आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या झोपडीत माझ्या..:लेखन हाच ध्यास-श्वास

डॉ. ऋता देशमुख-खापर्डे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ युष्याच्या वळणावर अशी एखादी व्यक्ती भेटते की, तिच्या क्षणिक सहवासानं आपलं अवघं आयुष्य ही पंढरीची वारी होऊन जातं. त्यांच्याबद्दल नेमक्या शब्दांत लिहिणं फार अवघड असतं. साहित्याच्या क्षेत्रात तेजानं तळपणाऱ्या आणि स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अशाच एका ताऱ्याचे नाव शुभांगी भडभडे. त्यांच्या कथा तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांतून प्रकाशित झाल्या आहेत. स्वामी विवेकानंद यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे प्रयोग देशभरात आणि दुबई, अमेरिकेतही झाले. या नाटकाचे आजवर एकूण १५१ प्रयोग झालेत. शुभांगी भडभडे यांना राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार म्हणून गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र तसेच पंजाब शासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्या अविरतपणे लिहीत आहेत. सुरुवातीला १७ वर्षे त्यांनी संपादनाचं काम केलं. नंतर २२ चरित्रपर कादंबऱ्या, २२ सामाजिक कादंबऱ्या, १० महानाट्ये, १० कथासंग्रह, १० किशोर साहित्यसंग्रह, ४ ललित लेखसंग्रह, २ प्रवासवर्णने अशी शुभांगीताईंनी एकूण ८१ पुस्तके लिहिली. एखाद्या मूर्तिकारानं तन्मयतेनं एकेक शिल्प कोरावं तसं अगदी सहजतेने त्यांनी हे लिखाण केले. सिद्धार्थ गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर महाराज, आद्य शंकराचार्य, डॉ. हेडगेवार, संत विनोबा भावे, शिवाजीराव पटवर्धन यांच्यावर आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही त्यांनी लिखाण केले आहे. सामाजिक कादंबऱ्या लिहिताना तर कुठले परिवर्तन करायचे हे ध्येय समोर ठेवून लिखाण केले. गोमाता, भूमाता, जलमाता, राष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी त्यांच्या बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी २८ उपाय सुचवले आहेत. विदर्भातील नागनिका या राणीबद्दल कुणीही लिहिलं नाही, पण शुभांगीताईंनी अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिलं आहे. पद्मगंधा प्रतिष्ठानाच्या वतीने शुभांगीताईंनी अनेकांना लिहायला बळ दिले असून, अनेक थोरामोठ्यांना सन्मानित केले आहे. यात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, बाबा आमटे, बाबासाहेब पुरंदरे, अॅड. उज्ज्वल निकम, लेफ्टनंट जनरल शेकटकर, सुनील गावसकर आणि अनेक मराठी साहित्यिकांना गौरवण्यात आले. शुभांगी भडभडे यांना अनेक नामांकित पुरस्कार मिळाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, त्यांची काही पुस्तके तर ३५० ते ४०० पानांची आहेत. प्रत्यक्ष भेट देऊन त्या तिथल्या ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करतात. अत्यंत सखोलता, सातत्य, संवादात्मकता, सजीवता, सोज्वळता आणि सालसता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच शुभांगीताईंचं लिखाण चिंतनशील आणि परिवर्तनाची कास धरणारं आहे. त्यांची पहाट लेखनाने सुरू होते. दुपारचा वेळ वाचनात आणि टिपणे घेण्यात जातो. एका एका विषयावर ३५ ते ४० संदर्भ ग्रंथ अभ्यासून त्या लिहितात. त्याशिवाय, पद्मगंधा प्रतिष्ठानचे काम, इतर सामाजिक कार्य आणि व्याख्याने यामध्ये त्या व्यग्र असतात. आज त्यांच्या ग्रंथसंपदेवर अनेक विद्यार्थ्यांनी एम. फिल. आणि अाचार्य ही पदवी मिळवली आहे. शुभांगीताई म्हणतात, “आद्य शंकराचार्य आणि आर्य चाणक्यांचे लिखाण शेकडो वर्षे झाली तरी आपण अभ्यासतो. माझी साहित्यातील सेवा पुढची पन्नास वर्षे तरी पुढे चालावी.’ नदी निरंतर वाहण्याचं काम करते. मार्गात येणाऱ्या अनेक अडथळ्यांना वळसा घालून पाण्यानं, प्रेमानं भिजवून ती पुढे वाहत जाते. असाच प्रवास शुभांगीताईंचा आहे. लेखन हाच त्यांचा ध्यास आणि श्वास. त्यांना लक्ष पाखरांच्या पंखाचं बळ आणि उदंड आयुष्य मिळो, याच शुभेच्छा..! {संपर्क : rutakhaparde@gmail.com