आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड-१९ विषाणू पहिल्यांदा आढळला तेव्हा चीनने संपूर्ण वुहान शहरात कडक लॉकडाऊन लागू केले होते. इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तेव्हा त्यांनी चीनच्या धर्तीवर त्यांच्या लोकसंख्येवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. ते विविध प्रकारचे होते. एकीकडे चिनी मॉडेलचे अत्यंत कठोर निर्बंध होते आणि दुसरीकडे तैवान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी चाचणी, काँटॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर देऊन अंशतः निर्बंध लादले होते. हे दुसरे मॉडेल कालांतराने भारतासह जगातील बहुतेक देशांमध्ये स्वीकारले गेले.
एखादी व्यक्ती संसर्गबाधित आढळली तर तिला इतरांपासून वेगळे करा, जेणेकरून इतर लोक तिच्या संपर्कात येऊन आजारी पडू नयेत, हे विलगीकरणाचे तत्त्व मानवाला एक हजार वर्षांहून अधिक काळापासून माहीत आहे. परंतु, सर्वच देशांनी लॉकडाऊन लावल्याचे कोविड-१९ च्या आधी कधीच घडले नव्हते. २०२० मध्ये काही देशांनी शून्य-कोविड धोरण स्वीकारले, त्यामुळे सीमा बंद करून वाहतुकीवर बंदी घालण्यात आली, नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि बाधितांना वेगळे केले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही, विषाणूचा प्रसार मंदावल्यावर निर्बंध शिथिल करता येतील, तथापि इतर देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी अत्यंत कठोर अलग ठेवण्याचे धोरण तेव्हाही पाळले जाईल, अशी या धोरणामागील कल्पना होती.
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे धोरण अमलात आणणे आव्हानात्मक असेल, असे प्रारंभिक संकेत होते. पहिले आव्हान हे होते की, बहुतेक बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती आणि इन्क्युबेशन कालावधी अनिश्चित होता. ज्यांना लक्षणे दिसून आली त्यांचीच चाचणी केली जाऊ शकते. एखाद्याला लक्षणे नसतील तर प्रवासादरम्यान केवळ चाचणी किंवा रँडम चाचणीद्वारे संसर्गाची माहिती मिळू शकत होती. आता संपूर्ण लोकसंख्येची तर रँडम चाचणी केली जाऊ शकत नाही, त्यामुळे काही बाधित नेहमीच सुटले. २ ते १४ दिवसांचा इन्क्युबेशन कालावधीदेखील सरासरीवर आधारित होता. काही लोक बाधिताच्या संपर्कात आल्यानंतर दोन आठवड्यांनंतरही पाॅझिटिव्ह होऊ शकत होते. याचा अर्थ असा होतो की, बाधित व्यक्तीसाठी विलगीकरण कालावधी वाढवला असता तरीही अनेक चाचण्या होऊनही प्रत्येक रुग्ण ओळखला जाईल याची हमी नव्हती. चीन याच दुष्टचक्रात अडकला. संपूर्ण शहरांमध्ये लॉकडाऊन लादण्याचे आणि संपूर्ण लोकसंख्येचे नमुने घेण्याचे आक्रमक धोरण त्याने वारंवार स्वीकारले, परंतु मल्टिपल सॅम्पलिंगशिवाय संसर्गाची प्रकरणे नेहमीच आवाक्याबाहेर राहतात. न्यूझीलंडमध्ये पोस्ट-आयसोलेशन ट्रान्समिशन आणि नवीन बाधित आढळण्याचे हेच कारण होते.
शून्य कोविड पॉलिसी यशस्वी होऊ शकत नाही याचा आणखी एक संकेत फार पूर्वी मिळाला होता, तेव्हा असे आढळून आले की, कोविड प्राण्यांनाही बाधित करू शकतो आणि मानव प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये संसर्ग पसरवू शकतो. २०२० मध्ये डेन्मार्कमधील एका बीव्हर फार्ममध्ये आढळून आले की, मानव पाणमांजरीला बाधित करू शकतात आणि विषाणू प्राण्यांमध्ये अनेक उत्परिवर्तनांद्वारे मानवांना पुन्हा बाधित करू शकतात. दोन भिन्न प्रजातींमधील दुहेरी-संसर्ग हेदेखील सिद्ध करते की, प्राणी सार्स-कोव्ह-२ चे वाहक असू शकतात आणि विषाणू मानवांमध्ये प्रसारित करू शकतात. व्हेरिएंटच्या उदयाने शून्य कोविड धोरण अधिक दिशाहीन वाटू लागले. मूळ वुहान-स्ट्रेनमध्ये विषाणूची पुनरुत्पादक संख्या २.५ ते ३ होती, म्हणजे प्रत्येक बाधित व्यक्ती सरासरी दोन ते तीन लोकांमध्ये विषाणू प्रसारित करू शकते. अल्फा व्हेरिएंटने पुनरुत्पादक संख्या वाढवली, तर डेल्टा आणि ओमायक्रॉनमध्ये ती आणखी पुढे गेली. ओमायक्राॅनची लागण झालेली व्यक्ती सरासरी ८ ते १० लोकांना बाधित करू शकते. लक्षणरहित संसर्गाचे कारण होऊ शकणारा आणि पशूंना वाहक करणारा संसर्गजन्य संसर्ग मानवापासून दूर करणे अशक्य आहे.
कोविड टाळता येत नाही हे स्पष्ट झाले तेव्हा जगाकडे पर्याय काय उरला होता? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शून्य कोविड शक्य नाही हे समजून घेणे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाचे, विशेषतः सर्वात असुरक्षित वर्गाचे गंभीर आजारांपासून संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. सुदैवाने हा विषाणू निरोगी मुले आणि ज्येष्ठांना गंभीर आजारी बनवत नाही. आपल्याला गंभीर आजारांपासून संरक्षण देणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर लागू करण्याची गरज असलेल्या लसी तयार करण्यातही आपण यशस्वी झालो. भूतकाळात कोणाला लस दिली गेली होती आणि संसर्ग होण्यापूर्वीचा रुग्णाचा इतिहास यावर बूस्टरची गरज अवलंबून असते. गेल्या दोन वर्षांनी आपल्याला कोविडबद्दल बरेच काही शिकवले आहे आणि आपले ज्ञान पुढील काळात वाढतच जाईल. ओमायक्रॉनच्या आगमनापूर्वीच कोविड रोखण्यात बेटांवरील देश सर्वात यशस्वी झाले होते. त्यांनी आता त्यांच्या लोकसंख्येचे इतके लसीकरण केले आहे की ते जगासाठी त्यांचे दरवाजे उघडू शकतात, त्यांना शून्य कोविडची गरज नाही. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
गगनदीप कांग देशातील अग्रणी विषाणू शास्त्रज्ञ gkang@cmcvellore.ac.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.