आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्ड आय:आभासी पडद्यावरचा ‘इफ्फी ‘

यशोधरा काटकर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी कोव्हिडच्या साथीमुळे पुढे ढकलला गेलेला भारताचा ५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'इफ्फी ' अलीकडेच गोव्यात पार पडला. 'इफ्फी ' च्या नेहमीच्या वारकऱ्यांना हा महोत्सव ह्या वर्षी प्रत्यक्ष आणि आभासी पडद्यावर अवतरल्यामुळे 'रिट्रोस्पेक्टिव्ह','वर्ल्ड सिनेमा','इंडियन पॅनोरामा' ते 'होमेज' मधल्या निवडक चित्रपटांचा आस्वाद घरबसल्या घेणे शक्य झाले झाल्याने दिलासा मिळाला.

गेल्या वर्षी कोव्हिडच्या साथीमुळे पुढे ढकलला गेलेला भारताचा ५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'इफ्फी ' अलीकडेच गोव्यात पार पडला. 'इफ्फी ' च्या नेहमीच्या वारकऱ्यांना हा महोत्सव ह्या वर्षी प्रत्यक्ष आणि आभासी पडद्यावर अवतरल्यामुळे 'रिट्रोस्पेक्टिव्ह' ,'वर्ल्ड सिनेमा','इंडियन पॅनोरामा' ते 'होमेज' मधल्या निवडक चित्रपटांचा आस्वाद घरबसल्या घेणे शक्य झाले झाल्याने दिलासा मिळाला. स्पॅनिश दिग्दर्शक पेड्रो अल्मुदॉचे 'बॅड एजुकेशन','व्हॉल्व्हर','लाईव्हफ्लेश', स्वीडिश दिग्दर्शक रूबेन ओस्तलुन्दचा 'फोर्स मेज्युअर', इराणच्या मसूद बक्षीचा 'येल्दा - ए नाइट फॉर फर्गिव्हनेस', संदीपकुमारचा ऑस्ट्रो -बॉलीवूडी 'मेहरुनिसा' हे चित्रपट इथे अवतरले.'कंट्री फोकस' मध्ये बांगलादेश असल्याने 'सिन्सीयरली युअर्स ढाका','जमाल्स स्टोरी‘,'जिबोनधूली','अल्फा' आणि 'फागुन हावे' मधून तिथल्या नव्या पिढीच्या सर्जनशीलतेचा प्रत्यय येत गेला. गोव्यातल्या महोत्सवी वातावरणात 'इफ्फी'चा आस्वाद घेणे हे काही औरच पण आभासी पडद्यावर अनुभवी आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांच्या नावाजल्या गेलेल्या तसेच नव्या पिढीची प्रयोगशीलता प्रतिबिंबित झालेल्या कलाकृतींचा आस्वाद घेता आला हेही नव्हते थोडके...

फोर्स मेज्युअर

‘फोर्स मेज्युअर’म्हणजे युद्ध ,दंगा, चक्रीवादळासारख्या नियंत्रणापलीकडील परिस्थितीत चूक घडल्यास त्या जबाबदाऱ्यांपासून दोन्ही पक्षांना अनिवार्यपणे मुक्त करणे, ही संकल्पना स्वीडिश दिग्दर्शक रुबेन ओस्तलुन्द चित्रपटात वेगळ्या प्रकारे वापरताना दिसतात. टॉमस, एबा आणि त्यांची मुले आल्प्समध्ये एका स्की-रिजॉर्टमध्ये सुट्टीला आली आहेत. हे एक सुखी मध्यमवर्गीय कुटुंब आहे, टॉमस-एबा जबाबदार पालक आहेत,मुले आयपॅड,ड्रोनमध्ये रमली आहेत. पण चित्रपट सुरु झाल्यावर काही मिनिटातच एक थरकापवून टाकणारा प्रसंग घडतो आणि सगळे बदलते. रिसॉर्टच्या बाल्कनीत लंच घेत असताना समोरच्या पर्वतावरून कोसळत आलेल्या हिमस्खलनाच्या लोटाचे चित्रण करणारा टॉमस, ते अगदी जवळ आलेले बघून बायकामुलांना तिथेच सोडून तिथून पळ काढतो. ही त्या पॅनिकमधून घडलेली प्रतिक्षिप्तक्रिया की पूर्वजीवनातल्या एखाद्या गंभीर त्रुटीचा परिणाम? अवघ्या साडेचार मिनिटांच्या त्या थरारक शॉटच्या अखेरीस तो परत येतो,ते पुन्हा टेबलाकडे वळतात . शारीरिक इजा झाली नसली तरी त्यांचे आयुष्य हादरून गेलेले असते.

निर्णायक क्षणी कुटुंबाला वाचवण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढणाऱ्या टॉमसला त्याची जाणीव करून देणाऱ्या एबा आणि टॉमसमधले मतभेद आता उघड होऊ लागतात, ह्या नव्या जाणिवांमुळे टॉमस ह्हळूहळू तुटत, दुभंगत जातो, मुले रडकुंडीला येतात. हे कुटुंब ते कसे सहन करते,त्या घटनेची निर्णायक परिणती आणि परिणाम त्यांना कोणत्या वळणावर आणून सोडते? ह्या चक्राचा उलगडा हा चित्रपट करत जातो. ह्या चित्रपटाला 'कॉमेडी-ड्रामा ' म्हटले असले तरी ते बर्फाच्छादित पर्वतावर घडणारे थरारनाट्य आहे. ह्या चित्रपटात निसर्गाचे रौद्र रूप ओझरते दिसते आणि दिसते म्हणेपर्यत अदृश्य होते. केबल कार डगडगत अर्ध्यावरच थबकते, बस खोल दरीच्या कठड्याला टेकते,रौद्रतेच्या खुणा चित्रपटभर जाणवत राहतात पण इथे मेलोड्रामा नाही, निसर्गाच्या सान्निध्यात घडलेली तरल भावकथा आणि श्वास रोखायला लावणाऱ्या थरारनाट्याचा प्रत्यय देणारी ही कहाणी आहे.

येल्दा - ए नाइट फॉर फर्गिव्हनेस

पूर्वजांच्या पर्शियन देशसंस्कृतीवर विलक्षण प्रेम असणाऱ्या,आपल्या माणसांच्या दुःख-दैन्य -वेदनेच्या कहाण्या सांगू पाहणाऱ्या अब्बास किरोस्तामी, मजीद मजिदी, मोहसीन मखमलबाफ,जाफर पनाही अशा दिग्दर्शकांची मोठी फळी इराणमध्ये जन्माला आली, त्यांच्या पुढच्या पिढीचा मसूद बक्षी आहे. एकीकडे मूलतत्त्ववाद तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या महासत्तेचे आक्रमण आणि निर्बंध ह्या कचाट्यात चिरडलेल्या पिढीचा तो प्रतिनिधी आहे. जागतिकीकरणामुळे भौगोलिक सीमा पुसट होत, सॅटेलाईटच्या जाळ्यांमधून इराणी समाज जगाच्या संपर्कात आला पण राजकीय-सांस्कृतिक-धार्मिक स्तरातला बुरसटलेपणा,त्यात होणारी स्त्रिया आणि मुलांची परवड संपली नाही उलट तिचे नवे आयाम सामोरे येऊ लागले. मसूदचे लक्ष नेमके इथे केंद्रित झाले आहे.

पतीचा खून केल्याबद्दल मृत्युदंड फर्मावली गेलेली मरियम आणि तिला 'माफ 'करण्यासाठी येऊ घातलेली मोना यांची कहाणी उलगडण्यासाठी मसूदने झगमगत्या प्रकाशजाळ्यांतून प्रवाहित होत राहणाऱ्या चॅनेलचा अवकाश निवडला आहे. इराणच्या कायद्यात खुनात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना अपराध्याला क्षमा करण्याची, त्याऐवजी आर्थिक नुकसानभरपाई स्वीकारण्याची तरतूद आहे. इथे त्या संकल्पनेचे व्यापारीकरण होत रिऍलिटी शोमध्ये रूपांतर झाले आहे.आणि येल्दा या एकमेकांना माफी देण्याचा संकेत असलेल्या रात्री हा शो होणार असल्याने लाखो प्रेक्षक तो बघण्यासाठी खिळून बसणार आहेत. मोनाने माफी दिली तर मरियमचा जीव वाचणार आहे, मोनाला बक्षिस मिळून वैयक्तिक विवंचना दूर होणार आहेत, दर्शकांचे एसएमएस 'ब्लड मनी 'ची रक्कम ठरवणार आहेत, मोबाईल कंपन्या, चॅनेल नफा कमावणार आहेत. हा केवळ मरियमच्या जिवाशी खेळ नाही, समाजाला संमोहित करणारा,लाखो डॉलर्सचा व्यावसायिक गेम आहे.

मरियमचा जीव वाचण्यासाठी धडपडणारी आई, सेलेब्रिटी अभिनेत्री, कथेचा प्रवास बदलणारी अनोळखी स्त्री,स्टुडिओतल्या अनेक स्त्रिया इथे दिसतात, पण जीवनाची सूत्रे त्यांच्या हातात कुठे आहेत? प्रोड्यूसर ,अँकर,कॅमेरामन,वकील,मरियमचा पती शिवाय, प्रायोजक दर्शक,पोलीस,न्यायसंस्था प्रतिनिधींच्या हातात ती बंदिस्त झाली आहेत. संवेदनशीलता गमावून बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जगण्याचा वादळी पट मसूद उभा करतो .‘ In Iran ,a reality show can replace the justice of men ‘ असे असले तरी ,’Can the justice of men truly be the justice for women? ’ हा प्रश्न उभा करत चित्रपट संपतो.

मेहरुनिसा

मेहरुनिसा म्हणजे सुंदर स्त्री ,स्त्रियांमधला सूर्य ,थोडक्यात प्रिटी वुमन पण संदीपकुमारच्या चित्रपटातली मेहरुनिसा आहे ८५ वर्षांची वृद्ध स्त्री. नवाबसाहेबांचा इंतकाल झाल्यामुळे विधवा म्हणजे अधिकच उपेक्षित. पण धर्मपरंपरेनुसार खानदानी हवेलीतल्या रितीरिवाजात चिणून गेलेले तिचे आयुष्यभराचे जिणे मागे पडले आहे आणि मोकळेपणाची एक लहानशी का होईन फट तिला दिसू लागली आहे. मेहरुनिसाने कधीकाळी चित्रपटात भूमिका केल्या होत्या हे कुणाच्या गावीही नसले तरी १८५७च्या बंडावर आधारित चित्रपटाचे शूटिंग लखनौमध्ये सुरु होते,कास्टिंग डिरेक्टर मेहरुनिसाचा शोध घेत येतात आणि नाट्याला सुरुवात होते. वडिलांच्या मृत्यूनंतर जुनीपुराणी हवेली विकून अपार्टमेंटमध्ये जगण्याची स्वप्ने बघणारी मुलगी,त्याला ठाम नकार देणारी मेहरुनिसा आणि नानीच्या बाजूने उभी राहणारी करिअरिस्ट नात असा तीन पिढ्यांचा आलेख इथे दिसतो. ह्या तिघींनाही स्वातंत्र्याची,आत्मसन्मानाची आस आहे पण ते मिळवण्याचे मार्ग वेगळे आहेत म्हणून संघर्ष उभा राहतो पण नानी-नवासीचे नाते सगळ्यावर मात करून जाते . नानीचा संघर्ष केवळ 'जग काय म्हणेल? 'मानसिकतेविरुद्ध नाही, तो फोटोतून अधिपत्य गाजवणाऱ्या नवाबसाहेबांशी, हवेलीच्या सौद्यासाठी लालचावलेल्या एजंटशी, उपकार केल्याच्या आविर्भावात फुटकळ भूमिका देणाऱ्या आढ्यताखोर कास्टिंग डिरेक्टरशी, पर्यायाने पुरुषी वर्चस्ववादी कुटुंब-समाज -धर्मव्यवस्थेच्या उतरंडीशीच आहे.नानी -नवासी मिळून जी धडपड करतात,त्यात त्यांना साथ देते एका लोकप्रिय टॉक-शोची अँकर मग सगळी तरुण पिढी सोशल मीडियातून नानीच्या मागे उभी राहते. नानीची लोकप्रियता बघून डिरेक्टरला पुन्हा दारात येणे भाग पडते तेव्हा नानी त्याला जूता फेकून मारते हा त्या म्हातारीने पुरुषी वर्चस्ववादी उतरंडीवर केलेला प्रहार असतो. ही कहाणी अल्पसंख्यांक समाजातल्या स्त्रीच्या उपेक्षेची प्रातिनिधिक कहाणी नाही,आत्मसन्मानासाठी आसुसलेल्या प्रत्येक स्त्रीची आहे, तिचा परीघ आणि अर्थ व्यापक आहे.

‘इफ्फी’ संपला पण एबा (लिजा लोवेन कॉंगस्ली) ,मरियम (सदफ असगरी) आणि मोना (बेहनाज जाफरी) , मेहरुनिसा (फारूख जाफर) ,'व्हॉल्व्हर' मधली रेमन्दा (पेनेलोपी क्रूझ)मनात घर करून राहणार आहेत. फारूख ह्या मूळच्या विविध भारतीच्या अनाऊन्सर,पुढे 'उमराव जान','स्वदेस' अशी धडपड करत त्या 'पीपली लाइव्ह','फोटोग्राफ' आणि ‘गुलाबो सिताबो' पर्यंत पोचल्या. वयाच्या ८५व्या वर्षी ही अभिनेत्री एका मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटाची नायिका बनली, वास्तव आयुष्यातली प्रोटॅगॉनिस्ट, स्टार बनली शिवाय ' ज्येष्ठ अभिनेत्यांसाठी मुख्य भूमिका लिहिल्या जातात मग आमच्यासाठी का नाही' हा प्रश्न त्यांनी 'इफ्फी 'तल्या चित्रकर्मींसमोर ऐरणीवर आणला.

आता स्क्रिप्ट बदलण्याची जबाबदारी जितकी त्यांची तितकीच आपलीही !

ekhikaat12a@gmail.com