आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ वेल्थ:दहा मिनिटं तरी चालायलाच हवं...

डॉ. प्रीती तारेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यूज इट ऑर लूज इट ‘यूज इट ऑर लूज इट’ अशा अर्थाची एक म्हण आहे. वापर करा अथवा गमवा असा याचा अर्थ आहे. थोडक्यात काय, तर शरीराच्या एखाद्या अवयवाचा व्यवस्थित वापर केला नाही तर तो अवयव निकामी होत जातो. अगदी त्याचप्रमाणे नियमित चालण्यामुळे पायांचे स्नायू बळकट होतात. चालण्याच्या गतीमध्ये संतुलन साधलेले राहते. त्यामुळे पाच मिनिटांपासून सुरूवात करून प्रत्येक आठवड्यात किमान ७५ मिनिटे चालण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवा.

संधिवाताचे दुखणे कमी होईल शारीरिक हालचाली कमी झाल्या की शरीरात अनेक प्रकारच्या आजारांचा शिरकाव होतो. स्नायू, लिगामेंट, टेंडन यांचा वापर केला नाही तर ते आखडतात. याचा वापर जितका कमी तितके त्यांचे आखडणे मोठ्या प्रमाणावर होते आणि या आखडण्यामुळे पाठीच्या खालच्या भागात आणि जॉईंटच्या ठिकाणी दुखण्याचं प्रमाण वाढतं. पायी चालण्याच्या सवयीमुळे शरीर लवचिक राहतं.

हृदयासाठी वरदान पायी चालण्याच्या व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तातली साखर नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. याशिवाय टाइप-२ मधुमेहाच्या सर्व शक्यताही कमी होतात. रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे ट्राइग्लिसराइड्सची लेव्हल कमी होऊन हृदयावर पडणारा अनावश्यक ताण कमी होतो.

झोपेचे चक्र सुधारते चालण्यामुळे डोकं शांत राहण्यास, शरीरात ऊर्जा संचय होण्यास मदत होते. याशिवाय, चालण्याच्या व्यायामामुळे शरीर दिवसभर सक्रिय राहतं. परिणामी रात्री झोप चांगली लागते. नियमितपणे व्यायाम करत असाल तर तुम्हाला चांगली झोप लागते. कारण शारिरीक हालचालींमुळे झोपेसाठी कारणीभूत ठरणारं, मेलाटोनिन नावाचे हार्मोन नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरात स्त्रवते.

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी फुफ्फुसांना अधिक मेहनत करावी लागते. आपण आपल्या मांसपेशींचा जितका अधिक उपयोग करू तितक्या त्या अधिक मजबूत होत जातात. त्यामुळे नियमित चालण्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते.

एकाग्रता वाढवते चालण्याच्या व्यायामामुळे एकाग्रतेत सुधारणा होते. व्यायाम बीडीएनएफ म्हणजेच, ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॅफिक फॅक्टरच्या पातळीत वाढ करते. शिवाय १० मिनिटं चालण्याच्या व्यायामामुळे तुमच्या मूडमध्ये देखील सुधारणा होते.

एंडोर्फिनची पातळी वाढते चालण्यामुळे शरीरातील फील-गुड रसायन अर्थात एंडोर्फिन स्रवते. या रसायनाची निर्मिती आपल्या शरीरात जेव्हा नैसर्गिकरित्या होणे बंद होते, तेव्हा ते अनेक आजारांचे, तणावाचे कारण बनते. दररोज दहा मिनिटे चालण्यामुळे एंडोर्फिनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे माणूस ऊर्जावान, सकारात्मक आणि आनंदी राहताे.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते तुम्ही चालण्याचा व्यायाम करता तेव्हा आतड्यांची हालचाल होते. शिवाय, चालताना पोटाच्या मांसपेशींचा वापर होतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा चालण्याचा व्यायाम नियमितपणे करता तेव्हा या मांसपेशींचाही व्यायाम होतो. परिणामी बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही.

बातम्या आणखी आहेत...