आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:तुम्ही सक्षम आहात, भयावर मात करा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ असा होता जेव्हा डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचा असा ठाम विश्वास होता की, मानवी शरीराला ४ मिनिटांत एक मैल धावणे अशक्य आहे. या अशक्याचे सर रॉजर बॅनिस्टर नावाच्या धावपटूने १९५४ मध्ये ३:४९:४ मिनिटांत एक मैल धावून विश्वविक्रमात रूपांतर करून शक्य केले. अवघ्या ४६ दिवसांनी दुसऱ्या एका धावपटूने बॅनिस्टरचा विक्रम मोडला. त्यानंतर याची मालिकाच चालली. आता असे करणाऱ्या धावपटूंची संख्या १४०० च्या पुढे गेली आहे. एकदा बॅनिस्टरने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली, तेव्हा अनेक ते करण्यास समर्थ झाले! ते आधीही सक्षम होते, फक्त सुरुवातीची गरज होती. कल्पना करा, १५० वर्षांपूर्वी कुणी म्हटले असते की, एखादा माणूस आकाशात उडू लागला तर काय होईल! ही कल्पना परीकथेचा भाग मानली गेली असती. राइट बंधूंनी अशी कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले. परिणामी आज जगभरात विमान प्रवास होत आहे. राइट बंधूही त्यांच्या या प्रवासाच्या सुरुवातीला टीकेचा विषय झाले, पण त्यांनी हिंमत हारली नाही, तेव्हा अशक्य गोष्ट सत्यात उतरली.

अक्षरधाम दिल्लीच्या प्रदर्शन विभागासाठी व्हिडिओ तयार करायचा होता. प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचा एक गट सादरीकरणासाठी विविध माध्यमांवर संशोधन करत होता. या संशोधनाचे निष्कर्ष प्रमुख स्वामी महाराजांसमोर ठेवण्यात आले. व्हिडिओ शोमध्ये नावीन्य आणण्याचा कृती आराखडा होता. त्याच्या अगदी शेवटी आयमॅक्स नावाच्या नवीन तंत्रज्ञानाच्या पर्यायाचा उल्लेख होता. तथापि, संशोधक गटाचे म्हणणे होते की, त्यांच्या संस्थेला या नवीन तंत्रज्ञानाने शो तयार करणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांनी केवळ माहितीसाठी त्याचा उल्लेख केला होता. परंतु, प्रमुख स्वामी महाराजांनी हाच शेवटचा पर्याय निवडून सर्वांना चकित केले. आम्हाला याचा काहीही अनुभव नाही, हे स्वामीजींना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉलीवूडनेही अद्याप आयमॅक्स शो तयार केलेला नाही. गटाला ‘पहिला होण्याची’ भीती सतावत होती. पण आपण ते करू शकू, असा विश्वास प्रमुख स्वामी महाराजांना होता. तेव्हा स्वामीजी गोंडलमध्ये होते. त्यांनी सर्वांना प्रेरणा देत देवाच्या कृपेने काम पूर्ण होईल, असे सांगितले. अशा प्रकारे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे शूटिंग भारतात झाले. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून रणरणत्या वाळवंटापर्यंत देशभरातील १०० हून अधिक ठिकाणी दृश्ये शूट करण्यात आली. या स्थळांच्या निवडीसाठी २५० हून अधिक स्थळांवर २२,००० मैलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ४५०० लोकांनी त्या काळातील सर्वात मोठ्या फॉरमॅट चित्रपटात व्यक्तिरेखा रंगवली. परिणामी, या चित्रपटाने जगाचे लक्ष वेधून घेतले. पॅरिस शहरातील ला जिओड येथे आयोजित १० व्या आंतरराष्ट्रीय लार्ज फाॅरमॅट चित्रपट महोत्सवात ‘मिस्टिक इंडिया’ने ‘द आॅडियन्सिस चॉइस’ पुरस्कार पटकावला. सॅन होजेच्या आयमॅक्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. या सगळ्याच्या मुळाशी प्रमुख स्वामी महाराजांचा अतुलनीय आत्मविश्वास होता. त्यांना ‘मी पहिला आहे’ याची भीती नव्हती, तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते यावर विश्वास होता, त्यांनी ते करून दाखवले.

चला, प्रमुख स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या वर्षात भगवंताच्या कृपेने प्रथम होण्याच्या भीतीवर विजय मिळवून आपली सृजनशीलता आणि स्वप्ने साकार करण्याचा श्रीगणेशा करूया.

डॉ. ज्ञानवत्सल स्वामी प्रेरक वक्ते

बातम्या आणखी आहेत...