आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभा रतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरू केलेल्या पहिल्या महिला प्रीमीयर लीगचे (डब्ल्यूपीएल) घोषवाक्य आहे ‘हर जुबान पर नाम तेरा..’ या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक प्रतिभावान महिला खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळालीय. विशेष म्हणजे, या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूंपैकी २८ खेळाडू अशा आहेत ज्यांनी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही. या स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात यापैकी २० खेळाडूंसाठी एक कोटीहून अधिकची बोली लावली गेली. महिला क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयने घेतलेल्या या पुढाकारामुळे राज्यातर्फे खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनाही फायदा होणार आहे. शिवाय, आजवर ज्यांंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले नाही, अशा खेळाडूंनाही नक्कीच फायदा होणार आहे.
या स्पर्धांमुळे देशातर्फे खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंच्या व्यावसायिकतेतही बदल घडून येण्याची आशा आहे. भारतात, महिला प्रीमीयर लीग सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये ‘वीमेन्स बिग बॅश लीग’ (डब्ल्यूबीबीएल), इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ यांसारख्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. या स्पर्धेच्या रांगेत आता बीसीसीआयने आयोजित केलेल्या ‘डब्ल्यूपीएल’चाही समावेश करावा लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला प्रीमीयर लीगची सुरुवातच केली नाही तर महिला क्रिकेटमध्ये एक नवी क्रांती घडवून आणली आहे. या स्पर्धांसाठी पुढाकार घेण्यापूर्वी बीसीसीआयने महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंना समान मानधनाची घोषणा करून या मुद्द्याचाही अडसर दूर करून स्वागतार्ह पाऊल उचललेले आहेच. या डब्ल्यूपीएलमुळे भारतातील महिला क्रिकेटमध्ये खूप चांगले बदल घडणार आहेत. त्यात सुधारणाही होणार आहेत. पुरूष क्रिकेटपटूंप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंनाही प्रसिद्धी मिळेल, त्यांच्या खेळाबद्दलही क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण होईल. आज केवळ मुंबई आणि नवी मुंबईतच या स्पर्धा होत असल्या तरी भविष्यात देशातील विविध शहरांमध्ये डब्ल्यूपीएल होणार आहेत. आजच मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये रस्त्यावरून नजर टाकली तर महिला क्रिकेटपटूंचे मोठे फलक लागलेले दिसतात. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला क्रिकेटपटूंचे इतके मोठे फलक मोठ्या दिमाखात झळकत आहेत, ही एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चार दशकापूर्वीचे महिला क्रिकेटचे स्वरुप आणि आज होणाऱ्या डब्ल्यूपीएलचे स्वरूप यात ३६० अंशाचा फरक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये व्यावसायिकता आली आहे. हीच व्यावसायिकता डब्ल्यूपीएलच्या माध्यमातून भारतात येऊ शकते. ही महिला क्रिकेटच्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणावी लागेल. स्पर्धात्मक क्रिकेट खेळाडूंना कायमच अधिक सुदृढ बनवते. सर्वोत्तम प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यामुळे डब्ल्यूपीएलच्या रुपाने महिला क्रिकेटमध्ये नवी क्रांती घडली आहे. अनेक तरुण मुलींना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, स्मृती मानधना आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे महिला क्रिकेट तरुण मुलींना प्रेरित करतेय. कोणत्याही खेळाच्या दृष्टीने महिला खेळाडूंचे सक्षमीकरण होणे ही चांगलीच बाब म्हणावी लागेल. महिला क्रिकेट संघ जिंकला तरी तुम्हाला कोण ओळखतो? असा सवाल पूर्वी केला जात होता. डब्ल्यूपीएल ही स्पर्धा भारतातील महिला क्रिकेटपटूंसाठी उज्ज्वल भविष्याची नांदी असणार आहे. अशा प्रकारच्या स्पर्धामुळे महिला खेळाडूंच्याही आयुष्यात आर्थिक संपन्नता आल्यामुळे क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या मुलींना आणि सध्या खेळणाऱ्या महिलांना आणखी जोमाने कारकीर्द गाजवण्याची संधी मिळेल, अशी आशा करायला हरकत नसावी.
या स्पर्धांसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सर्वाधिक बोलीसह स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिच्याशिवाय आणखी दोन खेळाडूंना ३ कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे. या लिलावात नुकत्याच जिंकलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघातील सहा खेळाडूंना खरेदी करण्यात आले आहे. पुरुषांच्या आयपीएलमध्ये दिल्लीने १९ वर्षांखालील विश्वविजेत्या खेळाडूंना करारबद्ध केले होते, हाच ट्रेंड महिला प्रीमीयर लीगमध्येही कॅपिटल्सने कायम ठेवला. महिला क्रिकेटपटूंना मिळालेली रक्कम पैशाच्या पावसापेक्षा कमी नाही. या डब्ल्यूपीएलमध्ये महिला क्रिकेटचे जग बदलून जाणार आहे. महिला खेळाडूंना या आधीच्या कोणत्याही स्पर्धेपेक्षा खूप जास्त पैसे मिळाले असले, तरी पुरुष खेळाडूंशी तुलना केल्यास ही रक्कम कमीच म्हणावी लागेल. महिलांसाठी ही पहिली आयपीएल आहे. आणि या पदार्पणाच्या स्पर्धेपासूनच खेळाडूंच्या मानधनामध्ये वाढ होऊ शकते, असा तर्क लावला जात आहे.
बीसीसीआय ही स्वायत्त संस्था आहे. सर्व आयपीएल संघ व्यावसायिक कंपन्यांशी संलग्नित आहेत, जेथे बाजाराद्वारे किंमत निश्चित केली जाते. बाजारातील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमधील मानधनाच्या बाबतीतही लैंगिक विषमता लवकर संपेल, असे वाटत नाही. डब्ल्यूपीएल हे एक व्यासपीठ आहे जे भारतातील अनेक महिला क्रिकेटपटूंसाठी अनोखे पण रोमांचक असणार आहे. शांता रंगास्वामी, डायना एडलजी, शुभांगी कुलकर्णी यांच्यापेक्षा आज हरमनप्रीत कौर ,स्मृती मानधना, मिताली राज आणि झुलन गोस्वामी या खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली. जाहिरातीच्या माध्यमातून या खेळाडूंना पैसाही मिळाला. पण डब्ल्यूपीएलच्या माध्यमातून या संघातल्या आर्थिक परिस्थिती फारशी ठीक नसणाऱ्या काही खेळाडूंनाही पैसा मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अनेक खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे. या खेळाडूंना हा पैसा स्वत:च्या पालकांना पक्के घर बांधून देण्यासाठी उपयोगात आणायचा आहे, हे विशेषत्वाने नमूद करावे वाटते. डब्ल्यूपीएलद्वारे महिला क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या मानधनातून निश्चितपणे सामाजिक बदल घडून येईल. गरज आहे ती फक्त या महिला क्रिकेटपटूंना पाठिंबा देऊन त्यांंचे हात बळकट करण्याची!
संपर्क : pramodmane123@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.