यावेळी १४-१५ वर्षांचा असावा. किशोरावस्था हा आयुष्याचा नाजूक टप्पा असतो. तनामनात होणारे बदल सैरभर करत असतात. स्वतःच्या शरीरात होणारे बदल, मनात उसळणाऱ्या भावना आणि एकूणच आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची तळमळ या वयात असते. आयुष्याचं नेमकं प्रयोजन काय, मी या प।ृथ्वीवर कोणत्या उद्देशाने आलोय, जीवनाचा अर्थ काय अशा अनेक प्रश्नांनी इलॉनच्या मनात काहूर माजलं होतं. तो स्वतःची ओळख शोधत होता. अदृश्यातील सूर त्याला खुणावत होते, पण लय मात्र गवसत नव्हती.

इलॉन या आतल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुस्तकांत हरवून गेला. तो धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांकडेही वळला. पण त्यातील फोलपणा त्याच्या लवकरच लक्षात आला. हा स्व-शोधाचा आणि विश्वशोधाचा प्रवास सुरू असताना त्याच्या हाती डग्लस अ‍ॅडम्सचं “द हिचहायकर्स गाइड टू द गॅलक्सी’ हे पुस्तक पडलं अन् त्याला काहीतरी गवसल्यासारखं वाटू लागलं. त्याला या पुस्तकातून सकारात्मक ऊर्जा मिळाली. त्याला या पुस्तकातून एक अत्यंत महत्त्वाची शिकवण मिळाली, जी त्याला आजही सुखावून जाते - आयुष्यात उत्तरं शोधण्यापेक्षा आधी योग्य प्रश्न पडायला हवेत आणि तुम्हाला योग्यप्रकारे प्रश्न मांडता यायला हवा. मग त्याचं उत्तर शोधणं खूप सोपं होतं. विश्वाचा पसारा पाहताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात; पण त्या सर्वांतून एक प्रश्न मांडायचा झाला तर तो असेल : जीवनाचा अर्थ काय आहे? आपल्या जाणिवेची आणि ज्ञानाची व्याप्ती आपण वाढवायला हवी, हेच इलॉनला त्यावरचं उत्तर वाटतं. पुस्तकं इलॉनच्या जीवनाला आजही समृद्ध करताहेत. रॉकेट-सायन्सविषयी त्याला भावलेलं पुस्तक म्हणजे जॉन डी. क्लार्क लिखित “इग्निशन’. पुस्तक हातात असलं की इलॉनची ब्रह्मानंदी टाळी लागते. पुस्तकं माणसाचं मस्तक घडवतात. इलॉनचं मस्तक पुस्तकांनीच घडत होतं. त्याच्या तल्लख मेंदूत कल्पनांची भरारी घेण्यासाठी ग्रंथांचे पंख उपयोगी पडत होते. तप्त वाळवंटात पायपीट करणाऱ्या वाटसरूच्या हातात अचानक शीतल पेयाचा प्याला यावा आणि त्याची तहान शमावी, तसे त्याच्या आयुष्यात पुस्तकांचे प्याले आले. त्याची ज्ञानलालसा तृप्त करू लागले.

इलॉन स्वतःला पुस्तकात शोधायचा आणि तो हरवायचाही केवळ पुस्तकांतच. त्याच्या मनाची तावदानं खुली झाली होती आणि त्याच्यातला संशोधक घडत होता तोही पुस्तकांमुळे. ग्रंथालय ही इलॉनच्या आयुष्याची कार्यशाळा होती. आज इलॉनला अख्खं जग रॉकेटमॅन म्हणून ओळखतं. इलॉन म्हणतो, “मी रॉकेट निर्मिती करू शकलो कारण मी पुस्तकं वाचतो.’ एका मुलाखतीत तर इलॉन म्हणतो, “मी पुस्तकं केवळ वाचत नाही तर अक्षरशः खातो, त्यांचा फडशा पाडतो.’ इलॉनचं हे वाचनवेड सर्वांनीच आणि विशेषतः स्मार्ट फोनच्या व मल्टी स्क्रीनच्या जगात हरवलेल्या तरुणाईने कित्ता गिरवावा असेच आहे.

इलॉन मस्क हे जागतिक संशोधनजगतात चर्चेत असणारं नाव. पेपाल, टेस्ला मोटर्स, स्पेस एक्स आणि सोलरसिटी यांच्या माध्यमातून मानवजातीच्या भविष्याला आकार देणाऱ्या या अवलिया संशोधकाच्या यशाची बीजं रुजली आहेत ती त्याच्या वाचनवेडात. नकळत्या वयात पुस्तकं आयुष्यात आली आणि अविभाज्य अंग झाली. आजही ताे पुस्तकांत दंग होतो. इलॉनच्या मते, आपल्याला योग्य प्रश्न तेव्हाच पडतात जेव्हा आपण सकस साहित्य वाचतो...

बातम्या आणखी आहेत...